मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 6/10/2026 :
आपण एकमेकांसोबत समाजात वावरत असताना अनेकदा 'तुझे-माझे' सुरू होते; 'तू आणि मी' असा संकुचित भेदभाव जाणवू लागतो. बऱ्याचदा "माझे ते तर माझेच, पण तुझे तेही माझेच!" अशी लोभी प्रवृत्ती दिसून येते. यामधून काही लोकांची टोकाची स्वार्थी वृत्ती उघडी पडते, तर दुसऱ्या बाजूला निष्पाप माणसांवर अन्याय होतो.
हे 'माझे-तुझे' केवळ कुटुंबापुरतेच मर्यादित राहत नाही; तर संपूर्ण समाजात त्याचे विपरीत पडसाद उमटतात. जिथे जिथे स्वतःचा हक्क गाजवता येईल, तिथे तिथे "हे माझे आहे" म्हणून मालकी गाजवली जाते; आणि जिथे प्रत्यक्ष कर्तव्य करण्याची वेळ येते, तिथे मात्र "हे तुझे काम आहे" म्हणून सहज जबाबदारी झटकली जाते.
खरे तर संकुचित 'माझे-तुझे' करण्याऐवजी प्रत्येकाने "हे आपले आहे" म्हटले, तर जीवन किती सोपे आणि सुंदर होईल, जबाबदारी असेल तरी ती सर्वांमध्ये आनंदाने वाटून घेतली जाईल; कोणतेही अवघड काम असेल तरी योग्य कार्यविभागणी होईल. परस्पर सहकार्यातून केलेले कोणतेही कार्य सर्वांनाच एक आगळावेगळा आनंद आणि मनाला तृप्त समाधान देते.
आजचा संकल्प
कोणतेही कार्य करताना 'माझे-तुझे' अशी स्वार्थी विभागणी न करता, "हे आपले आहे" या उदात्त भावनेने व जिव्हाळ्याने एकत्र येऊन करू आणि सहकार्याचा निखळ आनंद घेऊ.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या