मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/9/2026 :
'एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ'_ असे संतवचनात सांगण्यामागचा उदात्त हेतू हाच आहे की, आपण प्रत्येकाने एकमेकांना सतत मदत करावी, एकमेकांना प्रेमाने मदतीचा हात द्यावा.
मदत करणे म्हणजे केवळ आर्थिक साहाय्य करणे किंवा धान्य व वस्तू देणे इतकेच नसते; तर एखाद्याला आधाराचे चार शब्द सांगणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मनोधैर्य देणे हीसुद्धा खूप मोठी मदत ठरते.
अगदी एखाद्या दुःखी माणसाला स्वतःचे मन मोकळे करायचे असेल, तर त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि त्याला भावनिक विश्वास देणे हीसुद्धा त्या व्यक्तीसाठी लाखमोलाची ठरते. "माझ्याकडे देण्यासारखे काहीच नाही, मग मी कोणाला काय मदत करणार?", हा संकुचित विचार पूर्णपणे चुकीचा आहे.
आजचा संकल्प
जीवनात अनेक कठीण प्रसंग असे येतात, जिथे आपल्याला ऐनवेळी कोणाचे तरी मोलाचे सहकार्य लाभते आणि आपण संकटातून पुढे जातो; याच कृतज्ञ भावनेने आपणही गरजू व्यक्तीला योग्य वेळी मदतीचा हात देऊ आणि श्रेष्ठ मानवता धर्म पाळू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या