मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 25/8/2026 :
आपल्या जवान बंधूंची नोकरी (देशसेवा) व आपली सर्वसामान्य लोकांची नोकरी यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. आपले रोजचे कामाचे तास संपले की आपण सुखरूप आपल्या कुटुंबात परत येतो, त्यांच्यासमवेत राहतो व घरचे गरम जेवण जेवतो.
जवान बंधू-भगिनी चार-सहा महिन्यांनी घरी रजेवर येतात. रेंजमध्ये असतील तेव्हाच त्यांचा कुटुंबीयांशी फोनवर संवाद होतो, तोही सुरक्षेची योग्य गुप्तता पाळून! काही चौक्या अशा संवेदनशील असतात की जिथे शत्रूच्या गोळ्यांचा थेट सामना करावा लागतो; त्यामुळे पुढचा क्षण कसा असेल हे कोणालाच ठाऊक नसते.
नोकरी करणाऱ्या सर्वांनाच पगार मिळतो, पण प्रत्येकाला पावलोपावली मृत्यूचा सामना करावा लागत नाही. इथे जवान सुट्टीवर येणार म्हणून घरचे वाट पाहतात, तर काही प्रसंगी ते थेट तिरंग्यात लपेटून येतात. सोपे नसते सैनिक होणे!
आजचा संकल्प
सीमेवर तैनात असणाऱ्या जवानांचे किंवा हुतात्मा जवानांचे कुटुंबीय आपल्या आसपास राहात असतील, तर त्यांना नक्की मदतीचा हात व भावनिक आधार देऊ आणि त्यांचा नेहमी आदर करू.
सौ. स्नेहलता स. जगताप.

0 टिप्पण्या