वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/09/2026 :
आई आणि आजी या दोन नात्यांमध्ये मायेचा सागर भरलेला असतो. बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष त्या छोट्याशा जीवाकडे लागलेले असते. आई त्याला जन्म देते, त्याच्यासाठी दिवस-रात्र कष्ट करते. पण त्या मायेच्या सावलीत अजून एक व्यक्ती असते ती म्हणजे आजी.
बाळ झाल्यानंतर रात्री रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी फक्त आईच जागत नाही, तर एक प्रेमळ आजीही तितक्याच मायेने जागत असते. आई थकली की बाळाला कुशीत घेऊन झोपवणारी, अंगाई गीत गाणारी आणि प्रेमाने डोक्यावरून हात फिरवणारी आजी असते. तिच्या अनुभवात वर्षांचे ज्ञान असते आणि तिच्या मायेची ऊब बाळाला सुरक्षिततेची जाणीव करून देते.
आजीचे प्रेम खूप वेगळे असते. ती बाळाच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देते. कधी बाळ रडले तर लगेच समजते, कधी भूक लागली आहे, कधी झोप येते आहे. आईच्या मायेबरोबर आजीचे जिव्हाळ्याचे प्रेम मिळाले की बाळाचे बालपण अधिक सुंदर आणि आनंदी बनते.
घरात आजी असली की घराला वेगळीच ऊब मिळते. तिच्या गोष्टी, तिचे अनुभव आणि तिचे प्रेम यामुळे घरातील वातावरण अधिक जिवंत आणि आनंदी होते. बाळाला वाढवताना आईसोबत आजीही तितक्याच मनापासून सहभागी होते. त्यामुळे बाळाच्या संगोपनात तिचा वाटा खूप मोठा असतो.
खरं तर आई बाळाला जन्म देते, पण आजी त्या बाळाच्या बालपणाला मायेचा स्पर्श देते. म्हणूनच म्हणतात, बाळ झाल्यानंतर फक्त आईच नाही, तर एक प्रेमळ आजीही रात्रीभर जागत असते. तिच्या मायेची ऊब ही बाळासाठी आयुष्यभराची अमूल्य संपत्ती असते.
काही लोकांना दुसऱ्याच्या लेकराबद्दल बोलायची इतकी सवय असते की, जणू काही तेच डॉक्टर आणि तज्ञ आहेत. कोणी म्हणतं, “नाक चोळा सरळ होईल.” कोणी म्हणतं, “हात पाय बघा जरा बारीक आहेत.” तर काही जण तर बाळाच्या रडण्यावरूनही अंदाज लावायला लागतात, “हे बाळ खूप रडतं, काहीतरी कमी आहे बहुतेक.”
अहो, बाळ म्हणजे खेळणं नाही आणि त्याचं रूप बघून उगाच बोलायची गोष्टही नाही. प्रत्येक लेकरू देवाने जसं बनवलंय तसंच सुंदर असतं. त्याच्यात दोष शोधणं म्हणजे देवाच्या निर्मितीवरच बोट ठेवण्यासारखं आहे.
गावाकडं एक गोष्ट खरी आहे, लेकरू छोटं असलं तरी त्याचा मान मोठा असतो. त्याच्याबद्दल उगाच बोलणारे लोक स्वतःचं छोटेपण दाखवतात. आई-वडील आणि आजी आजोबा त्या बाळावर जीवापाड प्रेम करत असतात. त्यामुळे त्याच्या रूपावर, रंगावर किंवा अंगावर बोलणं म्हणजे त्यांच्या मनाला टोचणी लावण्यासारखं असतं.
म्हणून दुसऱ्याच्या लेकराबद्दल बोलण्यापेक्षा दोन गोड शब्द बोला, आशीर्वाद द्या. कारण लेकरं देवाघरची फुलं असतात. त्यांच्यावर टीका नाही, तर माया शोभते.
आणि शेवटी एकच,
दुसऱ्याच्या लेकरावर नावं ठेवणारे खूप भेटतात, पण त्या लेकरावर मनापासून प्रेम करणारेच खरे मोठे माणूस असतात.
म्हणून दुसऱ्याच्या लेकरावर उगाच नावं ठेवण्यापेक्षा दोन गोड शब्द बोला, आशीर्वाद द्या. लेकरू छोटं असलं तरी त्याचा मान मोठा असतो. त्या निरागस जीवाच्या हसण्यातच घराचं खरं सुख दडलं असतं.
आणि एक गोष्ट विसरू नका, आईसोबत आजीही त्या बाळासाठी रात्रंदिवस जागत असते, त्याची काळजी घेत असते. तिच्या मायेचा हात नेहमी त्या लेकराच्या डोक्यावर असतो. आजीचं प्रेम आणि तिची काळजी हीच त्या बाळाची खरी संपत्ती असते.
✍️ सौ प्रार्थना देशमुख,
✒️संकलन : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या