📖✒️नात्यांची गर्दी आणि आपण.

 

📖✒️नात्यांची गर्दी आणि आपण.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्याला अनेक चेहरे भेटतात, अनेक नाती जोडली जातात. पण कधी शांतपणे विचार केलाय का, या नात्यांच्या गर्दीत खरंच किती जिव्हाळा उरलाय?

​पूर्वी प्रेमात त्याग असायचा, निष्ठा असायची, भक्ती आणि निस्वार्थ समर्पण असायचं. पण आजकाल काळाच्या प्रवाहात प्रेम आणि नातीसुद्धा निव्वळ फॉरवर्डेड मेसेज सारखी निस्तेज आणि अर्थहीन झाली आहेत. आज आजूबाजूला नजर टाकली की एकच जळजळीत सत्य समोर येतं, इथे खरं असं काही उरलंच नाहीये, जे काही दिसतंय, तो फक्त आणि फक्त रचलेला एक देखावा आहे. दिखावा प्रेमाचा, दिखावा खोट्या जिव्हाळ्याचा, दिखावा मैत्रीचा आणि दिखावा वरकरणी जपल्या जाणाऱ्या गोड नात्यांचा.

​इथे प्रेम किंवा नातं म्हणजे मला फक्त गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डचा विषय मांडायचा नाहीये. समाजातल्या कोणत्याही नात्यात आज पूर्वीसारखा तो काळजाला भिडणारा ओलावा आणि निखळ आपलेपणा उरलेलाच नाही. जो-तो फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समोरच्याचा सोयीनुसार वापर करतोय. काम फत्ते झालं, की क्षणाचाही विचार न करता नाती कचऱ्यासारखी फेकून दिली जातात!

​हो, याला काही अपवाद नक्कीच असतील. आजही काही सत्त्वशील माणसं कोणतीही अपेक्षा न ठेवता, हृदयाच्या कोपऱ्यात नाती जपतात. पण दुर्दैवाने. अशी माणसं आज लाखात एक शोधूनही सापडणार नाहीत.

​तुम्हीच जरा थांबून, स्वतःच एक कठोर अनुभव घेऊन पहा, ज्या दिवशी तुम्ही आयुष्यातल्या एखाद्या सर्वात मोठ्या संकटात सापडाल, प्रचंड मानसिक तणावाखाली असाल. तेव्हा तुमच्या फोनमधील त्या शेकडो-हजारो कॉन्टॅक्ट्सपैकी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्यांची नावं आठवून पहा. उत्तर शोधताना एका हाताची बोटंही जास्त वाटू लागतील.

​त्याच क्षणी माणसाला वास्तवाचा एक जोरदार चटका बसतो की, इतके दिवस आपण ज्यांना आपली माणसं म्हणून मिरवत होतो, ती तर फक्त आपल्याभोवती जमलेली स्वार्थाची गर्दी होती! आणि आपण वर्षानुवर्षे केवळ लोकांच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी, मृत झालेल्या नात्यांचं प्रेत पाठीवर वाहून नेत होतो.

म्हणूनच मला वाटतं, जगाला दाखवण्यासाठी नात्यांची ही पोकळ गर्दी जमवण्यापेक्षा, वेळेवर हे ओझं उतरवून फेका, हाताच्या बोटांवर मोजता येतील अशा दोन-चार खऱ्या, जिवाभावाच्या माणसांच्या सहवासात शांततेने जगणं. हेच खरं आयुष्य आहे आणि हाच खरा आनंद आहे.

©️श्रद्धा धनेश डायरी 

===============

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या