💢 शेलगाव देशमुख ग्रामपंचायत ची तहकूब ग्रामसभा 27 तारखेला होणार
🔰नागरिकांच्या निवेदनाची दखल; तहकूब निर्णयावर पंचायत समितीची कारवाई
वृत्त एकसत्ता न्यूज
मेहकर प्रतिनिधी दिनांक 25/ 8/ 2026 : बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख ग्रामपंचायतीची तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा आणि त्यानंतर नागरिकांनी दिलेल्या निवेदनामुळे आता पंचायत समिती मेहकर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ग्रामसभेबाबत प्राप्त निवेदनावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार, नियमानुसार कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पंचायत समिती प्रशासनाने ग्रामपंचायतला दिले आहेत.
शेलगाव देशमुख येथे 20 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र सदर ग्रामसभा तहकूब करून पुढील तारखेला घेण्यात येणार असल्याची घोषणा सभास्थळी करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत महेंद्र सदार व इतर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे निवेदन सादर करून ग्रामसभेबाबत आक्षेप नोंदविला.
या निवेदनाची दखल घेत पंचायत समिती मेहकरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र पाठवले आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार ग्रामसभेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवेदनकर्त्यांनी ग्रामसभेची तारीख बदलण्याबाबत आक्षेप घेतल्याचे पत्रातून स्पष्ट होत आहे. त्यानंतर संबंधित नागरिक व निवेदनकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांची बाजू जाणून घेण्यात आली. तसेच तालुकास्तरावर झालेल्या चर्चेनुसार पुढील कारवाईबाबत पंचायत समिती प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे. पंचायत समिती प्रशासनाने नियोजित ग्रामसभा रद्द करण्याबाबत झालेल्या कार्यवाहीचा तसेच ग्रामसभेबाबत करण्यात आलेल्या पुढील कार्यवाहीचा अहवाल कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान या पत्राची प्रत जिल्हा परिषद बुलढाणा येथील संबंधित अधिकाऱ्यांसह पाणीपुरवठा विभाग आणि स्वच्छ भारत मिशन कक्षाला ही देण्यात आली आहे. त्यामुळे शेलगाव देशमुख ग्रामसभेचा हा वाद आता केवळ ग्रामपंचायत पातळीवर न राहता पंचायत समिती प्रशासनाच्या पातळीवर पोहोचलेला आहे.
ग्रामसभा ही गावकऱ्यांच्या लोकशाही सहभागाचे महत्त्वाचे व्यासपीठ असताना तिच्या आयोजन तहकूबी किंवा तारखेबाबत नियमांचे पालन झाले का? याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीच्या निर्देशानंतर ग्रामपंचायत प्रशासन नेमकी कोणती कार्यवाही करते आणि त्याचा अहवाल काय येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


0 टिप्पण्या