📖✒️मी कोण आहे? : स्व-ओळखीचा शोध.✍️

 

📖✒️मी कोण आहे? : स्व-ओळखीचा शोध.✍️ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/9/2026 :

माणूस आयुष्यात हजारो माणसांना भेटतो. प्रत्येक जण आपल्याला एक नवा सल्ला देतो, आपल्यात बदल सुचवतो आणि कधीकधी नकळत आपल्याला त्याच्या साच्यात ढकलण्याचा प्रयत्न करतो. "तू असा हवा होतास," "तू तशी असायला हवी होतीस" हे विधान आपण आयुष्यात कितीतरी वेळा ऐकतो. सुरुवातीला आपण दुसऱ्यांना खूश करण्यासाठी, त्यांना 'इंप्रेस' करण्यासाठी स्वतःचे मूळ व्यक्तिमत्त्व बाजूला ठेवतो आणि त्यांच्या आवडीनुसार जगू लागतो. पण काही काळ लोटल्यानंतर अंतर्मनातून एकच प्रश्न वर येतो, "मी नक्की कोण आहे?

​दुसऱ्यांच्या अपेक्षेनुसार जगताना आपण काही काळासाठी नक्कीच भरकटतो. ज्या गोष्टींचे आपल्याला सुरुवातीला प्रचंड आकर्षण किंवा कुतूहल वाटत असते, त्या मिळवल्यानंतर किंवा त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर लक्षात येते की, ज्या गोष्टीसाठी आपण स्वतःचे अस्तित्व पणाला लावले होते, तिला तितके महत्त्व देण्याची अजिबात गरज नव्हती.

​अनुभव हा जगातील सर्वात मोठा शिक्षक आहे. तो आपल्याला हळूहळू शहाणं करतो. लोकांचे चांगले बदल नक्कीच स्वीकारले पाहिजेत, स्वतःमध्ये सुधारणा करणे हाच तर प्रगतीचा पाया आहे. परंतु, हे सर्व करताना आपली मूळ ओळख, आपला स्वाभिमान आणि आपल्या अंतर्मनाचा तो सहज-सुंदर भाव जपता आला पाहिजे.

​आपला खरा आनंद कशात आहे? आपले खरे प्राधान्य कशाला आहे? हे ज्या दिवशी आपल्याला कळते, त्याच दिवशी आपण दुसऱ्यांच्या प्रभावातून मुक्त होतो. अंतर्मनाचा होकार मिळणे हीच खरी जगण्याची पावती आहे. कारण लोकांच्या टाळ्या मिळवण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत प्रामाणिक राहण्यात जो आनंद आहे, तो जगातील कोणत्याही कौतुकात नाही.

शेवटी जगणे इतकेच आहे, लोक येतात, मत मांडतात आणि निघून जातात. पण दिवस अखेर जेव्हा आपण शांतपणे डोळे मिटतो, तेव्हा आपल्याला स्वतःच्या अस्तित्वाचा आणि आपलेपणाचा जो शांत अनुभव येतो, तोच आपला खरा मी असतो. तो जपणे, वाढवणे आणि त्यातच आनंद शोधणे म्हणजेच खरे आयुष्य.

©️श्रद्धा धनेश डायरी ═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या