सरकारचे मोठे पाऊल; एअरबॅग्जप्रमाणे आता सर्व गाड्यांमध्ये 'हे' सुरक्षा फीचर अनिवार्य केले जाणार...

 सरकारचे मोठे पाऊल; एअरबॅग्जप्रमाणे आता सर्व गाड्यांमध्ये 'हे' सुरक्षा फीचर अनिवार्य केले जाणार...

वृत्त एकसत्ता न्यूज   

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 24/10/2026 :

कारचाकल आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने M1 श्रेणीतील वाहनांमध्ये ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम (AEBS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, १ ऑक्टोबर २०३० पासून उत्पादित होणाऱ्या नवीन M1मॉडेल्समध्ये ही यंत्रणा आवश्यक असेल. त्यानंतर १ ऑक्टोबर २०३२ पासून आधीपासून उत्पादनात असलेल्या M1 श्रेणीतील वाहनांनाही हा नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

M1 श्रेणीमध्ये चालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त आठ प्रवाशांची आसनक्षमता असलेल्या कारचा समावेश होतो. या प्रस्तावामुळे भविष्यात कारमधील सुरक्षा तंत्रज्ञान अधिक प्रगत होण्याची शक्यता आहे. मात्र, विशेषतः किफायतशीर कारच्या किमतींवर याचा परिणाम होऊ शकतो.

काय आहे सरकारचा प्रस्ताव?

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्यासाठी मंत्रालयाने मसुदा अधिसूचना प्रस्तावित केली आहे. त्यानुसार, नवीन M1 मॉडेल्समध्ये १ ऑक्टोबर २०३० पासून AEBS अनिवार्य करण्याची योजना आहे. पुढील दोन वर्षांत ही अट आधीपासून उत्पादनात असलेल्या संबंधित वाहनांनाही लागू करण्याचा प्रस्ताव आहे.

या मसुद्यावर नागरिक, वाहन उत्पादक आणि संबंधित घटकांना सूचना व हरकती नोंदवण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार केल्यानंतरच मंत्रालय अंतिम निर्णय घेईल. त्यामुळे सध्या हा प्रस्तावित नियम असून, तो अंतिम झाल्याशिवाय त्याची अंमलबजावणी निश्चित मानता येणार नाही.

ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम म्हणजे काय?

ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम ही अपघाताचा धोका ओळखून वाहनाला आपोआप ब्रेक लावण्यास मदत करणारी सुरक्षा यंत्रणा आहे. चालकाने संभाव्य धोक्याच्या वेळी वेळेत प्रतिसाद दिला नाही, तर ही यंत्रणा हस्तक्षेप करून वाहनाचा वेग कमी करू शकते किंवा आवश्यक परिस्थितीत वाहन थांबवण्याचा प्रयत्न करते. या तंत्रज्ञानामुळे समोरच्या वाहनाला धडक बसण्याचा धोका कमी होऊ शकतो. मात्र, प्रत्येक परिस्थितीत अपघात टाळण्याची हमी ही यंत्रणा देत नाही.

कॅमेरा आणि रडारच्या मदतीने कसे काम करते?

AEBS यंत्रणा वाहनामध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यांचा, रडारचा किंवा इतर सेन्सर्सचा वापर करून समोरच्या रस्त्यावरील परिस्थितीचे निरीक्षण करते. समोरची गाडी, पादचारी किंवा अन्य अडथळ्यामुळे धडक होण्याची शक्यता आढळल्यास ही यंत्रणा पुढीलप्रमाणे काम करू शकते.

धोक्याची ओळख: समोरच्या वाहनाचे किंवा अडथळ्याचे अंतर आणि परिस्थितीचा अंदाज घेतला जातो.

चालकाला इशारा: संभाव्य धोक्याची जाणीव करून देण्यासाठी स्क्रीनवर सूचना किंवा ध्वनीच्या माध्यमातून अलर्ट दिला जाऊ शकतो.

स्वयंचलित ब्रेकिंग: चालकाने वेळेत ब्रेक न लावल्यास यंत्रणा आपोआप ब्रेक लावून वाहनाचा वेग कमी करण्याचा किंवा वाहन थांबवण्याचा प्रयत्न करते.

छोट्या आणि स्वस्त कारच्या किमती वाढणार?

या प्रस्तावाचा सर्वाधिक परिणाम किफायतशीर कारच्या उत्पादन खर्चावर होण्याची शक्यता आहे. अनेक महागड्या कारमध्ये AEBS हे प्रगत चालक-सहाय्यक प्रणालींच्या (ADAS) पॅकेजचा भाग म्हणून दिले जाते. मात्र, स्वस्त कारच्या अनेक प्रकारांमध्ये अशी यंत्रणा सध्या उपलब्ध नसू शकते. AEBS बसवण्यासाठी कॅमेरे, रडार किंवा सेन्सर्स, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट, वायरिंग आणि संबंधित सॉफ्टवेअर यांसारख्या घटकांची आवश्यकता लागू शकते. वाहनाच्या रचनेनुसार त्यात अतिरिक्त तांत्रिक बदलही करावे लागू शकतात.

त्यामुळे वाहन उत्पादकांचा खर्च वाढण्याची शक्यता आहे. हा वाढलेला खर्च ग्राहकांपर्यंत पोहोचल्यास स्वस्त कारच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. मात्र, किमती किती वाढतील, हे तंत्रज्ञानाचा खर्च, वाहनाची रचना आणि उत्पादकांच्या निर्णयांवर अवलंबून असेल.

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या