अंकोली येथे टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम व वस्तू प्रदर्शन


अंकोली येथे टाकाऊपासून टिकाऊ’ उपक्रम व वस्तू प्रदर्शन 

वृत्त एकसत्ता न्यूज  

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 26/8/2026 :

रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कल्पकता, पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याची सवय निर्माण व्हावी या उद्देशाने ‘टाकाऊपासून टिकाऊ’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी घरातील तसेच परिसरातील टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून विविध उपयुक्त व आकर्षक वस्तू तयार केल्या.

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आले. प्रदर्शनास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने विविध कलाकृती व उपयुक्त वस्तू तयार करून आणल्या. यामध्ये सजावटीच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, उपयोगी साहित्य तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश होता.

या प्रदर्शनाचे समन्वयक म्हणून यादव  यांनी नियोजन व आयोजनाची जबाबदारी पार पाडली. प्रदर्शन पाहण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्कूल कमिटीचे अध्यक्ष, सदस्य,जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा बाबासाहेब क्षीरसागर, महाविद्यालयाचे प्राचार्य  पवार, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख महेश पाटील  तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून त्यांच्या कल्पकतेचे व मेहनतीचे कौतुक केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘कचरा म्हणजे कचरा नसून योग्य कल्पकतेने त्याचा पुनर्वापर करून उपयुक्त वस्तू तयार करता येतात’ हा संदेश पोहोचला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले तसेच पर्यावरण संवर्धन आणि पुनर्वापराचे महत्त्व त्यांना समजले.

एकंदरीत, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ हा उपक्रम व वस्तू प्रदर्शन अत्यंत उत्साहपूर्ण आणि यशस्वीरीत्या पार पडले. विद्यार्थ्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांनी सादर केलेल्या विविध नाविन्यपूर्ण वस्तूंमुळे प्रदर्शनाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या