कामाठीपुरा प्रकरण 2️⃣8️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण 2️⃣8️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

*‘बाबा... डोले शोले तो देख इसके. एकदम टारजन है ये तो... लंबी हात मे लेंगा तो चार-पाच जन को तो आरामसे टपकायेगा ये... नया चेहरा है... बोल क्या बोलताय' रॉनी चिनूच्या भरल्या, पिळदार दंडाला हात लावत म्हणाला.*

*'ये रॉनी तेरी माका, गांडू बस कर अभी... दो-तीन पाकीट क्या मारा, खुद को श्याणा समजने लगा क्या' शेखरभाईने तिकडून त्याला झाडलं.*

*रॉनी पण ह्या तिघांकडे च्युत्याटीक हसत बघून पत्ते खेळणाऱ्या मैफिलीत रमला...*

'पाकीटमार बोले तो गेम केलेला. गेम केलेला बोलेतो समोरच्याला ढगात पाठवलेला. ढगात बोले तो... समजतंय ना? त्याला आपल्यात पाकीटमार बोलतात. तुम्हाला इथे येणारे पंटर विचारतील किती पाकीट मारली? नाय मारली सांगायचं. तुम्ही लोक चांगल्या घरचे हाय. बाहेर निघा इथून आणि चांगली जिंदगी बसर करा. ही लाईफ लै बेक्कार, बाहेर आपल्याला भाई समजतात पण काय इज्जत नसते. गांडमस्तीने इथे येतो प्रत्येक जण. अरे कसला भाई लौंड्याचा भाई. गांडीवर फटके पडतात तेव्हा आई आठवते भेन्चोद...' आई, बहीण, बायको घरकाम, काबाडकष्ट करून घर चालवतात. त्या का नाय होत भाई... त्या का नाही होत भाई... त्या वेश्या पण नाय होत, एवढं लक्षात घ्या. दुनियेच्या वखवखलेल्या नजरांचा सामना करून बाई आपलं घर, आपली मुलं सांभाळते नि रांडबाजी, ऐय्याशीला सवाकलेलो आपण कुणाचा तरी जीव घेऊन जेल मध्ये सडतो. थूत अश्या लाइफवर. मारे भी जायेंगे तो कुत्ते की मौत' बोलताबोलता शेखर जोशी ने सिगरेट शिलगावली. चिनूने त्याच्या उघड्या अगडबंब शरीराकडे पाहिलं. अंगावर भयानक वार आणि शिवलेल्याच्या लांबलचक खुणा दिसत होत्या.

दुपारी भल्यामोठ्या टिफिनमधून जेवण आलं. फुल कोर्स असलेलं. रोट्या, डाळ, दोन भाज्या, सलाड, पापड, लोणचं, साधा भात, पुलाव भात, गोड शिरा, गुलाब जामून इत्यादी... इतकं स्वादिष्ट जेवण की बस रे बस. चिनू कंपनीने बाहेर असलं जेवण चाखलं पण नव्हतं.

सगळ्यांनी मस्त ताव मारला. वेज जेवण असल्यामुळे सहा-सात जण कमी जेवले. ह्या तिघांना मात्र आग्रह करून करून खायला लावलं. प्रत्येकाने आपल्या वाटणीच्या दोन-दोन रोट्या डबलच्या ताटात टाकल्या. जेवण उरकलं. डबल्सनी साफसफाई केली.

पांगापांग झाली. ज्याने त्याने आपापला कोपच्या पकडला. कोण झोपी गेलं तर कुणी पत्त्यांच्या मैफलीत सामावलं. सिगरेट, बिडी, तंबाखू, अंट्याच्या आवर्तनाने बराक गुंजली.

बऱ्याच दिवसांनी चांगलं आणि यथेच्छ खायला मिळाल्याने ह्या तिघांनाही सडकून झोप लागली.

... संदीप अण्णा तिघांनाही जागं करत होता.

संध्याकाळचे साडे सहा वाजलेले. साईच्या आरतीची वेळ झालेली. सगळे जण फ्रेश होऊन तयार. काही जणांनी आंघोळ उरकलेली. दिवसभर अंडरवेअर किंवा बर्मुडावर उघड्या देहाने वावरणाच्या सगळ्याच जणांनी व्यवस्थित इस्त्री केलेले शर्ट प्यांट घातले होते. सगळ्यांच्याच दाढ्या मिशा नि केस वाढलेले. पण गुरुवारच्या आरतीसाठी न्हाऊन - धुऊन फ्रेश झालेल्या भाईलोकांचा चेहरा सात्विक भावाने माखला होता. कुणी कुणाला शिव्या देत नव्हतं. सगळे चांगल्या विद्यार्थ्यांसारखे 'शुभंकरोती'ला उभे असतात तसे उभे राहिलेले.

ज्यांच्या नावाने बाहेरच्या जगाचा थरकाप व्हायचा, पेपरात ज्यांच्याबद्दल रकानेच्या रकाने छापून यायचे, गेम वाजवणारे, गँगवॉर गाजवणारे हे सारे एखाद्या कुटुंबवत्सल सदस्याप्रमाणे शांत, निश्चल हजर.

ते मनाने आणखी कुठे असतील त्यांचे त्यांना ठाऊक.

अगरबत्ती, धूप, कापराचा सुगंध एक नंबरच्या बराकीत दरवळला. त्या प्रसन्न धुक्यात साईनाथ महाराजांची आरती सुरू झाली.

‘ओम साई राम... साई राम... साई राम... साई राम... शिर्डी के साई बाबा... तेरा असली रूप दिखला जा रे' खूपच लांबलचक आरती होती. सगळ्यांना पाठ. प्रत्येकाने आपापल्या ओरीजिनल सुराने गाण्याचा अगदी समरसून प्रयत्न केला.

आरती संपल्यावर त्यातल्याच एकाने 'जमाने मे कहा टूटी हुई तसबीर बनती है.... तेरे दरबार में बिगडी हुई तकदीर बनती है' ही 'अमर अकबर ॲन्थनी' चित्रपटातली कव्वाली जमेल तशी रफीच्या आवाजात गायली.

पाठोपाठ एक-दोन गाणी होऊन आरतीचा कार्यक्रम संपला. सगळ्यांना प्रसाद वाटला गेला. चहाची आवर्तनं झडली.

‘ले बावा... लगे दम मिटे गम' च्या आरोळीत आंट्याच्या धुरात सगळे दिसेनासे झाले.

हे लॉकअप होतं.

इथे कुणीच कायमचं वास्तव्यास नसायचं. आठवडा, पंधरा दिवसानंतर प्रत्येक जण इथून हलवला जायचा.

प्रत्येकाचा दुसऱ्या एरियातील पोलीस चौकीच्या लॉकअपला ताबा दिला जायचा. प्रत्येक पोलीस स्टेशनाला गँगवॉर मधल्या आरोपीची किंवा भाईची चेहरेपट्टी तोंड ओळख व्हावी हे त्याच्या मागचं मुख्य कारण होतं.

मुंबईतल्या प्रत्येक एरियात ह्यांच्यावर केसेस असायच्या. खंडणी, अपहरण, खून, काही न काही फाईल असायचीच. मग फिरवलं जायचं ह्यांना सात-सात दिवसांच्या रिमांडवर प्रत्येक लॉकअपमध्ये फटके पडायचे ते वेगळे.

मोठ्या प्रकरणातील आरोपींना जेल कस्टडी व्हायची. जामीन मंजूर नाही झाला कि बराच काळ लॉकअपमध्ये खितपत पडलेल्या आरोपीला त्याच्या वकिलाच्या शिफारशीवरून जेलमध्ये पाठवलं जायचं.

जागेअभावी काहींना जेलमध्ये पाठवत, तर काही पोचलेले आरोपी वकीला मार्फत जेल कस्टडीची मागणी करत. त्याला कारणही होतं. जेलमध्ये त्यांचा मार वाचत असे. नाहीतर बाहेर ह्यांच्या कंपनीतल्या मुलांनी काही प्रकरण केले तर ह्यांना लगेच चौकशीच्या नावाखाली फटके पडत.

जेलमध्ये कंपनीचे खूप मेंबर भेटायचे. खाण्यापिण्याची चंगळ असायची. व्हॉलीबॉलसारखे खेळ खेळत तिथे हे लोक.

जेलमध्ये बलात्कार, फ्रॉडमध्ये अटक झालेल्या एखाद्या धनाढ्य आरोपीला मारहाण करून त्याच्या सुरक्षेच्या नावाखाली हे लोक त्याच्या कुटुंबीयांकडून हफ्ता वसूल करत. मोठमोठी तोडपानी, मोठमोठे प्लान होत असत जेलमध्ये. बाहेर असताना पोलिसांपासून स्वत:चा बचाव करताना धावपळ करून अंगाची काडी अन् झोप नसल्यामुळे डोळ्यांच्या खाचा झालेले भाई जेलमधली बाजरीची रोटी आणि अख्खी मसूरची ची घट्ट डाळ खाऊन गब्दुल होत. जेलमध्ये शांत झोप मिळत असे त्यांना.

बेसिकली लॉकअप ह्यांच्यासाठी सुरक्षित नव्हतं. एन्काउंटरला कधीही बाहेर काढलं जाईल ह्याची तर ज्याम भीती असायची.

जेल म्हणजे स्वर्गच जणू.

आपल्या कंपनीचा स्वतंत्र मोठा हॉल. स्वच्छ संडास, बाथरूम, केस, दाढी करायला सरकारी न्हावी, सकस जेवण, संध्याकाळी खेळ वगैरे वगैरे. महत्वाचं म्हणजे तिथे आपल्या कंपनीच्या हाय कमांडशी थेट भेट होई.

दळणवळणाच्या चोरून, लपून पुरवल्या जाणाऱ्या सर्व सोयी सकट शासकीय सुरक्षा कवचात ऑपरेट करणाऱ्या अंडरवर्ल्ड दुनियेचं जेल हे केंद्रीय कार्यालय.

बरेचसे गॉडफादर आणि भाई सुटून बाहेर जाण्यापेक्षा आतच राहणे पसंत करीत ते काय सुखसोयी असल्याशिवाय? सब मिलता है यहां... पैसा फेक, तमाशा देख. 

जेलमध्ये रेप, चीटिंग, अॅक्सिडेन्ट, खून इत्यादी केसेसमध्ये आणल्या गेलेल्या करोडपती आरोपीला हेरून त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निगा राखण्याची फीस त्या आरोपीच्या फॅमिलीकडून वसुल केली जायची. अन्यथा तुपात आणि एसीत लोळलेल्या त्या आरोपीची अवस्था बिकट करायचे हे लोक.

आत बसल्या बसल्या लाखों रुपयांचा हफ्ता चालू असायचा बॉस असले श्रीमंत आरोपी चार-पाच तरी असायचे. काय गरज आहे बाहेर जायची?

तर लॉकअपमध्ये आरती वगैरे नसायची, गाणीच गायचे हे लोक, पण दर गुरुवारी साई स्तवन झालंच पाहिजे हा प्रत्येक लॉकअपमध्ये कंपनीचा शिरस्ता होता. एक गेला की त्याचा वसा दुसरा चालवायचा.

चिनूने साईबाबाच्या तसबिरीला हात जोडले. तिघांनी पण ‘फेफ्टीला वाचवा’ म्हणून प्रार्थना केली.

मिठाईचा बॉक्स उघडला गेला. प्रत्येकाच्या हातात दोन-दोन पेढे आले. पेढे कॉस्टली होते. तोंडात विरघळल्याबरोबर त्याच्या अंदाज आला ह्या तिघांना.

आरती संपलेली. सिगारेट पोकळ करून त्यातून काढलेल्या तंबाखूत मळलेले अंटे मातीच्या चिलीमित पुन्हा पुरले गेले.

चिलीमिला खालून साफी गुंडाळली गेली. आरतीच्या वेळेस कडक इस्त्रीच्या और कपड्यातले सगळे विद्यार्थी आपापले कपडे काढून 'डबल' लोकांना देत त्याची व्यवस्थित घडी करायला सांगून अंडरवेयर, चड्डीवर नंगे फकीर होऊन वर्तुळात बसले.

त्यातल्या जाणत्या एकाने तो यज्ञ पेटवला आणि त्या चिलीमिच्या डीप कश सोबत प्रत्येक फकीर आपल्या भावविश्वात रमून गेला. चिलीम फिरत होती, त्यातला निखारा लख्ख फुललेला. 'लगे दम मिटे गम'च्या आरोळीत बराक दुमदुमली.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आगळ्याच समाधानाच्या रेषा उमटलेल्या प्रत्येकाची चर्या खुलून तेजस्वी झालेली. 

हॉटेलातून चहाचा थर्मास आलेला. थर्माकोलच्या ग्लासातून 'डबल' ने चहाचे राउंड केले.

बाहेर रपारप वार करणारे, समोरच्या व्यक्तीवर गोळ्यांची बौछयार करणारे सारेजण ऋषी, मुनी, तपस्वी वाटत होते.

कुणाच्यात आक्रस्ताळेपणा नव्हता.

आतून वावटळ असेल. प्रत्येकात एक समुद्र होता पण लाटा अजिबात नव्हत्या. शांत - शीतल सागरासारखे होते सारे.

किनाऱ्यावर तरी अगम्य शांतता होती.

आपल्याच मस्तीत मंद हसणारे हे वेडे पीर काय म्हणून ह्या चिखलात रुतलेले? मजबुरीच असावी. गिरण्या बंद झालेल्या बेकारी, वगैरे वगैरे काहीतरी कारण असावं. यांनी किती पाकिटं मारली असतील किंवा ह्याना अजून किती जणांना ढगात धाडायचं असेल ह्याचं ह्यांनाच माहीत. कुणालाच कसला थांगपत्ता लागून देत नव्हते हे भाई. एकमेकांच्यात 'ब्र' पण उच्चारत नव्हते. घडलेल्या घटनेच्या नंबरकाऱ्याला पण लगेच विसरायचे हे लोक.

चिनू, अरुण, चंग्या हे जग बघून वेडे झाले. ज्यांची नावं ते पेपरात वाचायचे, ते त्यांच्या पुढ्यात साक्षात बसलेत.

बाहेरील जगातले स्टार. नाव विचारायची बंदी होती. 'आयेला है तो खा- पिके जा, ज्यादा डीप मे नै जानेका' हा इथला रूल.. नियम, कारण होतं, पोलीस डमी आरोपी पाठवायचे ह्यांच्याकडून खबर काढण्यासाठी. तेव्हा भरोशाच्या माणसासोबतच बोलत हे लोक.

'बचकुंडा बनके रहनेका क्या है, कौन है, किसको मारा पुछनेका नै... खाने का और जामीन मिली तो कल्टी मारने का... साला हमको मालूम हमारी हालत... इधर बडे बडे पाकीटमार मुंडी नीचे करके हात पिच्छू बांधके कोपचेमे खडे रहते है... पाकीटमार मतलब मालूम क्या... चार-पाच गेम कियेला बंदा...' संदीप अण्णाने हसत अश्रूला लगाम दिला.

तिथपासून ह्या तिघांनी हा कोण, वो कौन, इसका नाम क्या, उसका नाम क्या... हे सगळं विचारायचा कधीच प्रयत्न नाही केला. 

रात्री जेवण आलं.

वेज जेवणाचा पण आगळा मेन्यू. एकदम चविष्ट जेवण. आंटा मारलेल्या फकिरांना आता सडकून भूक लागलेली. चलो बावा लोक ‘बिसमिल्ला' करते है म्हणत जेवणाची पंगत बसली. भक्तीरसात बुडालेल्या संन्याशांसोबत आज जेवण्याची मजा वेगळीच होती.

दहा वाजता बराकीतल्या व्हरांड्यातील लाईट्स घालवल्या गेल्या. बराकीत चाळीसचे बल्ब जळत होते. अकरा वाजता निजानीज झाली. दमट वातावरणाची आता शरीराला सवय झालेली. त्याने घाम गाळणे सोडून दिलेलं. कुणी ढराढरा घोरतंय तर कुणी हात मानेखाली घेऊन छताकडे पहात पडलंय.

हे तिघे झोपेच्या प्रतीक्षेत अन् फेफ्टीच्या विचारात दिवसभरात विस्मृतीत गेलेला फेफ्टी आता ह्या तिघांना आठवायला लागलेला.

आठवता आठवता कधी डोळे मिटले गेले कळलेच नाही.

पहाटेचे तीन वाजले असावेत. ह्यांच्या बराकीचं दार कराकरा वाजत खुलतं झालं. 

चिनूसकट आऱ्या, चंग्याचं नाव पुकारलं गेलं. जयु भायने त्यांना हलवून जागं केलं. तिघं खडबडून जागे झाले. काही कळायच्या आत तिघांच्या हातात बेड्या पडल्या. एक ड्रेसमधला कॉन्स्टेबल, चार रावडे, लाल, तारवटलेल्या डोळ्यांचे, तोंडाला दारूची घाण मारणारे डिटेक्शनवाले ह्या तिघांना ढकलत बाहेर काढत होते.

‘जाधव साब क्या यार... बच्चे है.. आपस के झंझट में अंदर आयेले है.... इनको भी ले रेले हो... छोड दो ना मैं ग्यारंटी देता हुं इन लोगो की.' संदीप अण्णा डीटेक्शन स्टाफला अडवत म्हणाला.

‘अण्णा.. तू जानता है अपने हात में कुछ नही रे. साब ने बोला लेके आनेको. थोडी मैमाननवाजी करेंगे. तुम तेल-पानी गरम करके रखना. क्या?’ म्हणत डीटेक्शन स्टाफने तिघांना बाहेर काढले.

'तुम डरो मत रे. कुछ नै होगा. थोडा शेक मिलेगा... ध्यान रहे कितना भी फटका पडे, खोटी केस आंग पे मत लेना' संदीप अण्णाने ओरडून तिघांना सांगितले.

खाली लॉकअपच्या बाहेर तीन खोल्यांचं डीटेक्शन रूम. तिघांची झडती घेण्यात आली. आतून फटक्यांचे आणि किंचाळ्यांचे भयावह आवाज ऐकू येत होते. तिघांची ज्याम फाटली. काही वेळाने एक जण बोच्याने फरपटत बाहेर येताना दिसला.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश. पुढे.... प्रकरण २९

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या