शॉर्ट टर्म कोर्स व रयत सायन्स अकॅडमी सीईटी मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/8/2026 :
रयत शिक्षण संस्था संचलित भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाबरोबरच उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शॉर्ट टर्म कोर्स अंतर्गत आरी वर्क व केक मेकिंग तसेच रयत सायन्स अकॅडमी अंतर्गत सीईटी मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांचा उद्घाटन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी व स्कूल कमिटी सदस्य बाबासाहेब क्षीरसागर, विद्यालयाचे प्राचार्य पवार तसेच ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख पाटील हे उपस्थित होते. शॉर्ट टर्म कोर्सच्या आरी वर्कच्या प्रशिक्षक म्हणून यादव व केक मेकिंगच्या प्रशिक्षक म्हणून कोळी उपस्थित होत्या. या शॉर्ट टर्म कोर्सच्या समन्वयक म्हणून श्रीमती यादव यांनी जबाबदारी सांभाळली. रयत सायन्स अकॅडमी सीईटी मार्गदर्शन केंद्राच्या समन्वयक म्हणून कु. पवार यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बड्डे यांनी केले. प्रास्ताविक श्रीमती.कवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती थोरात यांनी केले.
शॉर्ट टर्म कोर्सच्या उद्घाटनाच्या वेळी आरी वर्क व केक मेकिंगसाठी आवश्यक असणारे विविध साहित्य प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष आणले होते. तसेच प्रशिक्षकांनी तयार केलेल्या आरी वर्कच्या कलाकृती आणि तयार केलेला केक विद्यार्थ्यांना व उपस्थित मान्यवरांना दाखविण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणातून कोणत्या प्रकारची कौशल्ये आत्मसात करता येतील, याची प्रत्यक्ष माहिती मिळाली.
आरी वर्क प्रशिक्षक यादव यांनी आरी वर्कसाठी आवश्यक असणारे साहित्य, त्याचा उपयोग आणि विविध कलाकृती तयार करण्याची प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. केक मेकिंग प्रशिक्षक कोळी यांनी केक तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य, साधने व तयार केलेल्या केकचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. या दोन्ही अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबतच भविष्यात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
रयत सायन्स अकॅडमी सीईटी मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाचे नियोजन, प्रश्नपत्रिकेची तयारी, वेळेचे व्यवस्थापन आणि स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधींसाठी सक्षम होण्यास मदत होईल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्राचार्य पवार यांनी विद्यार्थ्यांनी शॉर्ट टर्म कोर्सचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच सीईटी मार्गदर्शनाचा उपयोग करून आपल्या शैक्षणिक प्रगतीला दिशा द्यावी, असे मार्गदर्शन केले. ज्युनिअर कॉलेजचे विभागप्रमुख श्री. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शॉर्ट टर्म कोर्स व रयत सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या संधींचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यविकास, सर्जनशीलता, आत्मविश्वास, स्वयंरोजगाराची जाणीव तसेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी यांना चालना मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला.
अशा प्रकारे शॉर्ट टर्म कोर्समधील आरी वर्क व केक मेकिंग आणि रयत सायन्स अकॅडमी सीईटी मार्गदर्शन केंद्र या दोन्ही उपक्रमांचे उद्घाटन यशस्वीरीत्या संपन्न झाले.
≈==================


0 टिप्पण्या