कामाठीपुरा प्रकरण 9
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक1/8/2026 :
*रविवार उजाडला.*
*पॅव्हेलिअन बंद झाल्या बरोबर चटई, चादर अंथरली गेली. पाण्याची कळशी ग्लास, नितीन काण्याचा टेपरेकॉर्डर, नव्याकोऱ्या कॅटचे बंडल चटईवर पडले.*
*पंटर लोक हळूहळू नाही, पटापटा जमले आणि* *पत्त्यांचा डाव सुरू झाला.*
*पुढे काय होणार हे* *सगळ्यांना माहीत होतं आणि त्याप्रमाणे हालचाली सुरू झालेल्या.*
*महत्वाचं म्हणजे ही पोरं खूश होती ह्या सगळ्यासाठी. खूप मजा यायची यांना राडा करण्यात.*
'गांड मे नै गू और हगने चला झु' अशी काहीशी मानसिकता असायची. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कुठल्याही पातळीवर जायचे. कुणालाही नडायचे.
राडा म्हटला की यांना ऊत यायचा... राडा म्हणजे उत्सव असायचा कामाठीपुऱ्यात.
डाव मांडण्यात आलेला...
उन्हाळ्यातली दुपार. दुपारचे साडे बारा झाले असतील.
बाहेर ऊन चटका देत होतं. कडदोडीच्या छपरांवर नजर टाकली की पाण्याचे तरंगणारे लेअर दिसायचे इतका भ्रम व्हायचा डोळ्यांना.
रस्त्यावर सन्नाटा पण घराघरातून मात्र मटण, मच्छीचा सुवास पसरलेला.
चिनूचा हाफव्हॉली जाड्या राजूने कडदोडीच्या बाहेर फेकला. दुसरा बॉल घेऊन चिनूने गुड लेन्थवर त्याला बीट केलं.
'बॉलिंग.. बॉलिंग.. चिन्या. बॉलिंग' पत्ते खेळताना पण शांत्यादाचं लक्ष होतं.
जिमखान्याला लागून असलेल्या छोटुश्या पिचवर पोरांचे क्रिकेट पण रंगात आलेलं.
जुगाऱ्यांना गरम होऊ नये म्हणून जिमखान्याच्या माकडमामाने पंखा आणून दिलेला.
कळशीऐवजी हंडा आणला होता. पापलेट आनंदने बर्फाची लादी फोडली वरचा भुसा साफ करून बर्फाचे खडे हंड्यात टाकले.
जो तो खेळण्यात दंग होता.
बंटी लगबगीनं पॅव्हीलीयनमध्ये आला.
कफनी रामदासचा मुलगा बंटी. सहसा तो येत नसे. त्याचा ग्रुप विहार आणि दरग्याकडे बसायचा पिंपळाच्या सावलीत.
‘काय वोल्तो’ फेफ्टीची प्रतिक्रिया आली बंटीने त्याला बाजूला घेऊन काहीतरी सांगितल्यावर.
'आय शप्पथ दादा तीनदा झाडी मारून गेले.. बाईकवर आहेत दोघे' बंटी म्हणाला.
'चल' म्हणत फेफ्टी बंटीला घेऊन जिमखान्याबाहेर आला.
दोघे कोपऱ्यात लपून उभे राहिले. एक बुलेट येताना दिसली. जिमखान्याच्या गेटवर बुलेट संथ झाली. त्यावर बसलेल्या दोघांनी आत कोण कोण आहेत हे बघण्याचा प्रयत्न केला. एकमेकांना खुणावून दोघे निघाले.
ते गेल्यावर फेफ्टी सुसाट धावत जिमखान्यात घुसला.
फेफ्टी येण्याआधीच येडा राजूचा बिल्लू येऊन पक्की खबर देत होता 'बावा चिकना निकला है इधर आनेको मेक्कू येडे ने बोला आप लोगोको बताने को इसलिये आया हुं. रेडी रहना'
'सही बोल रेल्ला है... ऐ सामान काढा रे सगळे' फेफ्टीने कन्फर्म केलं
'क्या बात है बावा.. अब्बी मजा आयेगा' पावट्याने पत्ते आवरायला सुरुवात केली.
बैठक उठली...
अन्याने बाहेर जाऊन झाडी मारली. लहान मुली, मुलं खेळत होती.
‘ये सुमे, बंड्या येय तू काय नाव तुझं... जा घरी पळा जा' अन्या दमात म्हणाला
पोरं जात नाहीसी बघून 'अरे जा ना आय्घाल्यांनो.. इथं राडा होणार हाय' म्हणत डोळे वटारल्याबरोबर पोरांनी धूम ठोकली.
'मी इथंच थांबतो, माझ्याबरोबर कोण कोण थांबतोय?' शान्त्यादा बोलल्याबरोबर सगळ्यांनी हात वर केले...
'ये सगळे नको... लट्या, नितीन, पावट्या आणि पासकीन मामा आपण पाच जण थांबूया, आम्ही पत्ते खेळायचं नाटक करतो. बाकीच्यांनी फिल्डिंग लावा, चला पटापट, टाईम नाय आपल्याकडं' म्हणत श्यान्त्या दादाने स्ट्रॅटेजी आखली.
‘एक सांगतो लक्ष्यात घ्या किती असतील कोण असतील माहीत नाही मी इशारा केल्या शिवाय बाकीच्यांनी ॲटॅक करायचा नाही, आम्ही पाच जण बघून घेऊ.. काय मामा?' दादाने पासकीन मामाकडे पाहिलं.
'हुम्म ऽऽ हु हु' सिगारेट शिलगाऊन काडी फेकताना मामाने शान्त्यादाच्या म्हणण्याला दुजोरा दिला.
खबर लागताच आणखीन दहा-बाराजण धपाधप जिमखान्यात जमले. सगळ्यांना समजावून त्यांच्या त्यांच्या जागा देण्यात आल्या. प्रत्येक जण सामानासकट तयारीत होता.
चिनूने गुप्ती, चॉपर, सलिया, तलवार, हॉकी स्टिक चटईत गुंडाळून चटई शान्त्यादाच्या शेजारी ठेवली. तो तिथे रेंगाळलेला बघून शान्त्यादा भडकला.
'ये चिनू तू काय करतो इथं .. चल वटक गांडू' शान्त्यादा.
'थांबतो ना दादा... काय लागलं बिगलं तर' चिन्या.
‘अबे येड्या तुझं डोकं सटकलंय काय... निघ इथून... जा वरती, गच्चीवर जा...' पास्कीन मामा
'ही बचकानी पोरं सुधारणार नाहीत.. भाईगिरी करायला लागलीत हल्ली... गांडू शाळा शिकायचं सोडून झोलझमेले करत बसतात... बावा तेरी पिस्सी है' चिनूने कल्टी मारल्यावर लट्याने कॅट पासकीन मामाकडे फेकले आणि थोडं ग्यान वाटलं.
‘इन लोगोंका गुरु तू हि है ना... बछडेमे लंगडी गाय' नितीन काण्याने त्याच्या खडूस नजरेतून विचारलं तसा लट्या नरमला.
काही झालेलं नव्हतं.. आणि काही होणार नाही... सगळं, सगळं विसरून ह्या पाच जणांनी पत्त्याचा डाव मांडला.
दुपारचे दोन वाजलेत.
पासकीन मामाची बायको नेहमीप्रमाणे रविवारी पत्ते खेळणाऱ्या आपल्या नवऱ्याच्या जेवणाचं ताट पदरात झाकून पॅव्हीलीयनच्या दिशेने निघालेय. आज तिनं मुंडीचं कालवण, कलेजी फ्राय आणि पासकीन मामाच्या आवडत्या तांदळाच्या भाकऱ्या केल्यात. मोठी पोरं दारवा पितात म्हणून त्यांच्यासाठी वजडी मसाला पण सोबत घेतलाय.
प्रत्येक रविवारी ही दोघं नवरा-बायको दुपारी जिमखान्यात जेवायची. पासकीन मामा तिच्या ग्लासात ती नको नको म्हणताना वाईच मोठा पेग टाकायचा नि मग दोघांची शेरो-शायरी, प्यार, तकरारचा मस्त एपिसोड बघायला मिळायचा.
प्रेमानं बनवलेलं जेवण ती पदरात काळजीनं झाकून पॅव्हेलियनकडे निघाली असताना एक बाईक रापकन तिच्या बाजूनं गेली.
ती सावरली 'ये तुझ्या मुस्क्याला आग लागली तुझ्या. रोग झाला तुला' गर्रकन वळत तिनं शिवी हासडली.
'आयच्या गावात अरे ही बघ मामाला जेवण घेऊन चाललीय 'कौलावर लपलेला फेफ्टी अरुणला म्हणाला. 'अरे थांबव हिला.'
तेवढ्यात ती पोचली पण.
'ऐ ज्यावायला उठा... आज एवढेच?' कमी मेंबर बघून ती चकीत झाली.
'बाकीचे सुधारले की काय... जल्ला मेला, त्याच्या मुस्क्याला लागली आग कधी ती, आता मेली असती मी' जिमखान्याच्या पायरीवर बसत पदराने हवा घेत म्हणाली. 'ये चिन्या पाणी पाज' तिची नजर चिनूला शोधत होती. चिनू नव्हता तिथं. 'अरे गेले कुठे सगळे?" तिने प्रश्न केला.
ती आलेली बघून पाचही जण गांगरलेले. आयला हिला सांगायचं राहून गेलं. फायदा काय इन्फॉर्म केलं असतं तरी पण आलीच असती ही.
'हाहाहाहाहा...' चौघांची अवस्था बघून पसकीन मामा हसला, तसे सगळेच हसू लागले.
'हासताव काय मेल्यानो.. वजडी आणलीय वजडी.. माझा फेफ्टी दिसत नाय, रामदास, अरुण, चंग्या, चिनू... गेली कुठं समदी पोरा?' लट्याच्या पाठीवर थाप मारीत तिनं विचारलं.
लट्याने आता हिला काय आणि कसं सांगायचं ह्या प्रश्नार्थक नजरेने शान्त्यादाकडे पाहिलं. शान्त्यादाने ‘थंड घे' ची खुण केली त्याला.
‘ये चला बसा..बसा’ म्हणत तिनं ताट उघडं केलं.
जेवणाच्या खमंग सुवासाने हुरळलेल्या पावट्याने क्षणात पत्तेच टाकले. मोठ्या टोपात तर्रीदार मुंडीचं कालवण बघून. सगळे बहकले.
'चल निवाला लेते है, माका जो होगा देखेंगे' शान्त्यादाला दुजोरा देत चारही जण हात धुवून जेवायला बसले.
आक्काने ताट पुढे सरकवलं. 'अरे टेप नाय लावला' आक्का.
नितीनने टेपरेकॉर्डर ऑन केलं. 'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नही.. मेरे काम की नही' रफीचं हिर रांझामधलं गाणं म्हातारीला ज्याम आवडायचं. मोठ्या आवाजात लावलं आणि जेवणावर घसरले. सगळ्यांनी भसाभसा जेवण उरकलं. टेन्शन होतं कधी काय होईल. त्यात हि म्हतारी इथं कडमडलेली. तिला इजा होता कामा नव्हतं. तर एकमेकांना आग्रह करत पोटभर पण भराभर जेवले पाचजण.
आग्रह...ताटात कितीका कमी जेवण असुद्या इथे समोरच्या मित्राचं पोट भरलं जाईल ह्याची काळजी असायची. अक्खी तंदुरी कोंबडी संपवणारा कमी जेवण असल्यावर दोन इवलेसे घास घेऊन ताटावरून उठून ढेकर देत म्हणायचा 'भाई तबयित से खाया... आता हे संपवा तुम्ही माझं तर पोट भरलं. काळजी असायची एकमेकांची एवढंच.
मग ‘लेना भाय थोडा तो खतम कर... थम्सा मंगा.' कोल्ड ड्रिंक पिण्याच्या अटीवर तडजोड व्हायची नि मॅटर निकालात निघायचा.
आज इथे असं काही नाही झालं. पाच जण सुमडीत जेवले, जेवावं लागलं अक्कामुळे तिने आणलेल्या जेवणामुळे. जेवताना सगळे नाराज होते.
कारण
उन्हातानात कडदोडी, गच्ची, कौलं त्यावर हातात सामान घेऊन अन् समोरच्याला भिडायच्या तयारीत असलेली उपाशी, भुकेली पोरं. ही मुलं नेम धरून होती गल्लीवर.
ह्या सगळ्यांची जाणीव होती टीमला... पास्कीन मामा, शान्त्यादा, नितीन काण्या ताटावरून थोडक्यात उठले. लट्या अन् पावट्याने ताव मारला.
इतक्यात एक जीप झपक्कन येऊन जिमखान्याच्या गेटबाहेर थांबली...
जीपमध्ये सात-आठ जण असतील... त्यातले दोघे उतरले. गेटवर कडक्या आव्या उभा होता.
‘श्यान्त्या किधर है?' प्रश्न आला.
‘कौन श्यान्त्या? इधर चार, पाच श्यान्त्या है'
अव्याने कन्नी मोडली. समोरच्याने मागे पाहिलं, जीपकडे
‘नौटंकी इसकी माका’ म्हणत जीप ड्राईव्ह करणारा खाली उतरला. अव्याला बाजूला ढकलत त्याने जिमखान्याच्या गेटमधून आत एन्ट्री घेतली.
सलीम होता तो... चिकना सलीम म्हणून ज्याचा दरारा होता अख्ख्या रेड लाईट एरियात.
केस मेंदीने रंगवलेला, हनुवटीपर्यंत झुकलेल्या मिश्या त्यांना पण मेंदी लावलेली. गोरा चकाकता रंग, डोळ्यात सुरमा घातल्यामुळे लाल, तारवटलेले डोळे भसकन समोरच्याचा वेध घेत. पांढरा शुभ्र बॉस्कीचा तलम शर्ट, त्याची तीन बटणं खुली त्यातून डोकावणारी सोन्याची जाडीभरडी साखळी. ग्याबार्डिन ची पांढरी शुभ्र बेल बॉटम पँट, अन पायात तितकेच शुभ्र चामड्याचे शूज. उजव्या हातात खडे माळलेल्या टपोऱ्या सोन्याच्या अंगठ्या अन् जाड सोन्याचं ब्रेसलेट, डाव्या हातात चकाकणारं सोन्याचा मुलामा असलेलं घड्याळ. अशा डौलदार वेशात तो घुसलेला जिमखान्यात.
सहसा तो कुणाला सामोरा जात नसे पण त्याने लांबड्या चाळीबद्दल ऐकलेलं आणि त्याला आजमावायचं पण होतं लांबड्या चाळीला म्हणून तो ह्या गेममध्ये स्वत: उतरलेला. लक्ष्मी अक्काने भरपूर बिदागी देऊन त्याला धाडलेला ह्या मोहिमेवर.
'शान्त्या कौन है?'
अक्काने आवरलेलं रिकामं ताट सलीमनं पायाने भिरकावलं अन ते नेमकं नितीन काण्याच्या पुढ्यात ताड-ताड करत झांझंगत झांजरलं.
‘मै हु श्यान्त्या, बोल’ ताटाची झांज आवरत अन् त्याला पोटाशी कवटाळत, एका हाताने टेपरेकॉर्डर बंद करत त्याचा खतरी लुक सलीमवर टाकत नितीन म्हणाला.
सलीम नितीनकडे सरसावणार तोच श्यात्यांदाने आवाज दिला 'श्यान्त्या इधर है बोल' जेवण उरकून मुकळी भरत असलेला श्यान्त्यादा टॉवेलला हात पुसत म्हणाला.
श्रीमंती लिबास मधला सलीम, शुभ्र बनियन आणि साध्या पँटमधल्या श्यान्त्याला बघून विचारतोय.
‘तू श्यान्त्या है क्या?’
'हा मै शान्त्या हूं.. बोलना'
'उस्मान उठा इसको' सलीमने उस्मानला हुकूम सोडला. थेट शान्त्यादाला उचलायची भाषा करत होते हे लोक
उस्मानने समोर येऊन शान्त्याभायची बनियान खेचली 'चल बे शाने गाडीमे बैठ.'
शान्त्यादाने त्याचा हात अलगद सोडवला आणि त्याच्या शर्टाची कॉलर दोन्ही हाताने पकडून त्याला स्वत: जवळ खेचले नि एक सणसणीत टक्कर ठेवून दिली त्याच्या नाकावर. 'ठोप' असा आवाज झाला. क्षणात रक्तबंबाळ अवस्थेत अगडबंब उस्मान खाली कोसळला.
हादरलेल्या सलीमने मागे सरून जीपमध्ये बसलेल्या आपल्या साथीदारांना हाक मारली. हे एवढं होईल याची त्याला कल्पना नव्हती.
एवढं काय ? पुढे केवढं तरी होणार होतं.
*✍️ सुधीर जाधव*
💠 पुढे क्रमश..... प्रकरण १०
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या