📖✒️मुठीतलं प्रेम की मोकळं आभाळ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/8/2026 :
आयुष्यात आणि नात्यांमध्ये 'Possessiveness' म्हणजेच अति-मालकी वृत्ती असणं योग्य की अयोग्य? हा प्रश्न जितका सोपा वाटतो, तितकाच तो खोल आहे.
नात्यात माझं म्हणण्यात एक वेगळाच गोडवा आणि आपुलकी असते. जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो, तेव्हा त्याच्याबद्दल थोडी काळजी वाटणं, हा माणूस माझा आहे, असा हक्क वाटणं अगदी स्वाभाविक आहे. या मर्यादित possessiveness मुळे समोरच्याला सुरक्षित वाटतं, नात्याची वीण घट्ट होते आणि एक वेगळाच गोडवा टिकून राहतो. नात्यात हा possessiveness अगदी मीठासारखा असावा—योग्य प्रमाणात असेल तरच नात्याची चव वाढते.
पण जेव्हा या माझं रूपांतर फक्त माझंच मध्ये होतं, तिथेच संकटाची सुरुवात होते. प्रेमाच्या नावाखाली समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक श्वासावर, मैत्रीवर, आवडीनिवडीवर आणि स्वातंत्र्यावर पहारा ठेवणं म्हणजे प्रेमाची गुदमर करणं होय.
अति-मालकी वृत्ती ही प्रेमापेक्षा स्वतःच्या मनातल्या 'Insecurity' मधून जास्त निर्माण होते. "माझं प्रेम कमी पडेल का?" किंवा "हे माणूस मला सोडून जाईल का?" ही भीती माणसाला अति-नियंत्रक बनवते. जिथे अति-मालकी हक्क येतो, तिथे विश्वासाची जागा संशय आणि बंधने घेतात. मग ती व्यक्ती प्रेमाने नव्हे, तर केवळ लाचारीने जोडलेली राहते.
'गृहीत धरण्यापेक्षा थोडं अंतर ठेवून राहणं' आणि समोरच्याला त्याचा मोकळा श्वास घेऊ देणं हेच परिपक्व नात्याचं लक्षण आहे. प्रेम पिंजरा बनू नये, तर ती एक अशी जागा असावी जिथे प्रत्येकाला स्वतःसारखं जगण्याचं स्वातंत्र्य मिळावंल.
नात्याचा एक सुंदर नियम नेहमी लक्षात ठेवायला हवा, पक्षाला हातावर धान्य ठेवून भरवावं, त्याला मुठीत मिटून धरू नये. मुठ उघडली तरी पक्षी हातावरच राहिला, तर ते खरं प्रेम; आणि उडून गेला, तर ती फक्त आपली मालकी गाजवण्याची सवय! माणसांना प्रेमाने जोडायचं असतं, बंधनांनी नाही.
©️श्रद्धा धनेश डायरी
संकलन : प्रवीण सरवदे

0 टिप्पण्या