शोहरत की बुलंदी भी पलभर का तमाशा है...!!!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/8/2026 :
असं म्हणतात जगज्जेता सिकंदर मृत्यूशय्येवर होता. त्याला लक्षात आलं, माझं सगळं वैभव, सत्ता, नोकर चाकर, दास-दासी, साम्राज्य त्याला मृत्यपासून वाचवू शकत नाही. म्हणून त्यांने मरतांना एक अंतिम इच्छा सांगितली ती ही, की माझं शव नेताना माझे हात दोन्ही बाजूंनी मोकळे सोडा. जेणेकरुन ते लोकांना लागतील. म्हणजे लोकांना कळेल की, एवढा मोठा जगज्जेत्ता सिकंदर सर्व वैभव सोडून रिकामे हात हलवत गेला. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.
या जगातून राम गेले, कृष्ण गेले, बुद्ध गेले, पैगंबर गेले, महावीर गेले, नानक गेले, ख्रिस्त गेले. जगाचं काहीही बिघडलं नाही. रथी, महारथी, जगज्जेते आले आणि गेले. या विश्वाच्या गतीत काहीही फरक पडला नाही. विश्व सुरूच आहे. सुरूच राहील,आपणंच आपलं अस्तित्व अति महत्वाचं मानत असतो. वास्तविक ब्रह्मांडाच्या या पसाऱ्यात त्याची काय गणती. बशीर बद्र यांनी लिहिलेल्या ‘जब रात की तनहाई’ या गझलेतला
शोहरत की बुलंदी भी पलभर का तमाशा है
जिस डाल पे बैठे हो, वो टूट भी सकती है..
हा शेर ऐकताना मला नेहमी सिकंदरचीच गोष्ट आठवते. हा शेर प्रसिद्धीच्या वलयाबद्दल, यशाबद्दलही तंतोतंत लागू पडतो. प्रसिद्धीचं वलय ही अत्यंत क्षणभंगूर अशी गोष्ट आहे. (पलभर का तमाशा) ज्या फांदीवर बसलाहात ती तुटूपण शकतेच याची जाणीव ठेवा. हासिल-ए-ग़ज़ल शेर आहे या गझलेतला. अनेक चित्रपटातल्या अभिनेते अभिनेत्रींबद्दल ही गोष्ट प्रकर्षानं जाणवते. परवीन बाबीसारखी देखणी अभिनेत्री घरात तीन दिवस मरुन पडते, कोणाला कळतही नाही. तीच्या प्रेताची दुर्गंधी यायला लागते तेव्हा शेजारी पोलिसात तक्रार करतात अन् तीचा मृत्यू झाल्याचं कळतं. तीला स्किझोफ्रेनिया झाला असतो. साधना स्वत:ला जगासमोर येऊ देत नाही. कारण ती बेढब, लठ्ठ, कुरूप दिसायला लागली असते. पृथ्वी थिएटरसमोर जेव्हा व्हिलचेअरवर बसून शशी कपूर यायचा तेव्हा त्याच्याकडे बघवल्या जायचं नाही. सौंदर्य, सत्ता, आणि प्रसिद्धी या गोष्टी चंचलच. कधीतरी सोडून जाणार माणसाला. याचं भान बशीर बद्र यांचा हा शेर देतो.
ही गझल गैरमुसलसल प्रकारातली आहे. श्रृंगार, मग विरह अन् शेवटी वेगळंच तत्वज्ञानात्मक सत्य अशा विषयांवरचे शेर गझलेत येतात.
जब रात की तनहाई, रात्र गूढ, रात्र गंभीर. रात्र भयाची. रात्र पौर्णिमेची तेजस्वी, प्रकाशमान, स्वच्छ, शुभ्र. रात्र अमावस्येची काळी, पापानं भरलेली. रात्रीची किती रुपं. पण रात्रीला गुढतेचा आणि खाजगीपणाचाच रंग जास्त. एकांत हे रात्रीचं वस्त्र! रात्र आणि एकांत हे अविभाज्य समीकरण, कलावंताना तर रात्र फारच आवडती. या एकांतात आठवणींची होणारी गर्दी ही अपरिहार्यच. रात्रीच्या या एकटेपणात खिडकीवरचा पडदा कोणी हळूहळू ओढून घ्यावा तशी आठवणींची गर्दी होतेय. सुगंधित धूपामध्ये कोणी आगीची ठिणगी टाकली तर काय होईल तशी तुझी आठवण रात्रभर मनाला जाळते आहे. डोळ्यांच्या पापण्या झुकवून काही प्रेम लपवता येत नाही. डोळ्यांच्या लिफाफ्यावर लिहिलेली प्रेमाची अक्षरं चमकून जातातच. या गझलेतले पुढचे दोन शेर अर्थाच्या दृष्टीने फारच सुंदर आहेत. बिछडे हुए मिलते है जब बर्फ पिघलती है. मला या ओळींचा लागलेला अर्थ असा. जब बर्फ पिघलती है म्हणजे काही कारणानं नात्यात दुरावा निर्माण झालाय. पण जेव्हा दोघांमधला अहंकार वितळू लागतो. तेव्हाचं दोघांमधलं अंतरही तुटू लागतं.
आबशार-ए-गझल या अल्बममध्ये आशा भोसले यांनी ही गझल गायली आहे. संगीत आहे गझल गायक हरिहरन यांचं. फार सुंदर कंपोझिशन. आणि आशा भोसले यांनी ती फार न्याय देत गायलीय. या गझलेची सुरूवात अप्रतीम मधूर अशा बासरीने होते. आशा भोसलेंचा गळा काय फिरतो, चिल्मनसी सरकती है. या शेरनंतर परत जेव्हा त्या जब रात की तनहाईवर येतात. त्यात रात या शब्दावर जी हरकत घेतली आहे ती लाजबाव. त्यांचं रात म्हणणं ऐका. पहिल्या शेरच्या आधी येणारी व्याकूळ शहनाई. दुसऱ्या शेरच्या आधी येणारी रोमॅँटिक सतार, या गझलेत शहनाई ऐका. मी प्रथमच कुठल्या गझलेत शहनाई ऐकलीय. या अल्बममध्ये हरीहरन हे कंपोझर म्हणून फार ठळकपणे, ताकदीने समोर येतात.
बशीर बद्र यांनी ही गझल लिहलीय. ते उर्दूतले अत्यंत लोकप्रिय शायर होते. कोणालाही सहज समजेल अशी शायरी हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य.
उजाले अपने यादों के अपने साथ रहने दो
न जाने किस गली में ज़िंदगी की शाम हो जाये..
किंवा
कुछ तो मजबुरीया रही होगी
यूँ ही कोई बेवफा नहीं होता
किंवा
हर धडकते दिल को लोग पत्थर समझते है
उम्र गुज़र जाती है दिल को दिल बनाने में...
एका दंगलीत त्यांचं घर जाळल्या गेलं. त्यावर त्यांच्या आक्रंदन करणाऱ्या मनाने,
लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
उनको तरस नहीं आता बस्तिया जलानें में. हा शेर लिहिला.
कधीतरी रात्रीच्या वेळी, नीरव शांततेत, अंधारात ही गझल ऐकून पहा. तुमच्या थिजलेल्या संवेदना जाग्या होतील.
जब रात की तन्हाई दिल बन के धड़कती है
यादों के दरीचों में चिलमन सी सरकती है
लोबान में चिंगारी जैसे कोई रख जाए
यूँ याद तिरी शब भर सीने में सुलगती है
यूँ प्यार नहीं छुपता पलकों के झुकाने से
आँखों के लिफ़ाफ़ों में तहरीर चमकती है
ख़ुश-रंग परिंदों के लौट आने के दिन आए
बिछड़े हुए मिलते हैं जब बर्फ़ पिघलती है
शोहरत की बुलंदी भी पल भर का तमाशा है
जिस डाल पे बैठे हो वो टूट भी सकती है
*बशीर बद्र*
मेनका मासिकातील रुह ए ग़ज़ल सदरातून
फोटो क्रेडिट एआय- The fragility of popularity या विषयावर एक सुंदर चित्र काढून दे म्हटल्यावर त्याने खालील चित्र ४५ सेकंदात काढून दिले!
वसुंधरा काशीकर
मुक्त पत्रकार. लेखक व निवेदक,
✒️ संकलन : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या