🌷 आनंददायी शनिवार 🌷
!!कायम हसतमुख व आनंदी राहायला हवे.!!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 29/8/2026 :
जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्या, कारण त्या मोठ्या आनंदाचा आधार असतात. रोजच्या आयुष्यातील एखादं हसणं, गरम चहा, मित्रांची भेट असे छोटे क्षणच मोठ्या आनंदाची मुळे ठरतात. हे क्षण आठवणींमध्ये रूपांतरित होऊन आयुष्य अधिक सुंदर करतात. सतत मोठ्या गोष्टींची अपेक्षा न ठेवता, लहान गोष्टींमध्ये समाधान शोधणं हाच खरा आनंदाचा मार्ग आहे. या दृष्टिकोनामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण, शांत आणि आनंददायक बनतं.
हसणे आणि आनंदी राहणे आपल्या आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारण खळखळून हसणे हेच आपल्यासाठी सर्वोत्तम औषध आहे. कोणत्याही आजारांवर अगदी सोपं आणि परिणामकारक औषध म्हणजे ‘हास्य’ दु:खाचे डोंगर पार करायचे असतील तर आधी आनंदी राहायला शिका, थोडेसे हसून दु:खावर मात करायला शिका.
काही माणसं जन्मत:च हसऱ्या स्वभावाची असतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत हसू असते. ते जेथे जातात तेथील वातावरण बदलून टाकतात. प्रसन्नता निर्माण होते. वातावरणात सकारात्मकता वाढते. शरीराला एक अनामिक ऊर्जा मिळते.
आनंदी रहाण्यासाठी मनाचे आणि शरीराचे आरोग्य चांगले असले पाहिजे. संघर्षमय व ताणतणावाखाली असणाऱ्या आयुष्यात ‘हास्य’ही महत्वाची क्रिया आहे. मानवाला बहाल केलेली ती महान व आनंददायी प्रवृत्ती आहे. नऊ रसांपैकी एक महत्वाचा रस असलेली आणि मानवाच्या जीवनात, उत्साह, प्रेम, उर्जा, सकारात्मकता वाढवणारी अजब शक्ती आहे. मंदस्मित करणे, ओठ विलग करुन हसणे, खुदकन हसणे, पोटधरुन अश्रू येईपर्यंत हसणे, टाळ्या देत मोठमोठ्याने हसणे, अगदी गडगडाट करुन मोठा आवाज करुन हसणे असे हसण्याचे अनेक प्रकार पहायला मिळतात. अगदी पोट धरून किंवा गडगडाट करून नाही हसलो, तरी बाकीच्या हसण्याच्या प्रकारात आपण सहभागी झाले पाहिजे.
आपण हसरे राहिलो तर शरीरातील ऊर्जा वाढून आरोग्याला निश्चितच लाभ होईल. दिवस आनंदात जाणे, स्नायूंचा ताण कमी होणे, प्रतिकारशक्तीत वाढ होणे, रक्तप्रवाह सुरळीत सुरू रहाणे, वेदना कमी होणे आणि मुख्य म्हणजे मनाला, शरीराला छान वाटत राहणे असे खूप सकारात्मक बदल होणारे लाभ आहेत. लहान, निरागस हसऱ्या मुलांकडे पाहिले तरी आपल्याला आनंद होतो.
आपले जीवन आनंदी प्रसन्न आजारमुक्त करण्यासाठी हसण्याची सवय लावून घ्यावी. हसणे निरनिराळ्या विनोदांनी असो, मूळ प्रवृत्तीने असो, आनंदी स्मृतिंनी असो, विसंगती किंवा व्यंगाने असो, निरनिराळ्या नाट्य, सिनेमांनी असो ते जीवन आनंदमयी करते.
संकलन - आनंद महाजन
योग प्रशिक्षक, अमरावती.
९४२२९४९५६४
===================
0 टिप्पण्या