🎯 समानशीलव्यसनेषु सख्यम्
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/9/2026 :
एक गाण्याचा कार्यक्रम सुरू असतो, समोरच्या रांगेत बसलेले आजोबा सारखं, 'छे! छे! असं म्हणून मान हलवत असतात, आजुबाजुच्या लोकांना पण ते पाहून गाणं चांगलं नाही असं वाटायला लागतं. कार्यक्रम संपल्यावर एकाने आजोबांना विचारलं, "काय आजोबा, गाणं आवडलं नाही का?" तर ते म्हणाले, "अतिशय उत्तम कार्यक्रम होता, फारच सुंदर गाणं झालं." ऐकणाऱ्याला आश्चर्य वाटून तो म्हणाला, "मग सारखं, 'छे, छे!' असं का म्हणत होता?" "अरे, ते मी म्हणत होतो की छे छे, याच्यासारखं गाणं कोणालाच जमणार नाही." हा किस्सा संकर्षण कऱ्हाडे यांनी 'श्रोत्यांची योग्य दाद किती महत्त्वाची असते' याचे उदाहरण म्हणून, त्यांच्या एका सादरीकरणांमध्ये सांगितला होता. आजोबांनी दिलेल्या चुकीच्या प्रतिक्रियेमुळे इतरांच्या विचारांवर नकारात्मक प्रभाव टाकला होता.
निसर्गतःच आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसं, त्यांचे शब्द, त्यांची देहबोली, कळत नकळत आपल्या विचारांवर प्रभाव पाडत असते. त्यामुळे आपण कोणाच्या सोबत, कोणाच्या संगतीत असतो त्यावर आपलं भविष्य कसं असेल ते ठरत असतं. असं म्हणतात की सहा व्यापाऱ्यांसोबत तुम्ही एक वर्ष राहिलात, तर तुम्ही सातवे व्यापारी बनता. सहा जुगारी व्यक्तींसोबत तुम्ही राहिलात, तर सातवे जुगारी तुम्ही बनता. सहा मद्यपी व्यक्तींसोबत तुम्ही सतत राहिलात तर सातवे मद्यपी तुम्ही बनता. म्हणूनच संगत, सोबत अत्यंत विचारपूर्वक निवडायला हवी. इंग्रजी वाक्प्रचार 'शो मी युवर फ्रेंड्स अँड आय विल शो यू युअर फ्युचर' तेच सांगतो. शेजारीण सारखी तिच्या सासूला नाव ठेवत असेल तर हळूहळू स्वतःची सासू पण खाष्ट वाटायला लागते. तीन मैत्रिणी सतत त्यांच्या मित्रांबद्दल बोलत असतील तर चौथीला पण 'आपला मित्र असायला हवा' असं वाटू लागतं. गावाकडच्या भाषेत सांगायचं तर 'ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला' असं म्हणतात. मग आपण ढवळ्याच्या शेजारी थांबायचे की नाही ते पण सुज्ञपणेच ठरवायला हवं.
एक संस्कृत सुभाषित आहे, मृगा मृगैः सङ्गमुपव्रजन्ति, गावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः। मूर्खाश्च मूखैः सुधियः सुधीभिः, समानशीलव्यसनेषु सख्यम् ॥ याचा अर्थ सारखे विचार आणि सारख्या सवयी असणाऱ्या व्यक्तींची पटकन मैत्री होते. 'असंगाशी संग, प्राणाशी गाठ' अशी मराठीत एक प्रसिद्ध म्हण आहे. त्याचा अर्थ दुर्जन व्यक्तींची संगत ठेवली तर स्वतःचे प्राण धोक्यात येऊ शकतात. एकंदरीत सर्व संस्कृतींमध्ये, सर्व भाषांमध्ये व्यक्तींची संगत काय असावी याला महत्त्व दिलं आहे. संगत विचारांवर प्रभाव टाकते, विचारांवर कृती ठरते आणि कृती असेल तसं तुमचं भविष्य ठरत असतं हे निर्विवाद सत्य आहे, आपल्या आयुष्यात नकारात्मकता वाढत असेल तर एकदा आजूबाजूला नकारात्मक विचारांची कोणी व्यक्ती आहे का ते पण तपासून पाहायला हवं आणि प्रयत्नपूर्वक अशा लोकांपासून दूर राहायला हवं तेव्हाच तुम्ही प्रगती करू शकाल.
✍️शिल्पा करमरकर : ७८४१०४४०४०
(लेखिका महसूल अधिकारी आहेत.)
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
▣▬▬▬✥⊰༺☬༒☬༻⊱✥▬▬▣
0 टिप्पण्या