शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, तर पदवीधरसाठी ६२.७८ टक्के मतदान; पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षक मतदारसंघात सातारा आघाडीवर

 शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, तर पदवीधरसाठी ६२.७८ टक्के मतदान; पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षक मतदारसंघात सातारा आघाडीवर 

वृत्त एकसत्ता न्यूज   

आकाश भाग्यवंत नायकुडे 

 पुणे / अकलूज दिनांक 24/10/2026 : सकाळपासून मतदान केंद्रांवर लागलेल्या रांगा, मतदानासाठी दाखल झालेले उमेदवार आणि केंद्रांबाहेर पदाधिकाऱ्यांची गर्दी अशा वातावरणात शुक्रवारी (दि. २३) पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले. मतदान संपल्यानंतर शिक्षक मतदारसंघात ८५.८७ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६२.७८ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याने ७१.४२ टक्के मतदानासह आघाडी घेतली, तर शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८९.३९ टक्के मतदान नोंदविण्यात आले.

पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दोन्ही मतदारसंघांत सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. सकाळपासूनच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर दाखल होत होते. पुण्यासह अन्य जिल्ह्यांमध्येही मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उमेदवारांनीही मतदान केले. विभागीय आयुक्त शीतल तेली आणि पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रांबाहेर विविध उमेदवारांच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी दिसून आली.

पदवीधरसाठी २ लाख ४३ हजार मतदारांचे मतदान

पदवीधर मतदारसंघातील एकूण ३ लाख ८८ हजार १९ मतदारांपैकी २ लाख ४३ हजार ६११ मतदारांनी मतदान केले. त्यामध्ये १ लाख ६८ हजार ३८२ पुरुष, ७५ हजार २२७ महिला आणि दोन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७१.४२ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल सातारा ६६.९२ टक्के, कोल्हापूर ६३.८३ टक्के आणि पुणे जिल्ह्यात ६१.४७ टक्के मतदान नोंदविण्यात आले. सांगली जिल्ह्यात सर्वांत कमी ५५.६२ टक्के मतदान झाले. मतदान करणाऱ्यांची संख्या मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ७३ हजार १२९ इतकी होती. पुणे जिल्ह्यात ५४ हजार २२१ पदवीधर मतदारांनी मतदान केले.

शिक्षक मतदारसंघात ५३ हजारांहून अधिक मतदारांचा सहभाग -

शिक्षक मतदारसंघातील एकूण ६१ हजार ९४० मतदारांपैकी ५३ हजार १८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ३३ हजार ३०२ पुरुष, १९ हजार ८८० महिला आणि तीन तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. शिक्षक मतदारसंघात सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८९.३९ टक्के मतदान झाले. सोलापूरमध्ये ८९ टक्के, कोल्हापूरमध्ये ८८.६२ टक्के आणि सांगलीमध्ये ८७.८३ टक्के मतदान नोंदविण्यात आले. पुणे जिल्ह्यात ७८.०८ टक्के मतदान झाले. विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये शिक्षक मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ८७ टक्क्यांपेक्षा अधिक राहिली.

==================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या