🩺हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺
धोक्याची घंटा! सर्दी-खोकल्याकडे करू नका दुर्लक्ष; स्वाइन फ्लूचा वेगाने प्रसार, 'ही' आहेत लक्षणं
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 27/8/2026 :
दिल्ली-एनसीआरसह देशभरात सध्या स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत आहे. पाऊस आणि दमट वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. अनेकदा आपण याकडे दुर्लक्ष करतो किंवा घरगुती उपाय करून मोकळे होतो.
अशीच काही लक्षणं H1N1 व्हायरसच्या संसर्गातही दिसून येतात, ज्याकडे वेळेवर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. स्वाइन फ्लू कसा पसरतो, याची सुरुवातीची लक्षणं कोणती, यापासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी आणि कोणाला याचा सर्वाधिक धोका आहे? याबाबत जाणून घेऊया.
स्वाइन फ्लूबाबत डॉक्टरांचा सल्ला
स्वाइन फ्लू म्हणजेच 'इन्फ्लूएंझा A (H1N1)' हा आजार होय. इन्फ्लूएंझा 'ए' व्हायरस सबटाईप H1N1 (A/H1N1) हा इन्फ्लूएंझा ए व्हायरसचाच एक प्रकार आहे.
हा व्हायरस थेट तुमच्या श्वसनसंस्थेवर हल्ला करतो आणि श्वसनाशी संबंधित आजारास कारणीभूत ठरतो. या आजाराची सुरुवातीची लक्षणं ओळखणं सर्वात महत्त्वाचं आहे.
स्वाइन फ्लूची लक्षणं
स्वाइन फ्लूची लक्षणं अचानक दिसू लागतात. अनेकदा ही लक्षणं नेहमीच्या आजारांसारखी वाटतात, पण तसं नसतं. ताप, खोकला, घशात खवखव, नाक बंद होणं, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणं, थकवा ही लक्षणं आहेत.
काही लोकांना उलटी आणि जुलाबाचा त्रासही होऊ शकतो. इन्फ्लूएंझाच्या गंभीर प्रकरणांमध्ये न्यूमोनिया, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा इतर वैद्यकीय गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्वाइन फ्लूपासून बचावासाठी काय करावं?
स्वाइन फ्लूच्या धोक्यापासून वाचण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे: साबण आणि पाण्याने वारंवार हात धुवा. डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा. घरामध्ये आणि आजूबाजूला हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
फ्लू सारखी लक्षणं दिसल्यास घरीच राहा आणि इतरांच्या संपर्कात येणं टाळा. खोकताना किंवा शिंकताना टिश्यूचा वापर करा आणि गर्दीच्या ठिकाणी नीट बसणारा फेस मास्क वापरा.
कोणाला आहे सर्वाधिक धोका?
कोणत्याही व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो, परंतु लहान मुलं, वृद्ध आणि गरोदर महिलांना याचा सर्वाधिक धोका असतो. याशिवाय तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल किंवा आधीच एखादा आजार असेल, तर स्वतःची विशेष काळजी घ्या.
♻️ ♻️
0 टिप्पण्या