"नशामुक्ती" नशेचा चेहरा बदलला. पण, समाज अजूनही जुन्याच आरशात पाहतोय !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/8/2026 :
रस्त्यावर दारू पिऊन पडलेला माणूस दिसला की आपण सहज म्हणतो, "हा व्यसनी आहे.. पण दिवसाला दहा दहा तास मोबाईलच्या पडद्याला चिकटून बसलेला मुलगा व्यसनी नाही का? रात्री तीन-तीन वाजेपर्यंत पबमध्ये दारूच्या ग्लासासोबत आयुष्य उधळणारी तरुणाई व्यसनाधीन नाही का? घरात चार माणसे असून चारही जण एकमेकांशी न बोलता आपापल्या स्क्रीनमध्ये हरवलेले असतील, तर त्या घराला नशेने ग्रासलेले म्हणायचे नाही का? दुर्दैव एवढेच की आपण अजूनहीं नशा म्हणजे फक्त दारू आणि अमली पदार्थ एवढाच अर्थ घेत बसलो आहोत. काळ बदलला, व्यसनांचे स्वरूप बदलले, पण समाजाची विचारसरणी बदलली नाही. म्हणूनच आजची सर्वात मोठी नशा आपल्या खिशात आहे, आपल्या हातात आहे आणि आपल्या डोक्यावर राज्य करते आहे.
आज गाव असो किंवा शहर, चहाच्या टपरीवर चार मित्र भेटले तरी गप्पा कमी आणि मोबाईल जास्त दिसतो. लग्न समारंभात लोक वधूवरांकडे कमी आणि मोबाईलच्या कॅर्मयाकडे जास्त पाहतात. देवळात, स्मशानभूमीत, रुग्णालयात, शाळेत, महाविद्यालयात, प्रत्येक ठिकाणी मोबाईलने माणसाचे लक्ष, वेळ आणि मन ताब्यात घेतले आहे.
आपण तंत्रज्ञान वापरत आहोत, असा आपला समज आहे; प्रत्यक्षात तंत्रज्ञान आपल्याला वापरत आहे. याहून धोकादायक चित्र म्हणजे पब संस्कृती. आज दारू पिणे हा अनेकांसाठी अभिमानाचा विषय बनला आहे. "मी पित नाही" असे सांगणाऱ्याला मागास समजले जाते, पण "वीकेंडला पबमध्ये गेलो होतो" असे सांगणाऱ्याला आधुनिक समजले जाते. ही आधुनिकता आहे की मानसिक गुलामगिरी? हा प्रश्न प्रत्येक पालकाने, प्रत्येक शिक्षकाने आणि प्रत्येक तरुणाने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. आज अनेक पालक मुलांच्या हातात पन्नास साठ हजारांचा मोबाईल देतात; पण दिवसातून अर्धा तास त्यांच्याशी मनमोकळे बोलण्यासाठी वेळ देत नाहीत. मुलांना इंटरनेट मिळते, पण संस्कार मिळत नाहीत. माहिती मिळते, पण दिशा मिळत मेळत नाही. पैसा मिळतो, पण माणुसकीचा वारसा मिळत नाही. आणि मग एखादा मुलगा
नैराश्यात जातो, चुकीच्या संगतीत अडकतो किंवा आयुष्याबद्दल चुकीचे निर्णय घेतो, तेव्हा आपण नशिबाला दोष देतो.
खरं तर दोष नशिबाचा नसतो; दोष आपल्या प्राधान्यक्रमांचा असतो. आज सोशल मीडियाने यशाची व्याख्याच बदलून टाकली आहे. महागडी गाडी, ब्रँडेड कपडे, पबमधील सेल्फी, हातात दारूचा ग्लास आणि हजारो लाईक्स. एवढेच जीवन आहे, असा भ्रम तरुणांच्या मनात निर्माण केला जात आहे. मेहनत, प्रामाणिकपणा, अभ्यास, कुटुंब, संस्कार, वाचन आणि समाजकारण या शब्दांना ग्लॅमर उरलेले नाही. म्हणूनच अनेकांना प्रसिद्ध व्हायचे आहे; पण मोठे व्हायचे नाही. या सगळ्यात सर्वात मोठा बळी पडतो तो संवाद. पूर्वी घरात वडिलांचे अनुभव ऐकले जायचे, आईच्या गोष्टी ऐकल्या जायच्या, आजी आणि आजोबांचे संस्कार मिळायचे. आज घरात वाय-फाय आहे; पण मनांना जोडणारा धागा तुटला आहे. प्रत्येक जण ऑनलाइन आहे; पण एकमेकांसाठी उपलब्ध नाही. ही परिस्थिती फक्त कुटुंबापुरती मर्यादित नाही. स्स्त्यावरचे अपघात वाढत आहेत, मानसिक तणाव वाढतो आहे, नैराश्य वाढते आहे, हिंसा वाढते आहे. यामागे अनेक कारणे असली, तरी बदलती जीवनशैली आणि अति डिजिटल अवलंबित्व हा त्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. हे वास्तव स्वीकारावे लागेल, पण या लेखाचा हेतू मोबाईल किंवा आधुनिक जीवनशैलीला दोष देणे नाही. मोबाईल
हे साधन आहे, शत्रू नाही. पबमध्ये जाणारा प्रत्येक माणूस व्यसनी असतो, असेही नाही. प्रश्न अतिरेकाचा आहे. जेव्हा कोणतीही गोष्ट माणसावर नियंत्रण मिळवते, तेव्हा ती व्यसन बनते. ही रेषा ओळखणे आवश्यक आहे. आज नशामुक्तीची व्याख्या बदलण्याची वेळ आली आहे. दारू, गुटखा आणि अमली पदार्थांबरोबरच डिजिटल व्यसन, ऑनलाइन जुगार, अश्लीलतेचे व्यसन, बेफाम उपभोगवाद आणि दिखाऊ जीवनशैली यांच्याविरुद्धही समाजाने उभे राहिले पाहिजे. देश बदलायचा असेल, तर घोषणा बदलून उपयोग नाही; विचार बदलावे लागतील. मुलांना फक्त मोबाईल देऊ नका, वेळ द्या. फक्त शिक्षण देऊ नका, जीवनाचे भान द्या. फक्त करिअर शिकवू नका, चारित्र्य घडवा. कारण पदवी माणूस यशस्वी करू शकते; पण संस्कारच त्याला महान बनवतात. आजचा प्रश्न फक्त नशेचा नाही. आजचा प्रश्न पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे. आपण अजूनही शांत बसलो, तर उद्या आपल्या मुलांच्या हातात जगातील तील सर्वात महागडा स्मार्टफोन असेल; पण त्यांच्याशी दोन शब्द बोलणारे आई वडील, मित्र
आणि नाती उरणार नाहीत. समाजाने आता ठरवले पाहिजे की, आपल्याला चकाकणारी पिढी हवी आहे की विचार करणारी पिढी? कारण राष्ट्र इमारतींनी उभी राहत नाहीत; ती सुदृढ विचारांच्या तरुणांनी उभी राहतात.
आजच जागे होऊया. कारण उद्या कदाचित उशीर झालेला असेल. आज आपण आपल्या मुलांच्या हातात स्मार्ट फोन देतो, पण त्यांच्या मनात काय चालले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यांच्याकडे महागडी बाईक असते, ब्रँडेड कपडे असतात, अमर्याद इंटरनेट असते; पण जीवनाचा अर्थ काय, अपयश पचवायचे कसे, नाती जपायची कशी, स्वतःवर नियंत्रण ठेवायचे कसे, हे शिकवण्यासाठी मात्र आपल्याकडे वेळ नसतो. मग ती पिढी दिशा शोधत भटकते आणि बाजार तिच्यासाठी दिशा ठरवतो. आजचा बाजार वस्तू विकत नाही; तर सवयी विकतो आहे तो गरजा निर्माण करतो, अस्वस्थता निर्माण करतो आणि मग त्यावर उपाय म्हणून नवी उत्पादने विकतो. मोबाईल कंपन्यांना तुम्ही दिवसभर स्क्रीनवर असलात तरच फायदा आहे. सोशल मीडियाला तुम्ही सतत स्क्रोल करत राहिलात तरच फायदा आहे. पब आणि मनोरंजन उद्योगाला तुम्ही प्रत्येक आठवड्यात खर्च केलात तरच फायदा आहे.
पण या सगळ्यात तुमचे नुकसान किती होते, याचा हिशेब कोण ठेवतो? आज अनेक तरुणांना विचारले, तुमचे ध्येय काय? तर उत्तर मिळते, "खूप पैसे कमवायचे. पण "कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर मात्र अनेकांकडे नसते. पैसा आवश्यक आहे; पण तोच आयुष्याचा अंतिम उद्देश झाला, की माणूस हळूहळू स्वतःपासून दूर जाऊ लागतो. आपल्या समाजात एक मोठा विरोधाभास आहे. मुलगा दिवसभर मोबाईलवर असेल, तर अनेक पालक म्हणतात, आजकाल सगळेच असे असतात. पण तोच मुलगा पुस्तक वाचत असेल, एखादे वाद्य शिकत असेल किंवा समाजकार्यात वेळ देत असेल, तर त्याला विचारले जाते, यातून काय मिळणार? आपण नकळत पुढच्या पिढीची मूल्यव्यवस्था बदलत आहोत. नशामुक्तीची मोहीम फक्त व्यसनमुक्ती केंद्रांपुरती मर्यादित ठेवून चालणार नाही. ती घराघरात पोहोचली पाहिजे. प्रत्येक घरात दिवसातून ठरवला पाहिजे. आठवड्यातून एक किमान एक तास नो मोबाईल वेळ दिवस कुटुंबाने एकत्र बसून संवाद साधला पाहिजे. शाळांनी मुलांना फक्त संगणक वापरायला शिकवू नये; तर संगणकापासून योग्य वेळी दूर राहायलाही शिकवले पाहिजे. आज गरज कायद्यांपेक्षा संस्कारांची आहे. पोलिसांची भीती निर्माण करण्यापेक्षा आत्मसंयमाची जाणीव निर्माण करणे अधिक महत्त्वाचे आहे.
✒️सुनिल जाधव पुणे ९३५९८५००६५
==================

0 टिप्पण्या