कामाठीपुरा प्रकरण 2️⃣9️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
*‘आण रे भेन्चोद लोकांना' आतून आवाज आला.*
*बाकाला अडकवलेली चिनूची बेडी सोडली गेली. पहिलं त्याला आत घेतलं. मंद प्रकाश. समोरच्याचा चेहरा नीट दिसणार ह्याची पुरेपूर काळजी घेतली* *गेलेली. एक बाकडं, बाजूला पडलेले दोन टायर, चक्कीचे पट्टे, छोटीशी खुर्ची एवढीच प्रॉपर्टी त्या खोलीत.*
खुर्चीत चिनूला बसवलं. त्याचे कपडे काढून हात मागे बांधले गेले. पुढ्यातल्या बाकावर त्याला पाय ठेवायला सांगितले. एक चिनूच्या मागे आणि दोघं त्याच्या पायाजवळ. स्टाफने चिनूला घेरलं.
फाईल बाजूला ठेवून साहेब उठले. चिनूकडे सरकले. हातात दोन फूट लांबीचा अन् चार इंच रुंदीचा जाडा चक्कीचा पट्टा, त्याचं चकाकणारं लाकडाचं हँडल त्याच्या रोजच्या वापराचा पुरावा देतंय.
'बोल रॉबरी कशी केली, कसं फोडलं दुकान?' थंड आवाजात साहेबांनी चिनूच्या तोंडाजवळ येत प्रश्न केला.
दारूच्या उग्र, घाणेरड्या दर्पाने चिनू गुदमरला.
'रॉबरी?' चिनू दचकला.
'हा रॉबरी' चिनूच्या कानाखाली फाडकन जाळ उमटला.
‘मादरचोद.. फारस रोडच्या ज्वेलरीच्या दुकानात झालेली रॉबरी. माल कुठे ठेवलाय? कुणाला विकला?' चिनूच्या पायावर पट्ट्यांचे वार करत इन्स्पेक्टर गरजला.
‘सर रॉबरी नाही केली आम्ही... तुमचा गैरसमज होतोय... आपसातलं मॅटर होतं. आमच्या मित्रांत भांडण झालं आणि चाकू त्याच्या पोटात भोसकला गेला बास...' चिनू कळवळत बोलला.
'अरे मादरचोद तेच बोलतोय मी, रॉबरी केलीत आणि पैशांच्या वाटपावरून भांडण झालं नि खून केलात साथीदाराचा... बोल... बोल कबूल कर रॉबरी केल्याचं’ म्हणत सगळे तुटून पडले चिनूवर... पंधरा मिनिटं प्रहार चाललेले... पोटात, थोबाडात, त्याच्या पायांच्या तळव्यावर.
चिनूला संदीप अण्णाच्या वाक्याची आठवण झाली. खोटी केस त्याच्यावर खपवण्याचा प्रयत्न चाललेला. चिनू आईच्या नावाने किंचाळत होता. इतका किंचाळला की नागपाडा पोलीस स्टेशनपासून जवळ असलेल्या कामाठीपुरा तेराव्या गल्लीत शिरून, डाव्या बाजूला वळसा घेऊन ती किंचाळी लांबड्या चाळीतल्या त्याच्या बेचाळीस नंबरच्या खोलीत जाग्या असलेल्या आईच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचली असेल.
'मी रॉबरी नाही केली' चिनू भयानक ओरडला.
'तू रॉबरी केलीस... कर कबुल' साहेब ही तितकेच भडकलेले. चिनूला खुर्चीतून सोडवून, नागडं बाकावर झोपवलं गेलं. पट्ट्याचे फटके आता चिनूच्या उघड्या बोच्यावर बरसत होते. साट साट साट.
‘साहेब नका मारू. कबूल करेल तो. बाळा हो म्हण, कर कबूल गुन्हा, घे वेळ निभावून नाहीतर मरशील बेटा' एक मारणारा सिनियर स्टाफ सभ्यपणाचा आव आणून चिनूला समजावू लागला.
'रॉबरी नाही केली आम्ही... भेन्चोद मार जेवढं मारायचंय...' चिनू चिडलेला
पुन्हा अभिषेक सुरू झाला. शॉक दिला गेला.. चिनू कोसळला तोंडावर, त्याला पुन्हा बसवण्यात आलं. दोन्ही हात पुढे करायला सांगितले. त्याला पुन्हा फटके दिले गेले. साहेब थकत नव्हते. कुणीही थकत नव्हतं. चिनूच्या तोंडातून रक्त गळायला लागलेलं. त्याच्या तोंडावर फवारा मारला गेला. त्याचे दोन्ही हात समोर घेऊन त्यावर चक्कीच्या पट्ट्याचे घणाघाती प्रहार केले गेले.
'ये उठ उठ भेन्चोद' म्हणत त्याला उभं राहायला सांगितलं. चिन्या कसाबसा उठला.
‘पाय आपट.. हात आपट भिंतीवर' म्हणत त्याच्या कानाखाली देऊन जमेल तशी क्रिया करायला लावली. चिनू पुन्हा कोसळला. अगदी आडवा.
'सोड ह्याला... बाकीच्या दोघांना घेऊन ये'
चिनूला पडणारे फटके, त्याचा आकांत अरुण नि चंग्याकडे स्पष्ट पोचत होता. त्याला बाहेर फरपटत घेऊन येताना ह्याचं काळीज थरारलं.
गर्भगळीत चिनूला बाहेरच्या बाकावर बेडीत अडकवलं गेलं. अरुण नि चंग्याला आत घेतलं.
पुन्हा तोच मार, तोच प्रश्न.
‘रॉबरी केलीत... तुमच्या जोडीदाराने सगळं कबुल केलय... भोसडिच्यानो कबूल करा... ये सावंत लिहून घे ह्यांच्याकडून' दोघांना बेदम चोप देऊन ओठांच्या कडेला आलेला पांढरा फेस पुसत, रक्ताळले डोळे दोघांवर डागत साहेब कडाडले.
ह्यांचे तेच उत्तर. 'साहेब आम्ही असलं काय केलं नाही.'
‘कर रे आडवा भडव्यांना' दोघांना नागडं करून जमिनीवर पालथं केलं नि चारही जणांनी पट्ट्यांची बरसात केली त्यांच्या उघड्या अंगावर.. प्रचंड आरोळ्या.
चिनूला, चंग्या, अरुणला पुन्हा आत आणलं गेलं.
‘मला सांग आज कंपनीच्या बराकीत तुम्हाला शिफ्ट केलं गेलं. त्यांच्याशी तुमचं काय कनेक्शन? तान्या बंधु कोण ? बिपीन, दुर्गाला तुम्ही कसे ओळखता? ह्या लोकांसाठी तुम्ही काम करता... त्या बिल्डरचा गेम तुम्हीच केलात ना... एक रेप में पण केलाय तुम्ही तिघांनी मिळून बोल ना भोसडीच्या... तुमच्या आयचा पुच्चा तुमच्या’ दे दाणादाण सुरुवात झाली पट्ट्यांची नि बुक्क्यांची.
भयानक मार पडलेले तिघे जण उत्तर देण्याच्या काय पाणीही मागण्याच्या अवस्थेत नव्हते. पार चोळामोळा झालेला. तिघेही कोसळले.
पाणी शिंपडलं गेलं ह्यांच्यावर. त्याच अवस्थेत फरपटत बराकीत आणलं गेलं.
पांढरं फटफटलेलं. उजेडानं दुकान उघडलेलं.
लॉकअपचं दार उघडून तिघांना बराकीत फेकलं गेलं. तिघेही ढुंगण घासत बराकीत पोचले.
आत आल्या आल्या संदीप अण्णा आणि बाकिच्यांनी तिघांना अलगद उचलून चटईवर झोपवलं. यंत्रणा तयार होती.
पटापट डबल्स कामाला लागले. जमा केलेल्या वर्तमानपत्रांचा गठ्ठा आणला गेला. तीन छोट्या दगडांची चूल रचण्यात आली. चुलीवर छोटीशी वाटी, त्यात विशिष्ट तेल तापवण्यात आलं. उन उन तेलाने तीन-चार डबल्स तिघांच्याही ढुंगणांची, हाता-पायांची मालिश करू लागले. वेदना भयानक होत होत्या. चिन्याच्या चेहऱ्यावरची सूज वाढू लागलेली.
संदीप अण्णाने सिगारेट शिलगावली. त्याचा विशिष्ट दर्प होता.
‘मार भेन्चोद... दो मिनट में सब ठीक होगा' म्हणत त्याने सिगारेट चिनूच्या ओठांशी लावली.
चिनूने हलकासा कश घेतला. बरं वाटलं त्याला. अण्णाने अजून एक कश त्याला घ्यायला लावला. थोड्याच वेळात तो सगळ्या वेदना, देहभान विसरून मस्त झोपेत विलीन झाला.
अरुण नि चंग्याला पाणी दिलं त्यात व्होडका मिक्स होती. चंग्याला माव्याची पुडी सरसावली. तो माव्यात दंगला.
पूर्ण दिवस तिघांनी एन्जॉय केला. झोपायचं, खायचं, मालिश नि मस्त राहायचं. दोन दिवसात तिघे ठणठणीत झाले. तीन पोलीस स्टेशनांत ह्यांचा ताबा घेतला गेला.
खबर आली-फेफ्टी बरा झालेला. त्याला चूक उमगलेली. त्याने लालाशी बोलून केस मागे घेतली.
तिघांना क्रिमिनल बॅकग्राऊंड नव्हता. जेल कस्टडी व्हायच्या आत तिघांना जामीन मंजूर झाला. तिघेही सुखरूप बाहेर आले. मोठा अनुभव पाठीशी घेऊन.
दहावी गल्लीच्या बाजूच्या तेलुगु मुनुरवारवाडीतल्या समाज कल्याण केंद्राच्या पायरीवर संध्याकाळी चिनू आणि गँग जमायची.
लॉकअपमधून बाहेर आल्यावर चाळीतल्या बाकड्यावर बसणं ह्या लोकांनी सोडून दिलेलं. मधूनमधून जीप घिरट्या मारायची नि उगाचच कुणालाही उचलायची.
वाडी खूप सेफ होती. आतमध्ये अंधार. तुरळक मनुष्यवस्ती. वाडीच्या भिंतीपल्याड लागूनच पॅव्हेलिअन तिथून हे लोक ये-जा करत.
केंद्राचे वाचनालय देवरे सर चोख साडे सातला बंद करायचे. आंघोळ पांघोळ केलेले सगळे भाई हळूहळू मग केंद्राच्या पायरीवर जमत.
वाडीत सगळे मॅटर सॉल्व्ह केले जायचे. घड्याळांचे क्यारिंग, चमडी मॅटर म्हणजे कुणाच्या आय-बहिणीला, बायकोला होणाऱ्या जाचातून हे समोरच्याला फटके देऊन मुक्त करत असत. मटक्याची वसुली वगैरे त्याबदल्यात ह्यांची फी ह्यांना मिळे.
दारू, चरस, जुगाराचे हफ्ते इथे गोळा होत. इथून रात्री मग हे लोक सातव्या गल्लीतल्या वखारीकडे सटकत.
मर्डर केसमधून बाहेर आल्यावर हे लोक नकळत प्रोफेशनल बनू लागलेले. आपापला काम-धंदा सांभाळून हे सगळे उद्योग करायचे हे लोक.
चिनू सकाळचं कॉलेज करून एका जाहिरात कंपनीत नोकरी करत होता. ऑफिस तो तडक वाडीत यायचा. त्याची बॅग त्याच्या घरी पोचती सुटल्यावर व्हायची. केंद्राच्या पायरीवर ह्याचे प्लान आखले जायचे. वाडीत ह्यांच्या मेम्बरांची संख्या वाढू लागलेली.
केंद्राला तीन दरवाजे. मागचे दोन्ही दरवाजे बंद आणि पुढच्या एका दरवाजातून केंद्राच्या केअर टेकरचं येणं-जाणं व्हायचं. बाकी दोन बंद असलेल्या दरवाज्यांच्या पायरीवर ही गँग बसून अरबट चरबट बोलायचे.
‘विल यु प्लीज शट युवर माऊथ?' खाडकन उघडलेल्या पुढच्या दरवाजातून एक मधुर दमदाटीवजा आवाज दुमदुमला.
सगळ्यांच्या माना त्या दिशेने वळल्या.
एक सुंदर, गोड चेहरा चिनूच्या गँगला दरडावत होता. 'किती दिवस सहन करतोय आम्ही? अरे, गुंड म्हणून जाब विचारायची कुणाची हिम्मत होणार नाही असं वाटलं की काय तुम्हाला? गो अवे फ्रॉम हियर. तुमचे हे.. काय म्हणतात त्याला... हा.. लोचे लबाचे, हे लोचे लबाचे जाऊन दुसरीकडे कुठे तरी डिस्कस करा. हात जोडते तुम्हाला. आम्हाला आमची रिहर्सल करु द्या. नाटकाचा प्रयोग दोन दिवसावर व आलाय. कित्ती हिडीस फिडीस आणि मोठ्यानं बोलतात... शी' मुलगी तावातावाने बोलत होती.
'ओ... तुम्हाला काय झालं.. तुम्हाला कोन काय बोल्लं काय?' आऱ्याने बसूनच विचारले.
'अरे मला काय बोलाल. एवढी हिम्मत आहे का तुमच्यात' ती जरा जास्तच बोलत होती.
'हिच्या आयला हिच्या...' आया उठून उभा राहिला तेवढ्यात चिनूने त्याला थांबवले आणि तो पुढे सरसावला.
चिनू पुढे येताना पाहून त्या मुलीच्या मागून एक गोऱ्या रंगाचा, रुपेरी लांब केसांचा, सरळ नाकाचा, चेहऱ्यावर विलक्षण तेज असलेला, गळयापुढे एम्ब्रॉयडरी केलेला पांढरा शुभ्र लखनवी झब्बा परिधान केलेला गृहस्थ पुढे आला. गोड हसत त्याने त्या मुलीला बाजूला केले.
‘अण्णा' चिनू उद्गारला.
'अरे काय मस्त गेम प्लान असतात यार तुमच्या लोकांचे... सॉरी, हिने तुम्हाला डिस्टर्ब केलं. गेले दोन आठवडे मस्त दरवाज्याला कान लावून ऐकतोय. आज ह्याला उचलुया... उद्या त्याची घेऊया. परवा त्याला फोडुया हाहाहा. काय चिन्या. अरे अशाने फसाल ना यार. अशा गोष्टी कशा सुमडीत झाल्या पाहिजेत नाही का.' अण्णा.. स्वामी अण्णा... चिकणं हसत म्हणाला.
अण्णाच्या मागे ह्या सगळ्यांना ओळखणारी अजून एक काळ्या कातळ रंगाची, पांढऱ्याशुभ्र फताड्या दातांची व्यक्ती खी खी हसत होती. रामचंद्र साळुंखे.
'सॉरी अण्णा, लक्षात नाही आलं. एवढा आत आवाज जात असणार ह्याचा विचार नव्हता केलेला' चिनू खजील झाला.
'अरे सॉरी काय बोलतो झकाटन्या... ये आत ये. आम्ही काय करतो ते बघ तरी.’ रामचंद्र साळुंखे ज्याला स्वामी अण्णा 'बाबू' म्हणून हाक मारायचा.
'ये रे च्यायला. तुझे चेले दरवाजाच्या भोकातून बघतात कळत नाही का आम्हाला?' स्वामी अण्णा.
‘आणि तुम्ही आमचे बोलणे ऐकता दरवाज्याला कान लाऊन ते’ चिनू पण हसत म्हणाला.
इतक्यात चाळीतला विजयदादा पण बाहेर आला नी त्याने आत येण्यास खुणावलं.
विजय जाधव म्हणजे विजय दादा पण लांबड्या चाळीतला. डेअर डेवील राडेबाज पोरगा. एका लफड्यात गोळी पण लागलेली त्याला. पण नाटकात जाऊन दादा खुप सुधारलेला. नाटक माणसाच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करतं असा त्याचा ठाम समज आणि ते खरंही होतं.
मस्त हसले सगळे ती मुलगी आताशा शांत झालेली.
'या रे या सगळे' बाबूने दरवाजा पूर्ण उघडला.
नको नको म्हणत होते सगळे पण आत काय चालते ते बघण्याची सगळ्यांचीच इच्छा होती.
अण्णाने चिनूला आत खेचल्याबरोबर सहा-सात जण लगबगीने आत शिरले.
आतमध्ये लांबलचक जागा होती. टेबल-खुर्च्या मागच्या बाजूला सारून मध्ये प्रशस्त जागा केलेली. त्या जागेत एक फूट उंची असलेले आणि सहा बाय सहा फुट लांबी रुंदीचे दोन प्लॅटफॉर्म ठेवलेले होते. त्याच्या मध्ये आणि पुढ्यात दोन-अडीच फुटांचे तीन-चार ठोकळे पण होते.
हे सगळे जण अण्णाच्या बाजूला ठेवलेल्या खुर्च्यावर विराजमान झाले. तिथे आणखी बरेचसे लोक होते. त्यात तरुण मुलं आणि मुलीही होत्या.
कुठल्यातरी स्पर्धेच्या नाटकाची तालीम होती. रामचंद्र साळुंखे त्या नाटकाचे दिग्दर्शक होते.
तालीम सुरू झाली.
मघाशी दमदाटी करणारी ती मुलगी.. ती सुंदर मुलगी डाव्या बाजूच्या प्लॅटफॉर्मच्या कडेला पायात डोकं खुपसून बसली. तिच्या मागच्या बाजूस थोड्या अंतरावर चार मुली आणि चार मुलं आलटून पालटून बाजूबाजूला हाताची घडी घालून उभे राहिले.
साळुंखे त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांनी एकदा ती फ्रेमिंग आणी सगळ्यांची पोजिशन तपासली. सगळ्यांना शांत राहण्याच्या आवाज दिला कुणीतरी.
‘स्टार्ट’ म्हणत दोन्ही हातांनी चुटकी वाजवत साळुंखेने सीन स्टार्ट करण्याचा इशारा दिला.
प्लॅटफॉर्मच्या कडेला पायात डोकं खुपसून बसलेल्या त्या मुलीनं हळूहळू आपलं डोकं वर काढलं. ताठ बसत तिनं मान उंच करून छताकडे भेदक नजर रोखली. किंचित पॉज घेऊन ती आपल्या धारदार आवाजात डायलॉग म्हणू लागली. तिच्या प्रत्येक वाक्यासोबत मागे उभे असलेली मुली-मुलं एकसुरात त्यांची वाक्ये म्हणू लागली. त्या सर्वांचे पाठांतर चोख होते.
मुलगी हळूहळू आता त्या प्लॅटफॉर्मवर उभी राहिली. आता तिचा आवाज तेज झालेला. ती हातवारे करू लागली. तिच्या डोळ्यातल्या आसवांचे आता आगीत रुपांतर झालेले. देहभान विसरून ती पूर्ण भूमिकेत शिरलेली. मागच्या मुलामुलींनी आता तिच्या भोवती फेर धरला.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश. पुढे.... प्रकरण ३०
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या