बुद्ध मूर्तीचे रहस्य

 

बुद्ध मूर्तीचे रहस्य

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/8/2026 :

१९५५ साल. बँकॉक.

Wat Traimit या बौद्ध मंदिराच्या आवारात बुद्धाची एक प्रचंड मूर्ती कित्येक वर्षं एका साध्या पत्र्याच्या छपराखाली उभी होती.

ती मूर्ती प्लास्टर आणि रंगीत काचेने मढवलेली होती. दिसायला फारशी आकर्षक नव्हती. मंदिराकडे तिला ठेवण्यासाठी पुरेशी मोठी इमारतही नव्हती. त्यामुळे ती वर्षानुवर्षं तशीच पडून राहिली.

१९५४ मध्ये तिच्यासाठी नवीन विहार बांधण्यात आला. २५ मे १९५५ रोजी मूर्ती तिथे हलवण्याचं काम सुरू झालं.

आणि मग एक अपघात झाला.

मूर्ती उचलताना दोर तुटले आणि ती खाली आदळली. बाहेरच्या प्लास्टरचा काही भाग फुटला.

आतून काहीतरी चमकलं.

काम थांबवण्यात आलं.

प्लास्टर काळजीपूर्वक काढायला सुरुवात झाली.

आणि त्यामागून बाहेर आली तब्बल साडेपाच टन वजनाची सोन्याची बुद्धमूर्ती.

आज तिला Phra Phuttha Maha Suwanna Patimakon किंवा साध्या भाषेत Golden Buddha म्हणून ओळखलं जातं. मूर्ती सुमारे तीन मीटर उंच आहे आणि Guinness World Records ने जगातील सर्वात मोठी solid-gold sculpture म्हणून तिची नोंद केली आहे.

आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूर्ती एकाच अखंड तुकड्यात बनलेली नव्हती. प्लास्टर काढल्यानंतर ती दहा भागांत वेगळी करता येते हे समजलं. तिच्या पायथ्याशी ते भाग वेगळे करण्यासाठी वापरता येईल अशी एक किल्लीसुद्धा सापडली.

पण सर्वात मोठा प्रश्न दुसराच होता.

इतकी सुंदर सोन्याची मूर्ती प्लास्टरमध्ये का लपविली असावी?

१७६७ मध्ये बर्मी सैन्याने Ayutthaya वर आक्रमण केलं. त्या काळात मंदिरं, राजवाडे आणि मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणावर लूट झाली.

याच आक्रमणापासून सोन्याची मूर्ती वाचवण्यासाठी तिच्यावर प्लास्टरचा जाड थर चढवण्यात आला असावा, अशी सर्वमान्य कथा आहे.

ही युक्ती यशस्वी झाली खरी.

पण इतकी यशस्वी की पुढच्या पिढ्यांनाच आत सोनं आहे हेच माहीत राहिलं नाही.

काळ बदलला. राजे बदलले. मंदिरं बदलली.

त्या साध्या दिसणाऱ्या आवरणाखाली किती मोठी संपत्ती उभी आहे हे कुणालाही कळलं नाही.

मला या गोष्टीत सोन्यापेक्षा प्लास्टर अधिक मनोरंजक वाटतं.

कारण प्लास्टरने सोन्याची किंमत कमी केली नव्हती.

त्याने फक्त ती दिसेनाशी केली होती.

कदाचित आपल्याबाबतीतही हेच घडत असावं.

लहानपणी एखादं मूल खूप प्रश्न विचारतं.

“फार प्रश्न विचारू नको.”

पहिला थर.

एखाद्या मुलीला चित्रकला आवडते.

“छंद म्हणून ठीक आहे. पण career?”

आणखी एक थर.

ऑफिसमध्ये तुमच्याकडे वेगळी कल्पना असते. तुम्ही ती सांगता. कुणीतरी हसतं. वरिष्ठ दुर्लक्ष करतात.

पुढच्या वेळी तुम्ही गप्प बसता.

आणखी एक थर.

तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असतो. पुस्तक लिहायचं असतं. YouTube channel सुरू करायचा असतो. नोकरी बदलायची असते.

पण डोक्यात प्रश्न येतो—

“लोक काय म्हणतील?”

आणखी थोडं प्लास्टर.

हे सगळं एका दिवसात होत नाही.

हळूहळू आपण आपली मतं थोडी सुरक्षित करतो. कल्पना थोड्या सामान्य करतो. स्वप्नं थोडी practical बनवतो.

कारण वेगळं दिसणं धोकादायक वाटतं.

Fit in होणं सुरक्षित वाटतं.

आणि काही वर्षांनी बाहेरचं आवरण इतकं घट्ट होतं की आपल्यालाच ते आपलं खरं व्यक्तिमत्त्व वाटू लागतं.

“मी creative नाही.”

“मला लोकांसमोर बोलता येत नाही.”

“Business माझ्यासाठी नाही.”

“माझ्याकडून हे होणार नाही.”

पण यातलं किती खरं आहे?

आणि किती वर्षानुवर्षं जमा झालेलं प्लास्टर?

Golden Buddha ची किंमत १९५५ मध्ये अचानक वाढली नव्हती.

सोनं आधीपासून तिथेच होतं.

फक्त एका अपघाताने वरचा थर तुटला आणि आत काय आहे ते जगाला दिसलं.

माणसांच्या आयुष्यात मात्र असा अपघात नेहमी होत नाही.

आपल्यालाच कधीतरी स्वतःकडे पाहून विचारावं लागतं—

मी ज्याला “मी” समजतोय, तो खरंच मी आहे?

की अजूनही सोन्यावर प्लास्टर चढलेलं आहे?

✍️ सलिल सुधाकर चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या