उजनीच्या उशाशी ‘डेटा सेंटर’ चा पाळणा; पिकांना मिळेना पाणी, पण सर्व्हरला मात्र थंडगार आंघोळ
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 4/11/2026 :
आपल्याकडे ‘विकास’ हा शब्द इतका लवचिक आहे की तो कुठेही आणि कसाही वाकवता येतो. ज्या सोलापूर आणि उजनी पट्ट्यात उन्हाळा सुरू झाला की पाण्यासाठी टँकरचे नंबर लागतात, जिथे उजनीचं पाणी कालव्यातून सोडायचं की नाही यावरून दरवर्षी राजकीय आखाडे रंगतात, आणि जिथे धरण ‘उणे’ पातळीत जाणं हा निसर्गाचा नियमच मानला जातो तिथे आता म्हणे जागतिक दर्जाचं ‘एआय डेटा सेंटर’ आणि ‘ग्रीन एनर्जी’ प्रकल्प येणार आहे.
ऐकायला किती गोड आणि अत्याधुनिक वाटतं ना? म्हणजे काल पर्यंत पाण्याच्या एका पाळीसाठी तहसीलदार कार्यालयावर मोर्चे काढणारा आपला पट्टा आता अचानक ‘सिलिकॉन व्हॅली’ होणार तर. पण या चकचकीत इंग्रजी शब्दांच्या आणि कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या पलीकडे नेमकं काय शिजतंय, हे एकदा आपल्या गावठी आणि सरळ गणिताने समजून घेतलं पाहिजे.
हा ‘डेटा सेंटर’ आणि ‘ग्रीन एनर्जी’ चा प्रकल्प नेमका आहे तरी काय? आपल्याला वाटतं आपला डेटा, आपले फोटो, व्हिडिओ आणि आजकालचं ते ‘एआय’ कुठेतरी आकाशात म्हणजे ‘क्लाउड’ वर तरंगत असतं. पण गड्यांनो, आकाशात फक्त ढगच तरंगतात आणि तेही आपल्याकडे वेळेवर बरसत नाहीत. हा सगळा डिजिटल पसारा जमिनीवर बांधलेल्या प्रचंड मोठ्या गोदामा सारख्या इमारतीत ठेवलेला असतो, ज्याला ‘डेटा सेंटर’ म्हणतात. या इमारती मध्ये हजारो महाशक्तिशाली कॉम्प्युटर्स आणि सर्व्हर्स चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस न थांबता धडधडत असतात.
आता उजनी परिसरात जो प्रकल्प प्रस्तावित आहे, त्यात असं एक भव्य डेटा सेंटर उभारलं जाणार आहे. आणि या डेटा सेंटरला लागणारी राक्षसी वीज कुठून आणायची? तर त्यासाठी उजनी धरणाच्या अथांग पाण्यावर तरंगते सौर पॅनेल्स बसवायचे आणि सोबत ‘ग्रीन हायड्रोजन’ वगैरे तयार करायचा, असा हा कागदावर अतिशय सुंदर दिसणारा ‘हरित’ आराखडा आहे. वरवर पाहता कोणाही सामान्य माणसाला वाटेल की, अरे वा, पाण्यावर सोलर बसवून वीज बनणार आणि शेजारी कॉम्प्युटर सेंटर चालणार, यात वाईट काय? पण खरी गोम तर इथूनच सुरू होते.
फायद्यांचं गाजर आणि नोकऱ्यांचा भव्य भ्रम
कोणताही मोठा प्रकल्प येताना आधी हजारो कोटींच्या गुंतवणुकीचे आकडे फेकले जातात आणि बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांचं गाजर दाखवलं जातं. आपल्याला सांगितलं जातं की या प्रकल्पामुळे परिसराचा कायापालट होईल, हजारो हातांना काम मिळेल. पण जरा डोळे उघडून जागतिक वास्तव पाहिलं तर कळतं की, जगातील सर्वात कमी मानवी रोजगार निर्माण करणारा उद्योग कोणता असेल, तर तो म्हणजे ‘डेटा सेंटर’.
अहो, तिथे काय पाच हजार माणसं हातात गोणपाट घेऊन सर्व्हरला वारा घालायला बसणार आहेत का? संपूर्ण डेटा सेंटर हे ९९ टक्के स्वयंचलित असतं. एकदा का इमारत बांधून झाली आणि सर्व्हर्स बसवले की, तिथे मोजून काही डझन उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर्स पलीकडे कोणाचीही गरज नसते. ते इंजिनिअर्सही पुण्या-मुंबईहून किंवा बाहेरूनच येणार. मग आपल्या स्थानिक मुलांच्या वाट्याला काय येणार? तर गेटवर काठी घेऊन उभं राहणारा वॉचमन, सोलर पॅनेलवरची पक्षांची विष्ठा पुसणारा कामगार, किंवा कंपाऊंडच्या बाहेरचं गवत कापणारा मजूर. स्वतःच्या हक्काची बागायती शेती आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला मासेमारीचा व्यवसाय मोडून आपण जर वॉचमन होण्यात धन्यता मानणार असू, तर या ‘विकासाला’ दंडवतच घातलेला बरा.
सोलरच्या छताखाली गुदमरू पाहणारी उजनीची मासेमारी. उजनी धरण म्हणजे केवळ पाण्याचा साठा नाही, तर ती एक जिवंत परिसंस्था (Ecosystem) आहे. हजारो मच्छीमार कुटुंबांच्या घरातील चूल या धरणातील माशांवर पेटते. आता जेव्हा तुम्ही या धरणाच्या पाण्यावर हजारो एकरात तरंगते सोलर पॅनेल्स अंथरणार, तेव्हा पाण्याच्या खाली काय घडणार आहे याचा विचार कोणी केलाय का?
किती गोड कल्पना आहे ना, उजनीतल्या माशांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून वरून सोलर पॅनेलची कायमस्वरूपी सावली. पण विज्ञानाचा साधा नियम सांगतो की, जेव्हा पाण्यावर सूर्यप्रकाश पडणं बंद होतं, तेव्हा पाण्याच्या आत होणारी प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया थांबते. पाण्यातलं नैसर्गिक शेवाळ आणि सूक्ष्म पाणवनस्पती जे माशांचं मुख्य अन्न आहे तेच तयार होणं बंद होतं. वरून पॅनेल्स झाकल्यामुळे वाहत्या वाऱ्याचा पाण्याच्या पृष्ठभागाशी संपर्क तुटतो आणि पाण्यातला विद्राव्य ऑक्सिजन झपाट्याने कमी होतो. ऑक्सिजन आणि अन्नाअभावी माशांची प्रजनन क्षमता संपते आणि जलचर गुदमरून मरतात.
इतकंच नाही, तर हे महाकाय सोलर पॅनेल्स पाण्यावर एका जागी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या तळाशी हजारो काँक्रीटचे ठोकळे आणि लोखंडी केबल्सचं जाळं टाकलं जातं. जिथे तळाशी आणि वरती लोखंडी तारांचं साम्राज्य असेल, तिथे मच्छीमार आपली होडी कशी नेणार आणि जाळं कुठे टाकणार? म्हणजे एका झटक्यात हजारो मच्छीमारांचा पारंपरिक रोजगार पाण्यात बुडवून वरून आपल्याला ‘हरित ऊर्जे’ चे धडे दिले जाणार आहेत. शिवाय उजनीवर येणारे फ्लेमिंगो आणि इतर स्थलांतरित पक्षी काय आता सोलरच्या काचेवर चोची मारत बसणार आहेत का?
सर्व्हरची राक्षसी तहान आणि बाष्पीभवनाची जादू. आता येऊया सर्वात कळीच्या मुद्द्यावर, पाणी. मोबाईलवर आपण जेव्हा एखाद्या एआयला विचारतो की, माझ्यासाठी एक छानशी कविता लिहून दे, किंवा माझा कार्टूनवाला फोटो बनवून दे, तेव्हा त्या एआयच्या मेंदूला म्हणजेच डेटा सेंटर मधल्या हजारो प्रोसेसर्सना इतका ताण पडतो की ते वैशाखातल्या पत्र्यासारखे तापतात. हे कोट्यवधींचे सर्व्हर्स जळून खाक होऊ नयेत म्हणून त्यांना चोवीस तास थंड ठेवावं लागतं. आणि त्यांना थंड करण्यासाठी सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे ‘पाणी’.
एका मध्यम ते मोठ्या (५० ते १०० मेगावाट) एआय डेटा सेंटरला सर्व्हर्स थंड ठेवण्यासाठी दररोज सरासरी ३० ते ५० लाख लिटर पाणी लागतं. वर्षाला हा आकडा १५० कोटी लिटरच्या घरात जातो. आता काही हुशार लोक म्हणतील, अहो, पाणी फक्त सर्व्हर थंड करून परत धरणात सोडलं जाईल की. थांबा, इथेच तर खरी फसवणूक आहे.
डेटा सेंटर्स मध्ये वीज वाचवण्यासाठी ‘इव्हॅपोरेटिव्ह कूलिंग’ तंत्रज्ञान वापरलं जातं. यात उष्णता शोषून घेताना घेतलेल्या पाण्यापैकी तब्बल ७० ते ८० टक्के पाण्याची थेट वाफ होते आणि ते पाणी कूलिंग टॉवर्स मधून कायमचं आकाशात उडून जातं. म्हणजे रोज ५० लाख लिटर पाणी धरणातून उचललं, तर त्यातलं ४० लाख लिटर पाणी अस्मानात गायब होणार. आणि उरलेलं जे १० लाख लिटर पाणी असतं, त्यात पाईप्स गंजू नयेत आणि शेवाळ साचू नये म्हणून घातक रसायने मिसळलेली असतात. शिवाय बाष्पीभवनामुळे त्या उरलेल्या पाण्यात क्षारांचं प्रमाण इतकं वाढलेलं असतं की, ते गरम आणि रसायनयुक्त पाणी परत धरणात सोडल्यास उरलेसुरले मासेही तडफडून मरतील आणि धरणाचं पाणी प्रदूषित होईल.
आपण शेतकरी माणसं आहोत, आपल्याला लिटर आणि गॅलन पेक्षा एकराची भाषा लवकर कळते. चला तर मग, एका डेटा सेंटरला रोज लागणाऱ्या ५० लाख लिटर पाण्याचं आपल्या भाषेत पोस्टमॉर्टम करूया. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा हिशोब एका माणसाला दिवसाला सरासरी १०० लिटर पाणी लागतं असं मानलं, तर हा एकटा डेटा सेंटर रोज ५०,००० लोकसंख्येच्या एका मोठ्या गावाचं किंवा तालुक्याचं पाणी एकट्याने रिचवणार आहे. आपण १६ मिमीच्या ठिबक सिंचनाने अगदी मोजून मापून जरी उसाला पाणी दिलं, तरी एका एकराला दिवसाला किमान सरासरी १५ ते २० हजार लिटर पाणी लागतं. या हिशोबाने डेटा सेंटरच्या एका दिवसाच्या पाण्यात आपल्या भागातली तब्बल २५० एकर उसाची शेती हिरवीगार राहू शकते
कांदा, भुईमूग किंवा कलिंगड सारख्या पिकांना ठिबकवर दिवसाला एकरी ८ ते १० हजार लिटर पाणी पुरेसं होतं. म्हणजे एक डेटा सेंटर जेवढं पाणी रोज वाफ करून हवेत उडवतो, तेवढ्या पाण्यात ५०० एकर कांद्याची किंवा बागायती शेती सोन्यासारखी पिकू शकते. आता यातला सर्वात मोठा विरोधाभास बघा. शेतकरी जेव्हा आपल्या ५०० एकर शेतीला पाणी देतो, तेव्हा ते पाणी वाया जात नाही; ते मातीत मुरतं, त्यातून आजूबाजूच्या विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी जिवंत राहते. त्या ५०० एकरातून हजारो टन अन्नधान्य पिकतं, शेकडो शेतकरी कुटुंबं जगतात, शेतमजुरांच्या हाताला काम मिळतं, ट्रॅक्टर आणि ट्रान्सपोर्टवाल्यांचं पोट भरतं आणि गावातली बाजारपेठ चालते.
याउलट, जेव्हा मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात उजनी धरण ‘उणे ३०-४० टक्के’ पातळीत जातं, जेव्हा पिकं पाण्याच्या एका पाळीवाचून करपून जातात, जेव्हा शेतकरी रात्री बारा वाजता सापा-विंचवांच्या भीतीत थ्री-फेज लाईटची वाट बघत शेतात जातो, तेव्हा मात्र या लाडक्या डेटा सेंटरला २४ तास अखंड वीज आणि लाखो लिटर पाणी विनाखंड पुरवलं जाणार. कारण शेतकऱ्याचा कांदा किंवा ऊस जळाला तर चालेल, पण कोणाचा तरी सर्व्हर डाऊन झाला तर जागतिक अनर्थ होईल ना.
आपल्याकडे एखाद्या गोष्टीला विरोध केला की लगेच ‘विकास विरोधी’ असा शिक्का मारला जातो. पण ज्या अमेरिका आणि युरोपने हे तंत्रज्ञान जन्माला घातलं, तिथले सुशिक्षित नागरिक आज याच डेटा सेंटर्सच्या विरोधात हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले आहेत, कोर्टात खटले लढवत आहेत. का बरं? गोऱ्या साहेबांना अचानक विकासाची ॲलर्जी झाली काय? त्याची कारणं अतिशय भयानक आहेत
एआय डेटा सेंटर्स हे विजेचे राक्षस आहेत. आयर्लंड सारख्या देशात तिथल्या एकूण विजेपैकी तब्बल २० टक्क्यांहून अधिक वीज एकट्या डेटा सेंटर्सनीढ गिळंकृत केली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया आणि युरोपातील नेदरलँड्स मध्ये डेटा सेंटर्समुळे स्थानिक पॉवर ग्रिडवर इतका ताण आलाय की तिथल्या सामान्य नागरिकांची विजेची बिलं गगनाला भिडली आहेत आणि लोकांना ब्लॅकआउटचा (वीजकपातीचा) सामना करावा लागतोय. म्हणून नेदरलँड्सने तर अशा महाकाय डेटा सेंटर्सवर चक्क बंदीच आणली.
अमेरिकेतील ॲरिझोना, युटा आणि कॅलिफोर्निया सारख्या दुष्काळी भागांत जेव्हा डेटा सेंटर्सना अब्जावधी गॅलन पाणी दिलं गेलं, तेव्हा तिथल्या नागरिकांच्या नळाला पाणी येईनासं झालं आणि शेतकऱ्यांच्या विहिरी आटल्या. तिथल्या जनतेने कंपन्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडलं आहे.
डेटा सेंटरच्या छतावर सर्व्हर थंड करण्यासाठी शेकडो अवाढव्य पंखे आणि जनरेटर्स २४ तास सुरू असतात. त्यातून एक विशिष्ट प्रकारचा अखंड घोंघावणारा आवाज येतो. अमेरिकेत डेटा सेंटरच्या आसपासच्या गावांतील लोकांना या आवाजामुळे रात्री झोप येणं बंद झालंय, मायग्रेन आणि मानसिक आजार जडलेत. घराच्या बाजूला चोवीस तास एखादं विमान सुरू करून ठेवल्यावर काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी.
एकीकडे जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे डेटा सेंटर्सची विजेची भूक भागवण्यासाठी बंद पडलेले कोळशाचे वीज प्रकल्प पुन्हा सुरू करायचे, हा प्रकार सध्या पाश्चात्त्य देशात सुरू आहे.
थोडक्यात जेव्हा अमेरिका आणि युरोप मधल्या जागरूक नागरिकांनी आपल्या घराशेजारी पाण्याची आणि विजेची लूट करणाऱ्या या राक्षसांना उभं करायला स्पष्ट नकार दिला, तेव्हा या बड्या टेक कंपन्यांनी आपलं गाठोडं उचललं आणि त्या आता तिसऱ्या जगातील देशांच्या शोधात निघाल्या आहेत, जिथे कायदे वाकवता येतात, जिथे ‘विकासाच्या’ नावाखाली कोणाचाही आवाज दाबता येतो आणि जिथे उजनी सारख्या जीवनदायिनी धरणाचं पाणी कवडीमोल भावाने सर्व्हरच्या घशात ओतता येतं.
आपल्याला तंत्रज्ञानाचं वावडं अजिबात नाही. डेटा सेंटर्स देशात जरूर झाली पाहिजेत; पण ती कुठे व्हावीत? जिथे समुद्राचं खारं पाणी मुबलक आहे आणि ज्याचं शुद्धीकरण करून कंपन्या स्वतःच्या खर्चाने वापरू शकतात अशा किनारपट्टीवर, किंवा जिथे पाण्याचा वापर न करता ‘ड्राय कूलिंग’ तंत्रज्ञान वापरण्याची सक्ती असेल अशा ठिकाणी. पण पैसे वाचवण्यासाठी कंपन्यांना गोड्या पाण्याचा फुकटचा सोर्स हवा असतो आणि त्यासाठी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आणि मच्छीमारांच्या ताटातलं हिसकावून घेतलं जात असेल, तर तो विकास नसून ती आधुनिक लुटमार आहे.
उद्या जेव्हा उजनीचं पाणी सर्व्हरच्या वाफेत उडून जाईल, मासेमारी संपेल आणि शेती करपून जाईल, तेव्हा भूक लागल्यावर आपण काय ‘मेगाबाईट’ आणि ‘गिगाबाईट’ तळून खाणार आहोत का? की तहान लागल्यावर ‘क्लाउड’ मधून पाणी डाऊनलोड करून पिणार आहोत? विचार करण्याची वेळ आताच आहे, नाहीतर उजनीच्या काठावर उभं राहून फक्त ‘बफरिंग’ बघत राहण्या शिवाय आपल्या हातात काहीच उरणार नाही.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

0 टिप्पण्या