📖✒️संसाराचा सिक्वेन्स आणि जोकरची भ्रमंती.✍️

📖✒️संसाराचा सिक्वेन्स आणि जोकरची भ्रमंती.✍️

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/9/2026 :

​अहो, काय कमाल आहे ना या पत्त्यांच्या खेळाची आणि आयुष्याची, रमी खेळताना जेव्हा सिक्वेन्स जुळत नाही, तेव्हा आपण पटकन एक जोकर वापरतो आणि सहज डाव जिंकतो. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आयुष्यात नात्यांचा सिक्वेन्स बिघडल्यावर बाहेरून एखादा जोकर आणून तो डाव का पूर्ण करता येत नाही? विचार केला ना, तर अंगावर काटा येतो. हे आजच्या मानवी नात्यांचं एक विषण्ण आणि कटू वास्तव आहे.

​आयुष्याच्या रंगमंचावर आपण सगळेच एका परिपूर्ण सिक्वेन्सच्या शोधात असतो. लग्न ठरताना किंवा नात्याच्या सुरुवातीला किती स्वप्न, वाटतं की संसार सुखद पार पडेल. पण वेळ निघून जाते अन लक्षात येतं. अरे, इथे तर जुळवाजुळव होतच नाहीये, पहिल्या काही वर्षांतच नात्याला तडे जातात; पण "वेळ गेल्यावर सगळं ठीक होईल" या अंधाऱ्या आशेपोटी आपण गप्प सोसत राहातो.

​माणूस आधी समजून घेतो, मग ॲडजस्ट करतो आणि शेवटी उरते निमूट सोशिकता, जेव्हा सहनशक्ती संपते आणि घरातला संवाद गोठून जातो, तेव्हा माणूस बिघडलेला सिक्वेन्स जोडण्यासाठी बाहेर जोकर शोधू लागतो. वाटतं, ही व्यक्ती आपल्याला विसावा अन् सहानुभूती देईल. पण केवढा मोठा भ्रम हा, बाहेरचा हा जोकर स्वतःसुद्धा एका मोडलेल्या नात्याची दुःखद कहाणी छातीशी बाळगून आहे. तोही स्वतःच्या फाटलेल्या आयुष्याला ठिगळ लावण्यासाठीच भटकतोय.

​परिणामी काय होतं? दोन दुखावलेले, अपूर्ण आत्मे एकत्र येतात. पण यामुळे मूळ डाव कधीच पूर्ण होत नाही; उलट तो अजून गुंतागुंतीचा आणि वेदनादायी बनतो.

​कॅटमधला जोकर कुठेही बसतो आणि खेळ जिंकवतो, हे फक्त पत्त्यांपुरतंच खरं आहे. रक्तामांसाच्या जिवंत नात्यांत बाहेरचा माणूस तुमची पोकळी कधीच भरू शकत नाही.

ज्या नात्यात संवादच संपलाय आणि जिथे एकमेकांना समजून घेण्याची इच्छाच उरलेली नाही, तिथे बाहेरून आणलेला कोणताही माणूस ती पोकळी भरून काढू शकत नाही; उलट तो संघर्षाचा एक नवा आणि वेदनादायी अध्याय सुरू करतो. उसवलेली नाती ही बाहेरच्या कुबड्यांवर कधीच उभी राहत नाहीत. ती जर खरोखरच जोडायची असतील, तर स्वतःच्या चुकांचं भान आणि समोरच्याला समजून घेण्याची तयारीच लागते.

म्हणूनच शेवटी एवढं म्हणावसं वाटतं. दुसऱ्या कोणाच्यातरी आयुष्यातला जोकर बनून स्वतःच्या दुःखावर ठिगळ लावण्यापेक्षा, स्वतःच्या डावातल्या चुका स्वीकारून तो प्रामाणिकपणे खेळणं किंवा वेळीच मानसन्मानाने तो डाव गुंडाळणं. यातच आयुष्याची खरी सुज्ञानता आहे.

©️श्रद्धा धनेश

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या