■ ईशान्य भारतात..
■ फुलं बहरली म्हणून दुष्काळ !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/10/2026 :
ईशान्य भारतात पाऊस कमी पडला म्हणून दुष्काळ पडत नाही, तर फुलं बहरली म्हणून दुष्काळ पडतो. महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही.आकाशाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी, काळवंडलेले ढग पण पाऊस नाही. कोरडी पडलेली विहीर, आटलेले तलाव आणि पाण्याच्या टँकर भोवती लागलेली रांग दुष्काळाची ही चित्रं आपल्याला चांगलीच परिचित आहेत. दुष्काळाचं कारणही आपल्याला माहीत असतं, पाऊस कमी पडला. पण कल्पना करा, पाऊस ठीकठाक झाला आहे. जंगल हिरवं आहे, बांबूची बेटं डोलत आहेत, सगळीकडे अचानक फुलांचा बहर आला आहे, आणि काही काळानंतर? अन्नधान्याची टंचाई, उपासमार, हजारो लोकांचे स्थलांतर. कारण, फुलं बहरली म्हणून दुष्काळ.
ईशान्य भारतात बांबूच्या एका विलक्षण नैसर्गिक चक्रामुळे निर्माण होणाऱ्या या संकटाला ‘मौतम’ म्हणतात. ‘मौतम’ हा शब्द मिझोरामच्या इतिहासात केवळ वनस्पतीशास्त्रीय घटना नाही; तो लोकांच्या सामूहिक स्मृतीतील भीषण दुष्काळाचे नाव आहे. यामागे कारण आहे बांबूचा सामूहिक फुलोरा. बांबूची काही विशिष्ट प्रजाती अनेक वर्षे फुलतच नाहीत. त्या वाढतात, जंगल व्यापतात आणि शांतपणे आपले जीवनचक्र पुढे नेत राहतात. पण साधारण ४८ वर्षांच्या आसपासच्या अंतराने एक विलक्षण घटना घडते. एका मोठ्या प्रदेशातील बांबू जवळ जवळ एकाच वेळी फुलतात. जंगल अचानक फुलांनी भरून जाते. आणि मग बांबू मोठ्या प्रमाणावर बिया तयार करतो. या बिया म्हणजे उंदरांसाठी जणू अचानक उघडलेलं प्रचंड अन्नभांडार.
उंदरांची संख्या झपाट्याने वाढते. भरपूर अन्न मिळाल्यामुळे त्यांची पैदास प्रचंड वेगाने होते. जंगलातील उंदरांची संख्या इतकी वाढू शकते की ते नंतर शेतांकडे वळतात, गावागावात जातात, अन्नाचे साठे संपवतात. उंदरांची फौज भाताच्या आणि इतर पिकांच्या शेतांवर तुटून पडते, पिके फस्त होतात. घरातील धान्यसाठेही सुरक्षित राहत नाहीत. उंदरांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात असते की उपाशी लोकं घरदार सोडून निघून जातात, आणि मग सुरू होते त्यांच्या जगण्याची खरी शोकांतिका. म्हणजे सुरुवात होते बांबूच्या फुलांनी. पण शेवट होतो दुष्काळाने, यालाच ‘मौतम’ म्हणतात.
मिझोराम मध्ये १९५८-५९ च्या सुमारास आलेला मौतम विशेषतः प्रसिद्ध आहे. बांबूच्या फुलोऱ्यानंतर उंदरांची संख्या प्रचंड वाढली आणि पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी मिझोराम आसामचा भाग होता. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या संकटाकडे दुर्लक्ष केलं आणि लाखो मिझो गावं भुकेनी संपली. त्यातून पुढे Mizo National Famine Front सारख्या संघटित चळवळीचा उदय झाला, याच चळवळीचे पुढे राजकीय रूपांतर झाले.
निसर्गाची गंमत बघा. आपण दुष्काळाची कल्पना केली की डोळ्यासमोर येतात काळे ढग, पाऊस न पडलेले आकाश आणि फुटलेली जमीन. पण मिझोरामच्या कथेत चित्र अगदी उलटे आहे. जंगल फुललेलं आहे. पण माणसाच्या ताटात अन्न नाही.
म्हणूनच मौतम ही केवळ ‘फुलांमुळे पडलेला दुष्काळ’ अशी गंमत म्हणून सांगण्यासारखी कथा नाही. ती निसर्गातील एका अत्यंत गुंतागुंतीच्या चक्राची आठवण करून देते; एका वनस्पतीच्या जीवनचक्रातील घटना, उंदरांच्या संख्येतील स्फोट आणि त्यामुळे दुष्काळाचे संकट.
©️ बोभाटा

0 टिप्पण्या