📖✒️पाहण्याचा दृष्टिकोन : संकोचाकडून सन्मानाकडे.✍️
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/8/2026 :
स्त्रियांना खरंतर पुरुषांशी बोलायला काही जास्त अवघड वाटत नाही, पण पुरुषांच्या मनात मात्र स्त्री म्हणजे एक अवघड विषय असल्याचा समज रुजलेला दिसतो. माझी इमेज खराब होईल का? तिला काय वाटेल? काही गैरसमज तर होणार नाही ना? असे निरर्थक प्रश्न पहिल्यांदा बोलताना पुरुषांच्या मनात येतात.
पण सहसा स्त्रियांसोबत बोलायला भीती तेव्हाच वाटते, जेव्हा अनावधानाने चुकीचे बोलले जाण्याची साशंकता असते; आणि माणूस चुकीचे तेव्हाच बोलतो, जेव्हा त्याचे विचार गढूळ असतात हे ही तितकाच खर असत. पण शेवटी सर्वच तसे नसतात ना.
म्हणूनच, स्त्रियांसोबत संवादापूर्वी आपली समज आणि विचार बदलणे गरजेचे आहे. समोरील स्त्री ही एक अनोळखी व्यक्ती आहे असे मानून संवादाला सुरुवात करा. सुरुवातीला थोडे परकेपण आणि मर्यादांचे अंतर ठेवल्यास संवाद फॉर्मल राहतो आणि भलते सलते काही बोलले जाण्याची शक्यता उरत नाही.
स्त्रीकडे केवळ फक्त एक स्त्री' म्हणून न पाहता, तिच्याकडे एक 'माणूस' म्हणून पाहिले पाहिजे. असे केल्याने समोरील व्यक्तीला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मनात ठसले जाईल. यामुळे सर्व स्त्रियांना सन्मान आणि अस्तित्व देण्याचा एक छोटा का होईना प्रयत्न आपण करतो, जो आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत सहसा दिसून येत नाही.
जेव्हा तुम्ही स्त्रीकडे पूर्वग्रह किंवा दडपण बाजूला ठेवून फक्त एक 'माणूस' म्हणून पाहता, तेव्हा तुम्हाला तिच्यात एक उत्तम सहप्रवासी, एक चांगली मित्र आणि एक सशक्त विचार असणारी व्यक्ती नक्कीच दिसून येते.
संवादाची ही सहजता आणि विचारांची ही शुद्धता ज्या दिवशी आत्मसात होईल, त्या दिवशी स्त्री हा विषय अवघड न वाटता, नाते आणि संवाद अधिक सुंदर व अर्थपूर्ण होतील इतक निश्चित.©️श्रद्धा धनेश
🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड

0 टिप्पण्या