सर्व आहे तयाच्या पाशी |
परि भावच लागे त्यासी..!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 14/11/2026 :
भाव म्हणजे काही मोठी गोष्ट नाही. भाव म्हणजे मनातून येणारं खरं प्रेम. भाव म्हणजे माझं आहे असं वाटणं. तुम्ही देवाला "देवा" म्हणता, तेव्हा तो लांब वाटतो. पण जेव्हा तुम्ही "माझा पांडुरंग" म्हणता, तेव्हा तो जवळचा वाटतो, घरातलाच वाटतो. "माझा" असं वाटणं, हाच भाव आहे. तुम्ही देवाकडे मागता, "देवा मला हे दे, ते दे." यात भाव नाही, यात व्यवहार आहे. पण तुम्ही म्हणता, "देवा, मला काही नको, फक्त तू माझ्याजवळ राहा." यात भाव आहे. उदा- हॉटेलच्या जेवणात पैसा आहे, आईच्या जेवणात भाव आहे. तिने प्रेमाने केलंय. देवाला पण तसंच हवं असतं. पैशाचा नैवेद्य नको, भावाचा नैवेद्य हवा असतो.
भाव तेथे देव ही संताची वाणी |
आचारावाचूनी पाहिलं का कोणी ||
देव काही मंदिरात, मूर्तीत, फोटोमध्ये नाही. देव आहे तो भावात आहे. जिथे भाव आहे, तिथे देव आपोआप येतो. हे मी सांगत नाही, हे सगळ्या संतांनी सांगितलंय. फक्त 'देव, देव' म्हणून चालणार नाही. तुमचं आचरण पण चांगलं पाहिजे. वागणं चांगलं नसेल, तर देवाला कोणी पाहिलंय का? कोणीच पाहिलं नाही. तोंडाने देवाचं नाव घ्यायचं आणि हाताने वाईट कामं करायची, असं करून देव भेटत नाही. उदा- कबीर म्हणायचे, "मूर्तीत देव नाही, माणसात देव आहे." एकदा एक माणूस कबीरांना म्हणाला, "मी रोज मंदिरात जातो, पण देव भेटत नाही." कबीर म्हणाले, "तू मंदिरात जातोस, पण भाव घेऊन जात नाहीस. तुझं मन बाजारात असतं, तोंड मंदिरात असतं. भाव नाही, तर देव कसा भेटणार?"
भक्ती विना उद्धार नाही कुणाचा |
भक्ती साठी निर्धार पाहिजे मनाचा ||
या जगात तुम्ही कितीही शिका, कितीही पैसा कमवा, कितीही मोठे व्हा. पण जोपर्यंत भक्ती नाही, तोपर्यंत खरा उद्धार नाही. मनाला शांती मिळणार नाही आणि ही भक्ती काही एका दिवसात होत नाही. त्यासाठी मनाचा निर्धार लागतो. 'आज वाटलं म्हणून केलं, उद्या कंटाळा आला म्हणून सोडलं' अशी भक्ती कामाची नाही. माझा देव माझा आहे, मी त्याला सोडणार नाही असा पक्का निश्चय मनात पाहिजे. तरच भक्ती टिकते, तरच उद्धार होतो. भक्ती म्हणजे देवाला भेटणं आणि निर्धार म्हणजे त्या वाटेवरून न ढळणं. उदा- ध्रुव फक्त ५ वर्षांचा होता. त्याला देवाला भेटायचं होत. तो जंगलात गेला. त्याला भूक लागली, तहान लागली, वाघाची भीती वाटली. पण त्याने निर्धार केला होता, "देवाला भेटल्याशिवाय परत येणार नाही." आणि देवाला यावंच लागलं. कारण त्याच्या भक्तीत निर्धार होता.
भाव भक्ती हरीसी द्या हो |
माझा हरी विकतची घ्या हो ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात की, देवाला द्यायला तुमच्याकडे सोनं-नाणं, पैसा, नारळ-फुलं काही नसेल तरी चालेल. देवाला फक्त एकच गोष्ट द्या, तुमचा भाव आणि तुमची भक्ती आणि बदल्यात माझा हरी तुम्हाला फुकट मिळेल. त्याला विकत घ्यायला पैसे लागत नाहीत. तो बाजारात मिळत नाही, तो फक्त भावाने मिळतो. देव हा विकत घेण्याची वस्तू नाही, तो भक्तीने मिळणारी देणगी आहे. उदा- राम माझ्या झोपडीत येणार. रामाला द्यायला शबरीकडे काहीच नव्हतं. फक्त बोरे होती. पण तिने बोरे चाखून-चाखून गोड बोरं रामाला दिली. रामाने ती आवडीने खाल्ली. कारण त्यात भाव होता. सोन्याचं ताट नव्हतं, पण मन होतं. सुदाम्याने कृष्णाला फक्त मुठभर पोहे दिले. कृष्णाने ते पोहे सोन्याच्या जेवणापेक्षा गोड मानले. कारण पोह्यांत भक्ती होती.
सर्व आहे तयाच्या पाशी |
परि भावच लागे त्यासी ।
कुणि द्या हो, कुणितरी द्या हो ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, देवाला तुम्ही काय देणार? त्याच्याकडे सगळं आहे. सोनं, चांदी, दूध, तूप, पैसा, हे सगळं त्यानेच तर तुम्हाला दिलंय. त्याला याची काहीच कमी नाही. त्याला फक्त एकाच गोष्टीची भूक आहे. तुमच्या मनातला भाव. म्हणून मी हात जोडून सांगतोय, कोणीतरी तरी द्या हो. तुम्ही द्या, कुणीतरी तरी मनापासून भाव द्या. माझा हरी भावाचा भुकेला आहे. देव हा भिकारी नाही, पण तो भावाचा भुकेला आहे. उदा- तुमच्या घरी पाहुणा आला, तर तुम्ही त्याला काय देता? फक्त जेवण नाही देत, प्रेमाने देता, "अजून घ्या, थोडं घ्या." देव पण तसाच आहे. तुम्ही त्याला ५ रुपयांचा प्रसाद दिला तरी चालेल, पण तो प्रेमाने द्या. "देवा, हे तुझंच आहे, तुलाच देतोय" असा भाव ठेवा. तुम्ही ५००० रुपयांचा हार घातला, पण मनात विचार असेल, "लोकांनी बघावं मी किती मोठा हार घातला" तर तो हार देवापर्यंत पोचतच नाही.
हरी वाट बघे कधीकाळा |
कुणी देईल काय जिव्हाळा?
घ्या निरोप अमुचा जा हो ||2||
महाराज म्हणतात, तुम्हाला वाटतं तुम्ही देवाची वाट बघता? नाही हो, उलटं आहे. देव तुमची वाट बघतोय. कधीपासून बघतोय. तो असा विचार करतोय - 'कधीतरी कोणीतरी येईल आणि मला खरं प्रेम देईल का? मला जिव्हाळा देईल का? माझ्याशी खरं बोलेल का?' म्हणून मी तुम्हाला निरोप देतोय, हा निरोप गावोगावी घेऊन जा. 'देव तुमची वाट बघतोय, तुम्ही तरी त्याच्याकडे जा. आपण म्हणतो, देव लांब आहे. महाराज म्हणतात नाही, देव जवळच आहे, फक्त तो तुमच्या जिव्हाळ्याची वाट बघतोय. उदा- लहान लेकरू शाळेतून यायला उशीर झाला, तर आई दारात उभी राहून वाट बघते "माझं लेकरू कधी येईल, कधी मला मिठी मारेल?" देव पण तसाच आहे. तो तुमची वाट बघतोय. तुम्ही दिवसभरात एकदा तरी "पांडुरंगा" म्हणून त्याला आठवलं, की त्याला आईला लेकरू भेटल्यासारखं वाटतं.
द्रौपदिने भक्ती केली |
भर सभे वस्त्रे पुरविली ।
शास्त्रांचा शोध पहा हो ||3||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुम्हाला वाटतं मी उगीच सांगतोय? मग शास्त्रात बघा, इतिहासात बघा. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं. भर सभेत, सगळे मोठे-मोठे राजे, भीष्म, द्रोण बसले होते. कोणीच तिला वाचवायला पुढे आलं नाही. तिने आधी सगळ्यांना हाक मारली - भीष्मांना, द्रोणांना, पांडवांना. कोणीच आलं नाही. शेवटी तिने दोन्ही हात वर केले आणि मनापासून कृष्णाला हाक मारली - 'कृष्णा, आता तूच आहेस आणि काय झालं? कृष्णाने भर सभेत तिला इतकी वस्त्रं पुरवली की दुःशासन थकून गेला, पण वस्त्रं संपली नाहीत. म्हणून मी सांगतो, भक्ती केली की हरी धावून येतो. हे मी माझ्या मनाने सांगत नाही, उदा- गजेंद्र हत्तीचा मगरीने पाय पकडला होता. तो खूप वेळ लढला. शेवटी थकला, तेव्हा त्याने तोंडात कमळाचं फुल घेऊन विष्णूला हाक मारली. विष्णू लगेच गरुडावर बसून आला आणि त्याला वाचवलं. भक्ती खरी असेल, तर देव वेळ नाही बघत, लगेच येतो.
तुकड्या म्हणे भक्ती भोळी |
तो भेटतसे वनमाळी ।
ही हाक जना सांगा हो ||4||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतोय. भक्ती काही मोठी, अवघड, शिकलेल्यांची गोष्ट नाही. भक्ती एकदम भोळी असावी. लहान लेकरासारखी 'देवा, मला तूच पाहिजे' - एवढी साधी. अशी भोळी भक्ती केली की, तो वनमाळी म्हणजे रानातली फुलं गळ्यात घालणारा साधा विठ्ठल तो स्वतःहून येऊन भेटतो. त्याला बोलवावं लागत नाही, तोच येतो. म्हणून मी ही हाक मारतोय, तुम्ही पण ही हाक लोकांना जाऊन सांगा 'भोळी भक्ती करा, हरी भेटेल.' उदा- नामदेव लहान होता. त्याच्या आईने सांगितलं - "देवाला नैवेद्य दे." नामदेवाने देवासमोर दूध ठेवलं आणि म्हणाला "देवा, पी ना, का पीत नाहीस?" देवाने खरंच दूध प्यायलं. कारण त्याची भक्ती भोळी होती. त्यात "मी मोठा भक्त आहे" असा अहंकार नव्हता. शिकलेला माणूस म्हणेल "देव दूध कसं पिणार?" पण भोळा भक्त म्हणेल "माझा देव पिणारच." आणि देव पितो.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन 9970404180


0 टिप्पण्या