2) क्षमा गेली परती
|| ज्ञानदेव म्हणे ||
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 8/10/2026 :
माणूस जेंव्हा इतरांना क्षमा करतो, तेंव्हा तो त्या इतरांवर नाही तर स्वतःवर उपकार करत असतो. क्षमाशील असणं म्हणजे माघार घेण्याची वृत्ती असणं, असं नसतं. तर ते आपल्या मोठ्या मनाचं द्योतक असतं.
आपण इतरांना माफ करतो, तेंव्हा आपण शांत आणि शीतल आहोत हे आता जगाला वेगळं सांगण्याची गरज उरत नाही. आपल्यातल्या क्षमेनं भविष्यातील येणाऱ्या अनेक संकटांना आधीच थोपवलेलं असतं. हे इतकं सहज घडलेलं असतं की, ते आपल्या लक्षातही येत नाही.
शिक्षा करण्यात, दोष देण्यात, रागावण्यात मनाचं इतकं मोठेपण नसतं, जितकं माफ करण्यात, सोडून देण्यात आणि शांत राहण्यात असतं. पण असं संगळीच माणसं सगळ्यांच्याच बाबतीत करू शकत नाही. याचं कारण म्हणजे, त्यांच्यातला अहंकार.
माऊली ज्ञानोबाराय म्हणतात,
क्षमा गेली परती,
अहंकार सांगाती |
ते ओढूनिया नेती,
अघोरासी ||
"जेंव्हा माणसातली क्षमा ही वृत्ती निघून जाते तेंव्हा त्याच्यात आवर्जून अहंकार येऊन रहात असतो. आणि एकदाका अहंकार येऊन बसला की मग तो त्या जीवाला घोर दुःखात घेऊन गेल्याशिवाय राहात नाही."
आपला अहंकार प्रथम दर्शनी समोरच्याला दुःख देणारा आणि स्वतःला असुरी आनंद मिळणारा वाटत असला तरी, माऊलींच्या म्हणण्यानुसार शेवटी तो स्वतःच्याच जीवाला घोर दुःखात घेऊन जाणारा आहे.
म्हणून, अहंकार सोडा, असं सांगणं नाही तर क्षमावृत्ती स्वीकारा, ही विनंती आहे. जेंव्हा आपण चांगलं काही स्वीकारतो तेंव्हा त्याच्या विरुद्ध असणारं जे काही वाईट असेल, ते आपोआप निघून जात असतं.
म्हणजे, खोटं बोलणं बंद करायची गरज नसते. खरं बोलणार हे ठरवायचं असतं. जेंव्हा खरंच बोलणार, हे ठरवलं जातं तेंव्हा खोटं बोलण्याचा प्रश्नच नसतो.
अहंकारात जसं आपलं नुकसान आहे, तसं क्षमाशील नसण्यात नुकसान आहे. कारण, शेवटी आपण ज्याला शिक्षा किंवा दोष देतो, तेंव्हा तो सुद्धातर मनात आपल्याविषयी सुडबुद्धी ठेवणारच. म्हणून तर, तुकोबाराय म्हणतात,
क्षमाशस्त्र जया नाराचिये हाती |
*दुष्ट तयाप्रति काय करी? ||
माफी देण्याचं शस्त्र ज्या माणसाच्या हातात असणार, त्याचं समोरच्या दुष्ट मनुष्य सुद्धा काहीही वाईट करू शकणार नाही."
पहा मित्रांनो, हे इतकं सोपं आहे. सोडून द्या, माफ करा.
|| रामकृष्णहरी ||
विजय गवळी
छत्रपती संभाजीनगर
9422207694 ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या