महानपण

 


महानपण

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 4/10/2026 :

शिकून मोठं होणं म्हणजे केवळ पदव्या मिळवणं नव्हे,तर कुणाच्या तरी मनात दडलेल्या भावना समजून घेणं,न बोलताही त्याच्या मनातलं दुःख ओळखणं आणि गरजेच्या वेळी शब्दांपेक्षा कृतीतून त्याच्या सोबत उभं राहणं हेच आपल्या व्यक्तिमत्त्वातील खरं महानपण आहे.एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या आयुष्यातील यशाची मोठी यादी एका वृद्ध व्यक्तीसमोर सांगितली.मोठं शिक्षण,मोठं पद,भरपूर पैसा,समाजात प्रतिष्ठा सगळं काही त्याच्याकडे होतं.वृद्ध माणूस शांतपणे ऐकत राहिला आणि शेवटी फक्त एवढंच विचारलं;“या सगळ्यातून एखाद्या दुःखी माणसाचं दुःख कमी झालं का? ”तो प्रश्न साधा होता,पण त्यामागचा अर्थ खूप मोठा होता.कारण आयुष्य किती मोठं जगलो यापेक्षा,आपल्यामुळे किती माणसांना जगण्याचं बळ मिळालं,हे अधिक महत्त्वाचं असतं.पुस्तकं आपल्याला ज्ञान देतात,शिक्षण आपल्याला विचार करण्याची क्षमता देतं,अनुभव आपल्याला जगण्याची दिशा देतात;पण माणुसकी आपल्याला दुसऱ्याच्या मनापर्यंत पोहोचण्याची दृष्टी देते.कधी एखादा माणूस आपल्यासमोर हसत असतो,पण त्याच्या मनात अश्रू दडलेले असतात.कधी एखादी व्यक्ती “मी ठीक आहे ”असं म्हणते,पण त्या दोन शब्दांमागे अनेक न सांगितलेल्या वेदना असतात.आणि कधी एखाद्याला मदतीची गरज असते,पण स्वाभिमानामुळे तो हात पुढे करू शकत नाही.अशा वेळी त्याने मदत मागण्याची वाट न पाहता,त्याची गरज ओळखून पुढे केलेला हात हीच खरी माणुसकी!शहाणपण म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माहित असणं नव्हे;तर समोरच्याला कोणत्या क्षणी उत्तराची नव्हे,तर आधाराची गरज आहे, हे समजणं.मोठेपण म्हणजे मोठ्याने बोलणं नव्हे;तर कुणाचं मन न दुखवता आपलं सत्य मांडता येणं.यश म्हणजे गर्दीत आपली ओळख निर्माण करणं नव्हे;तर एखाद्या एकाकी माणसाला “तू एकटा नाहीस ”अशी जाणीव करून देणं.आणि महानता म्हणजे हजारो लोकांनी आपलं कौतुक करणं नव्हे;तर एखाद्या माणसाच्या आयुष्यात आपण शांतपणे केलेल्या चांगुलपणाची त्याला आयुष्यभर आठवण राहणं.म्हणूनच आयुष्याच्या वाटेवर किती शिक्षण घेतलं,किती पैसा कमावला,किती मोठं पद मिळवलं यापेक्षा किती मनं जिंकली?,किती अश्रू पुसले?,किती दुःख समजून घेतलं?,किती माणसांना आधार दिला? आणि आपल्या अस्तित्वामुळे किती आयुष्यांमध्ये थोडासा प्रकाश निर्माण झाला? याचा विचार करायला हवा.कारण “ज्ञान माणसाला हुशार बनवतं,पण संवेदनशीलता त्याला माणूस बनवते;आणि दुसऱ्याच्या मनाची भाषा समजणारा माणूस शिक्षित असण्यापेक्षा खऱ्या अर्थाने सुशिक्षित असतो. ”खरं मोठेपण उंच पदावर बसण्यात नसतं,ते दुसऱ्याला खाली पडताना पाहून त्याला हात देऊन पुन्हा उभ करण्यात असतं.शिकलेली माणसं अनेक असतात,पण समजून घेणारी माणसं फार थोडी असतात.आणि जगाला सर्वाधिक गरज यशस्वी माणसांची नाही,तर संवेदनशील माणसांची आहे.

"मित्रांनो;काळजी घ्या. ..."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या