मॅनिफेस्टेशनमध्ये साम, दाम, दंड, भेद वापरू नका!

 

मॅनिफेस्टेशनमध्ये साम, दाम, दंड, भेद वापरू नका!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

आपल्याला एखादी गोष्ट मनापासून हवी असते. एखादं स्वप्न पूर्ण व्हावं असं वाटतं किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात असावी अशी इच्छा असते.

मग ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण अनेकदा खूप प्रयत्न करतो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा—मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्त “मला हे मिळालंच पाहिजे” असा हट्ट नाही.

आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद वापरून एखाद्या व्यक्तीवर दबाव आणणे, तिच्या भावनांशी खेळणे, तिला manipulate करणे किंवा परिस्थिती आपल्या मनासारखी वळवण्याचा प्रयत्न करणे—हा मॅनिफेस्टेशनचा सुंदर मार्ग नाही.

कारण प्रश्न फक्त एवढाच नाही की— *“मला ते मिळालं का?”*

खरा प्रश्न आहे— *“ते मिळाल्यानंतर मला त्यातून काय मिळणार आहे?”*

मला सुख मिळणार आहे का? मला मनःशांती मिळणार आहे का? मला प्रेम मिळणार आहे का? मला आदर मिळणार आहे का? मला समाधान मिळणार आहे का? 

*समजा तुम्हाला एखादी व्यक्ती आयुष्यात हवी आहे.* तुमची इच्छा आहे की ती व्यक्ती तुमच्याशी प्रेमाने बोलावी, तुमच्यासोबत राहावी, तुमचं नातं सुंदर व्हावं.

पण ती व्यक्ती तुमच्यासोबत असली, तरी तिच्या मनात प्रेम नसेल, संवाद नसेल, आदर नसेल, मनःशांती नसेल… तर फक्त “ती व्यक्ती माझ्यासोबत आहे” एवढ्याने तुम्ही आनंदी व्हाल का? कदाचित नाही.

म्हणूनच मॅनिफेस्टेशन करताना फक्त “मला काय हवं आहे?” एवढंच विचारू नका.

त्यासोबत स्वतःला विचारा— “मला हे का हवं आहे?”

आणि त्याहून महत्त्वाचं— “हे माझ्या आयुष्यात आल्यानंतर मला कोणता अनुभव घ्यायचा आहे?”

✅जर तुम्हाला प्रेम हवं असेल, तर प्रेमाची भावना मॅनिफेस्ट करा.

✅जर तुम्हाला सुख हवं असेल, तर सुखाची भावना मॅनिफेस्ट करा.

✅जर तुम्हाला शांतता हवी असेल, तर मनःशांतीला प्राधान्य द्या.

✅जर तुम्हाला सुंदर नातं हवं असेल, तर त्यात परस्पर आदर, विश्वास, संवाद आणि स्वातंत्र्य यांनाही स्थान द्या.

कारण मॅनिफेस्टेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न नाही.

मॅनिफेस्टेशन म्हणजे— आपली इच्छा स्पष्ट करणे,

आपल्या भावनांची जाणीव ठेवणे, स्वतःमध्ये योग्य बदल घडवणे, योग्य कृती करणे आणि परिणाम परमेश्वरावर सोपवणे. कधी कधी आपण एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा विशिष्ट गोष्टच आपल्या सुखाचं कारण आहे असं मानतो. पण परमेश्वराकडे कदाचित त्यापेक्षा सुंदर मार्ग असू शकतो.

म्हणून प्रार्थना अशी असू शकते -

“परमेश्वरा, मला काय हवं आहे हे मी तुला सांगतो. माझी इच्छा आणि माझ्या भावनांची तुला जाणीव आहे. पण हे माझ्यासाठी आणि संबंधित प्रत्येकासाठी योग्य असेल, तर योग्य मार्गाने ते माझ्या आयुष्यात येऊ दे. आणि जर त्यापेक्षा सुंदर काही माझ्यासाठी असेल, तर ते स्वीकारण्याची बुद्धी आणि श्रद्धा मला दे.” 

कारण शेवटी फक्त गोष्ट मिळणं महत्त्वाचं नाही. ती मिळाल्यानंतर मनाला मिळणारं सुख, प्रेम, शांतता आणि समाधान महत्त्वाचं आहे. 

*म्हणून मॅनिफेस्टेशनमध्ये हट्टापेक्षा श्रद्धा, Manipulation पेक्षा प्रेम, भीतीपेक्षा विश्वास, आणि नियंत्रणापेक्षा समर्पण ठेवा.*

तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी मनापासून प्रयत्न करा, पण कोणाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन नाही.

कारण सुंदर मॅनिफेस्टेशन तेच ज्यात तुमची इच्छा पूर्ण होते… पण त्यासोबत तुमच्या मनातही प्रेम, आनंद, शांती आणि कृतज्ञता निर्माण होते. 

✍🏻-श्री राजेंद्र कुलकर्णी

मॅनिफेस्टेशन गुरु व लाइफ कोच

9930653355 / 9167663355


😊

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या