प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने २९ व ३० नोव्हेंबर रोजी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 22/11/2026 :
येथील प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर यांच्या वतीने रविवार दि. २९ व सोमवार दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी अकलूज येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील व स्पर्धा संयोजन प्रमुख चि. सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी दिली.
विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल येथे सदरचे सामने खेळवले जाणार आहेत. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळावे या साठी मंडळाने राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा, आट्यापाट्या स्पर्धा, बालक्रीडा स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. व रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, दिवाळीचा सण गरजू कुटुंबांनाही आनंदाने साजरा करता यावा, या सामाजिक बांधिलकीतून रत्नाई मिठाई वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येतो.
महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या साठी प्रथम क्रमांकास ४० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३० हजार रुपये, तृतीय क्रमांकास २० हजार रुपये, तर चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपये अशी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय यामध्ये उत्कृष्ट बचावपटू (बेस्ट डिफेंडर) यास ३ हजार रुपये, तर उत्कृष्ट चढाईपटू अर्थात (बेस्ट रायडर) यास ३ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ७०० रुपये आहे.या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी नावनोंदणी साठी प्रदीप पांढरे (मो. ९५१८९२७९२८), नरेंद्र धुमाळ (मो. ९७३००००२०३) आणि अभिषेक मगर (मो.८९०८७३०७०७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील यांनी केले आहे.
यावेळी मंडळाचे सचिव बिभीषण जाधव, संचालक यशवंत माने-देशमुख, भीमाशंकर पाटील तसेच क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

0 टिप्पण्या