वय ९० पार, तरीही तंदुरुस्त! दीर्घायुषी लोकांच्या ‘या’ ५ सवयी तुम्हीही आजपासून लावा; जास्त वर्षं निरोगी जगायचं असेल तर हे बदल करा!

 

वय ९० पार, तरीही तंदुरुस्त! दीर्घायुषी लोकांच्या ‘या’ ५ सवयी तुम्हीही आजपासून लावा; जास्त वर्षं निरोगी जगायचं असेल तर हे बदल करा!

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 27/8/2026 :

Longevity Secrets: ९० वर्षांहून अधिक आयुष्य जगणाऱ्या लोकांमध्ये काही खास सवयी समान असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मन शांत ठेवण्यापासून सतत काहीतरी नवीन शिकण्यापर्यंतच्या या सवयी दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात.

*Habits of People Over 90:* दीर्घायुष्य मिळावं आणि आयुष्याच्या उत्तरार्धातही निरोगी राहावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, दीर्घायुष्य केवळ अनुवंशिकतेवर अवलंबून असतं असा समज आहे. एका संशोधनानुसार आपल्या आयुष्यातील अनेक वर्षांवर दैनंदिन सवयी, जीवनशैली आणि मानसिक आरोग्याचाही मोठा प्रभाव असू शकतो. ९० वर्षांहून अधिक जगणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्या सवयी आढळल्या, हे जाणून घेतल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

*दीर्घायुष्याचं रहस्य नेमकं कुठे दडलंय?*

आपण एखादी व्यक्ती ९० किंवा १०० वर्षांपर्यंत निरोगी आयुष्य जगताना पाहिली की त्यामागे चांगली अनुवंशिकता हेच मुख्य कारण असावं, असं अनेकदा मानलं जातं. मात्र, उपलब्ध संशोधनानुसार केवळ जनुकांवरच सगळं अवलंबून नसतं.

संशोधनात आलेल्या १८ हजार लोकांचा तब्बल १५ वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये ९० वर्षे किंवा त्याहून अधिक आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींमध्ये काही समान जीवनशैलीच्या सवयी आढळल्या. विशेष म्हणजे या सवयी फार कठीण किंवा अवघड नव्हत्या.

*मग त्या सवयी कोणत्या?*

*१. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न*

दीर्घकाळ निरोगी राहणाऱ्या व्यक्ती तणावाला आपल्या आयुष्यावर हावी होऊ देत नाहीत. सततचा ताण शरीरावरही परिणाम करु शकतो. हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि रोगप्रतिकारकशक्तीशी संबंधित समस्या यांचा तणावाशी संबंध असल्याचे विविध संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम किंवा आपल्या आवडीच्या शांततादायी गोष्टींसाठी वेळ देणे फायदेशीर ठरु शकते. 

*२. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता*

वय वाढलं म्हणून शिकणं थांबवायचं असं दीर्घायुष्य जगणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत दिसत नाही. नवीन कौशल्य शिकणे, पुस्तक वाचणे, कोडी सोडवणे किंवा एखादा नवीन छंद जोपासणे, यामुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत होते. सतत जिज्ञासू पाहण्याची ही सवय मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरु शकते. 

*३. निसर्गाच्या सानिध्यात राहणे*

बागेत फेरफटका मारणे, उद्यानात वेळ घालवणे किंवा मोकळ्या हवेत चालणे यांसारख्या साध्या सवयींचाही जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. 

निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने तणाव कमी होण्यास, झोप सुधारण्यास आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे दिवसातील काही वेळ घराबाहेर, मोकळ्या वातावरणात घालवण्याची सवय लावून घेता येऊ शकते. 

*४. छोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञ राहणे*

दीर्घायुष्य जगणाऱ्या लोकांच्या जीवनात आणखी एक प्रकर्षाने दिसते - कृतज्ञता. 

आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल समाधान मानणे, इतरांचे आभार मानणे, आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, यामुळे मानसिक ताण कमी होण्यास मदत होऊ शकते. राग, मत्सर आणि सततची नकारात्मकता यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केल्याने नातेसंबंधही चांगले राहू शकतात. 

*५. दीर्घायुष्याच्या मागे न धावता आनंदी जीवन जगणे*

या संशोधनातील सर्वात लक्ष्यवेधी मुद्दा म्हणजे ९० ते १०० वर्षांपर्यंत जगलेल्या लोकांनी केवळ अधिक वर्षे जगण्यासाठी आयुष्याची आखणी केली नव्हती. ते आपल्या आवडीच्या गोष्टी करत होते, कुटुंबीय आणि मित्रांना वेळ देत होते आणि शक्य तितकं संतुलित आयुष्य जगत होते. 

म्हणजेच दीर्घायुष्याचा विचार करताना केवळ किती वर्षे जगायचं यापेक्षा ती वर्षे कशी जगायची याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं ठरु शकतं. 

*आजपासून कोणत्या सवयी लावाल?*

निरोगी जीवनशैलीसाठी आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम, संतुलित आणि नैसर्गिक आहार, दररोज ७ ते ८ तासांची झोप, धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहणे तसेच तमाशाचे योग्य व्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला जातो. 

मात्र, या सवयी दीर्घायुष्याची हमी देतात असे समजू नये. व्यक्तीचे वय, आरोग्य, अनुवंशिकता, आजार आणि जीवनशैली अशा अनेक घटकांचा आरोग्यावर परिणाम होतो, त्यामुळे निरोगी आणि आनंदी आयुष्यासाठी या सवयी हळूहळू आपल्या दिनचर्येचा भाग बनवणे अधिक योग्य ठरेल. 

************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या