📖✒️स्वतःचं मन कोणी ओळखलंय का?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/8/2026 :
आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, शरीराच्या प्रत्येक अवयवावर उपचार उपलब्ध आहेत, शस्त्रक्रिया शक्य आहेत. पण या सगळ्यात एक असा अवयव आहे जो कुठे दिसत नाही, तरीही तोच संपूर्ण शरीरावर राज्य करतो, ते म्हणजे आपलं 'मन'.
हे मन जर आजारी पडलं, एकाकी झालं किंवा त्याचं संतुलन बिघडलं, तर यावर कुठल्याच हॉस्पिटलमध्ये औषध मिळत नाही.
अदृश्य असलेलं हे मन अस्वस्थ झालं की त्याचा थेट परिणाम शरीरावर होतो. चिडचिड होणे, विनाकारण राग येणे, किंवा उदास वाटणे ही सगळी त्या बिघडलेल्या मनाचीच लक्षणे आहेत.
माझ्या आयुष्याच्या अनुभवातून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपल्या मनाचं संतुलन आपण स्वतःच बिघडवून घेतो. आपण इतरांवर नको तितक्या अपेक्षांचं ओझं लादतो. कोणी काही बोललं तरी नाराज आणि कोणी नाही बोललं तरी नाराज! पण आपण हे विसरतो की, आपलं मन जपण्याची पहिली जबाबदारी आपली स्वतःची असते.
*मनाची काळजी कशी घ्यावी?*
कोणाकडूनही अवाजवी अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितक्या कमी, तितके नैराश्य कमी.
दुसऱ्यांना गृहीत धरणं सोडा आणि स्वतःलाही कोणी गृहीत धरेल इतकी सवलत कोणाला देऊ नका. जग काय म्हणेल यापेक्षा माझ्या मनाला काय वाटतं, हे ऐकायला शिका.
आपलं मन किती दुखावलंय हे दाखवण्यासाठी जगात कुठलाच वैद्य किंवा रिपोर्ट उपलब्ध नाही. त्यामुळे आधी स्वतःचं मन जपा, त्याला आदर द्या. जेव्हा तुमचं स्वतःचं मन शांत आणि आनंदी असेल, तेव्हाच तुम्ही इतरांची मनं खऱ्या अर्थाने जपून त्यांच्या आयुष्यात आनंद पेरून शकाल,
©️श्रद्धा धनेश
संकलन : प्रवीण सरवदे

0 टिप्पण्या