कहानी कोका - कोलाची
माहिती सेवा ग्रुप पेठवडगाव
वृत्त एक सत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/8/2026
आपण आजूबाजूला अनेक प्रकारची शीतपेय पाहतो आणि त्यांचा मनसोक्त आस्वादही घेत असतो. शीतपेयांनी अगदी जगभरातील बाजारपेठ काबीज केलेली आहे हे वास्तव कुणाला नाकारता येण्याजोगं नाही आणि तेही शीतपेय आरोग्याला हानिकारक असतात हे सत्य जगासमोर वेळोवेळी मांडलं जात असतानाही! जगभरातून निरनिराळ्या ठिकाणी वेगवेगळी पारंपरिक शेतपेय पूर्वापार वापरली जात असली; तरी बाटलीबंद शीतपेय एकाच वेळी संपूर्ण जगातून लोकप्रिय बनवणं आणि मोठी बाजारपेठ तयार करण्याचं श्रेय मात्र आपल्याला कोका-कोलाला द्यावं लागतं.आता आपण कोका-कोलाचीच कहाणी अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
भारतीय बाजारपेठेतून आता कोका-कोला बराच मागे पडला असला, तरी जगातल्या इतर भागात; विशेषतः अमेरिकेत तो अजूनही लोकप्रिय आहे. कोका-कोला हा बाटलीबंद शीतपेयातील सर्वात जुन्या ब्रँडपैकी एक आहे हेही येथे ठळकपणे नोंदवावं लागेल. कोका-कोलाच्या बाटलीवरही Since 1886 असं छापलेलं असतं; त्यावरूनच आपल्याला त्याची कल्पना येईल.अमेरिका हेच कोका-कोलाचं जन्मस्थानही आहे.
कोका-कोलाचे जन्मदाते कोण?... असा प्रश्न आपल्या मनात जरूर आला असेल. त्यांचं नाव आहे डॉक्टर जॉन पेम्बर्टन. डॉक्टर पेम्बर्टन हे फार्मासिस्ट होते. ते जॉर्जिया राज्यातील नॉक्सविले शहराचे रहिवासी होते.1831 साली जन्मलेल्या जॉन पेंबरटन यांनी 1861 ते 1865 ह्या काळात सुरू असलेल्या अमेरिकन यादवी युद्धात भाग घेतला होता. ह्याच यादवी युद्धा दरम्यान 1865 मध्ये कोलंबस येथे झालेल्या लढाईत त्यांच्या छातीत गोळी लागली.सुदैवाने गोळी जीवघेणी ठरली नाही.
कोलंबसच्या लढाईत जॉन पेम्बर्टन गोळी लागूनही वाचले असले, तरी पुढे मात्र त्या गोळीच्या जखमेत होणाऱ्या असह्य वेदनेने त्यांचा जीवनभर पिच्छा पुरवला. ह्या सतत होणाऱ्या वेदनेवर वेदनाशामक म्हणून ते मॉर्फिनचा सातत्याने वापर करीत. त्यावेळी वेदनाशामक औषध म्हणून मॉर्फिनचाच सर्रास वापर केला जायचा. मॉर्फिन वेदनाशामक असलं तरी तो आहे अंमली पदार्थ.त्याची हळूहळू मेंदूला सवय होत जाते. त्याचं प्रमाण वाढतं आणि व्यसन लागतं.डॉक्टर पेम्बर्टननाही मॉर्फिनचं व्यसन लागलं.
आपलं हे व्यसन सोडवण्यासाठी आणि वेदनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर पेम्बर्टन यांनी मॉर्फिनविरहित वेदनाशामक औषध तयार करण्याचे प्रयोग सुरू केले.तसं वेदनाशामक औषध त्यांनी तयार केलं.ह्या नव्या औषधाला त्यांनी नाव दिलं पेम्बर्टन्स फ्रेंच वाईन कोका असं. त्यानंतर सैनिकांमध्ये येणारं नैराश्य मानसिक तणाव व वेदनाशामक म्हणून हे औषध उपयोगी ठरू लागला.
पेम्बर्टन ह्यांनी तयार केलेल्या नव्या औषधांत मॉर्फिन नसलं, तरी अल्कोहोल होतं. नंतरच्या काळात अमेरिकी सरकारने औषधाच्या निर्मितीत अल्कोहोलच्या वापरावर प्रतिबंध आणले. हे प्रतिबंध आणल्यानंतर डॉ. पेम्बर्टन यांनी औषधात अल्कोहोलऐवजी दुसरा पर्याय शोधण्यासाठीचे आपले प्रयत्न सुरू केले. हा पर्याय शोधणे तसे सहज सोपे काम नव्हतेच. म्हणून या कामात डॉक्टर पेम्बर्टन यांनी विलीस वेनेबल यांचे सहकार्य घेतले. वेनेबल त्यावेळी अटलांटा या ठिकाणी आपले औषधांचे मोठे दुकान चालवत होते. त्यांच्याकडे औषधं आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचा मोठा साठा असल्याने ही हातमिळवणी डॉक्टर पेम्बर्टन ह्यांच्या फायद्याची होती ह्यात कोणतीही शंका नाही.
वेनेबल यांच्या सहकार्याने पेम्बर्टन यांनी आपले प्रयोग करण्यास सुरुवात केली.1886 साली त्यांचे हे प्रयोग सुरू असतानाच पेम्बर्टन यांच्या हातून तो एक अपघात घडला.हा अपघात काही गंभीर वा जीवघेणा नव्हता. तर झालं असं की, पेम्बर्टन ह्यांनी आपल्या फ्रेंच कोला वाईनसाठी तयार केलेलं द्रावण प्रयोग करताना चुकून सोडा वॉटरमध्ये मिसळलं. मिसळल्याबरोबर ते फसफसून त्यातून बुडबुडे यायला लागले. ते चांगलंच फेसाळलं. पेम्बर्टन यांच्याकडून हे जे काही चुकून तयार झालं होतं त्यालाच पुढे कोका कोला किंवा नुसतंच कोक हे नाव मिळालं.
आपल्या हातून वेगळं काहीतरी तयार झालंय आणि त्यातून आपल्याला खूप मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो याचा डॉक्टर पेम्बर्टन अजिबातच अंदाज आला नाही.अर्थात त्यांनी त्याचे पेटंट मात्र घेऊन ठेवले होते.त्याच सुमारास त्यांची तब्येत आणि आर्थिक परिस्थिती दोन्हीही डबघाईला आल्या होत्या. तसं असल्यामुळे पैशांसाठी त्यांना पेटंटचे काही हक्क विकावे लागले लागले असले, तरी त्यांनी काही हक्क आपल्या मुलाच्या नावे कायम ठेवण्याची तजवीज मात्र त्यांनी केली.16 एप्रिल 1888 रोजी डॉक्टर जॉन पेम्बर्टन ह्यांचे निधन झाल्यानंतर; जॉन पेम्बर्टन यांचा मुलगा चार्ली पेंबरटन ह्याने कोका- कोलाचे सगळे हक्क असा ग्रीग्ज कॅन्डलर ह्या उद्योगपतीला विकून टाकले.
कॅन्डलर यांच्या कंपनीने कोका कोलाचे हक्क विकत घेतले असले, तरी त्याचं उत्पादन करून ते विकणं सोपं नव्हतं.त्याचं कारण होतं हे पेय हवाबंद बाटलीत आणि थंड वातावरणात ठेवण्याची गरज.1899 साली कॅनडलर यांच्या कंपनीने तीन उद्योगपतींशी कोका-कोलाचे उत्पादन आणि विक्री करण्यासाठी हातमिळवणी केली.त्यांनी एकत्र येऊन ह्या पेयच्या बाटल्या हवाबंद करण्याची नवी प्रणाली तयार केली.त्यावेळी अमेरिकेत साधारणतः एक हजाराच्या आसपास पेयं बाटलीबंद करण्याचे कारखाने होते. त्या सर्वच्या सर्व कारखान्यांमधून ही नवी सुधारित प्रणाली बसवण्यात आली. हळूहळू कोका-कोलाने अमेरिकेची आणि त्यानंतर जागतिक बाजारपेठ ही काबीज केली.
............................
0 टिप्पण्या