🩺हेल्थ मंत्रा |🩺आरोग्य मंत्र |🩺 तरुणांचा जास्त प्रोटीन खाण्याचा ट्रेंड महागात; अति प्रोटीन खाल्ल्याने खराब होते का किडनी? जाणून घ्या वयानुसार योग्य प्रमाण

 🩺हेल्थ मंत्रा |🩺आरोग्य मंत्र |🩺

तरुणांचा जास्त प्रोटीन खाण्याचा ट्रेंड महागात; अति प्रोटीन खाल्ल्याने खराब होते का किडनी?  जाणून घ्या वयानुसार योग्य प्रमाण

वृत्त एकसत्ता न्यूज   

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/10/2026 : 

आजच्या तरुणाईमध्ये फिटनेस, जिम आणि बॉडीबिल्डिंगची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. आकर्षक शरीरयष्टी बनवण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी आणि व्यायामानंतरची झीज भरून काढण्यासाठी 'प्रोटीन सप्लीमेंट्स' (Protein supplements) किंवा प्रोटीन पावडरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीराला आवश्यक पोषण वेगाने मिळवण्यासाठी हा सोपा मार्ग मानला जातो. पण, याच फिटनेसच्या नादात सध्या एक गंभीर धोका निर्माण झाला आहे, तो म्हणजे प्रथिनांचे प्रमाणाबाहेर आणि अतिसेवन!

कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय किंवा स्वतःच्या शरीराची गरज न ओळखता रोजच्या रोज प्रोटीनचे मोठे डोस घेणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. आंधळेपणाने होणाऱ्या या अतिसेवनाचा थेट आणि घातक फटका आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवाला, म्हणजेच मूत्रपिंडाला (किडनी) बसू शकतो.

किडनी निकामी होण्याचा किंवा ताण आल्याचा धोका का वाढतो?

योग्य आणि मर्यादित प्रमाणात घेतलेले प्रोटीन सप्लीमेंट्स आरोग्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असतात. पण, समस्येची सुरुवात चुकीच्या मार्गदर्शनामुळे होते. अनेक जिमप्रेमी आहारतज्ज्ञांचा (Dietitian) सल्ला घेण्याऐवजी जिम ट्रेनर्स किंवा सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवून अतिप्रमाणात प्रोटीन पावडर घेतात.

किडनीवरील अतिरिक्त ताण: निरोगी व्यक्तीनेही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त प्रथिने खाल्ल्यास, शरीरातील अतिरिक्त टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी किडणीला सतत आणि जास्त प्रमाणात काम करावे लागते.

अडकलेली बनावट उत्पादने: बाजारात उपलब्ध असणारी काही अप्रमाणित किंवा बनावट उत्पादने यकृत आणि किडणीवर अनावश्यक मेटाबॉलिक ताण आणतात.

आधीपासून असलेले आजार: ज्यांना आधीपासून किडनीचा त्रास आहे, त्यांनी अती प्रोटीन घेतल्यास किडनी निकामी होण्याचा वेग झपाट्याने वाढू शकतो.

किडनीवर ताण आल्याची किंवा ती खराब होत असल्याची सुरुवातीची लक्षणे

किडनीवरील ताण सुरुवातीच्या टप्प्यात अतिशय गुप्तपणे वाढतो. त्यामुळे खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते-

लघवीमध्ये अत्यधिक फेस तयार होणे (लघवीतून प्रोटीन बाहेर पडण्याचे हे मुख्य लक्षण आहे).

डोळ्यांखाली, पायांच्या टाचांवर किंवा पावलांवर कोणतीही दुखापत नसताना अचानक सूज येणे.

रात्रीच्या वेळी वारंवार लघवीला जावे लागणे (Nocturia).

रक्ताच्या चाचणीमध्ये 'सिरम क्रिएटिनिन' (Serum Creatinine) किंवा 'बीडीयून' (BUN) ची पातळी वाढलेली आढळणे.

वयानुसार आणि गरजेनुसार प्रथिनांचे योग्य प्रमाण

शरीराला प्रथिनांची किती गरज आहे, हे प्रत्येक व्यक्तीचे वय, वजन आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते-

सामान्य निरोगी प्रौढ व्यक्ती: सामान्य जीवनशैली असलेल्या व्यक्तीला प्रति किलो वजनामागे ०.८ ग्रॅम ते १ ग्रॅम प्रथिनांची गरज असते. (उदा. ६० किलो वजन असलेल्या व्यक्तीला रोज ४८ ते ६० ग्रॅम प्रथिने पुरेशी असतात).

खेळाडू आणि जिमला जाणारे तरुण: नियमितपणे भारी वजन उचलणाऱ्या किंवा तीव्र व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना प्रति किलो वजनामागे १.२ ग्रॅम ते २ ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असू शकते.

लहान मुले आणि वृद्ध: वाढत्या वयातील मुलांना योग्य प्रमाणात प्रथिने लागतात, तर वृद्धांमध्ये स्नायूंचा ऱ्हास (Muscle loss) रोखण्यासाठी आहारातील प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठेवावे.

प्रोटीन सप्लीमेंट्स वापरताना घ्यावयाची खबरदारी

प्रोटीन पावडरला संपूर्ण आहाराचा पर्याय कधीही बनवू नका.

तुमच्या शरीराचे वजन आणि व्यायामाची तीव्रता तपासूनच सप्लीमेंटचे प्रमाण निश्चित करा.

टाकाऊ घटक शरीरा बाहेर टाकण्यासाठी मदत व्हावी म्हणून दिवसभरात पाण्याचे सेवन भरपूर ठेवा.

ब्रँडेड आणि मान्यताप्राप्त उत्पादनांचाच वापर करा आणि क्लिनिकल डाएटिशियनच्या सल्ल्यानेच आहार घ्या.

♻️ आरोग्य विषयक ♻️

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या