शंकरनगर येथे दि. १६ व १७ रोजी महिलांसाठी नागपंचमी सण सोहळ्याचे भव्यतेने आयोजन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/8/2026 : महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने महिलांसाठी पारंपारिक खेळ व संस्कृती जोपासणारा भव्य नागपंचमी सण सोहळा रविवार दिनांक १६ व सोमवार दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत शिवपार्वती मंदिर शंकरनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे आयोजित केला आहे.
महाशिवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष, ग्रामीण संस्कृतीचे जोपासक व या सोहळ्याचे आयोजक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील, अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या नियोजनातून हा महिलांसाठीचा नागपंचमी सण सोहळा भव्य प्रमाणावर साजरा होणार आहे
श्रावण महिन्यात ग्रामीण संस्कृतीचे व सणावारांचे महत्त्व आहे. या महिन्यात माय माऊली भगिनी मोठ्या आनंदाने विविध सण साजरे करतात. हे सण साजरे करीत असताना नागपंचमीचा झोका, फेर, फुगडी, पिंगा, काटवटकणा असे विविध पारंपारिक खेळ त्यांच्या आनंदाला उधाण आणीत होते. याच जगरहाटीत लोप पावत चाललेले खेळ व आनंद पुनर्प्रस्थापित करून आपल्या समृद्ध परंपरांचा वारसा एकत्र येऊन जोपासण्यासाठी या नागपंचमी सण सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारंपारिक मूल्यांचे जतन व्हावे यासाठी जयसिंह मोहिते पाटील यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
आधुनिक तंत्रज्ञाच्या काळात मोबाईल, टी.व्ही. आदीमुळे ही परंपरा लोप पावत चालली असल्याच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्र यात्रा समितीने सन २०२४ मध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या श्रावणी सोहळ्यात सुमारे १० ते १२ हजार महिलांनी व सन २०२५ मध्ये आयोजित केलेल्या नागपंचमी सण सोळ्यात सुमारे २२ ते २५ हजार महिलांनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन पारंपारिक खेळाचा आनंद लुटला होता. यावर्षी देखील महिलांचा हाच आनंद द्विगुणीत व्हावा याकरिता शिवपार्वती मंदिर परिसरात २८ हजार स्केअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. तर महिलांसाठी अल्प दरात विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल्सही उपलब्ध करून दिले आहेत. महिलांनी याचा लाभ घेण्याचे अवाहनही आयोजकांनी केले आहे.

0 टिप्पण्या