कामाठीपुरा प्रकरण 2️⃣7️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
*एक बुझती हुई शमा के परवाने*
*आखरी आरजू क्या है मस्ताने' ला शाजीयाने आपला मोर्चा चंग्याकडे वळवला. हातातल्या चाकूने तिने त्याची हनुवटी वर उचलली अन् रापकन चाकू त्याच्यावर उगारला. तिच्या डोळ्यात लालभडक निखारे साचलेले.*
मी... मी म्हणणारे सगळे तिच्या पुढ्यात लोळण घेत. उद्योजक, पुढारी, कॉर्पोरेट डीलर यासारख्या पर्सनल इवेन्टला पर्सनल सर्विस देणारी शाजीया... गडगंज श्रीमंत शाजीया... एका साध्या ढोलक वाजवणाऱ्या पोराच्या वागणुकीने दुखावलेय. ती आरामात त्याचे हातपाय कापून त्याला भिकेला लावू शकते... पण नाही जमत आहे तिला.
अन् चंग्या... तो असल्या हजार शाजीयांना त्याच्या कलेच्या पुढे फाट्यावर मारतो.
अशी ही जुगलबंदी!
तर
चंग्या वाजवता वाजवता कुत्सित हसला.
हजारो दिलों की धडकन, सौंदर्याची खाण, लाखो रुपयांची मालकीण असलेल्या शाजीयाच्या डोळ्यात चंग्याला त्याच्या अपमानाची वसुली दिसत होती.
अशाच तापलेल्या वातावरणात आणखीन दोन धमाकेदार गाणी होऊन शाजीयाचा परफॉर्मस संपला.
विजय भाऊने चंग्याच्या कानात सांगितलं 'शाजीयाने तुला बोलावलंय... जा तू. ढोलक मी सांभाळतो'
चंग्या निघाला. त्याला पण हे प्रकरण संपवायचं होतं...
बारच्या मागे आतल्या खोलीत शाजीया बसलेय.
चंग्या पोहोचला.
चंग्या आलेला पाहून एैरेगैरे जे तिथे हजर होते त्यांना कल्टी मारण्याचा शाजीयाने इशारा केला.
आता त्या वातानुकूलीत खोलीत फक्त दोघेच होते. चंग्या आणि शाजीया.
चंग्याने एन्ट्री घेतली त्या रूममध्ये. त्याने पाहिलं शाजीयाच्या हातात सिगरेट अन् पुढ्यात अर्धवट भरलेला दारूचा ग्लास.
‘आईये... आईये... हुजूर...' शाजीया चंग्याला बघताच खुश होत म्हणाली.
शाजीया मस्त खुर्चीवर बसलेय, दोन पेग डाऊन झालेत अन समोर उभा असलेल्या चंग्याला खुर्चीवर बस म्हणण्याची पण तिची फितरत नाही, इतकी ती घुश्श्यात आहे.
'बोलो' चंग्या तिच्या पुढ्यात उभा.
शाजीयाने सिगारेटचा दमदार कश घेतला अन् म्हणाली 'हुजूर क्या गलती हुई जो आप हमसे नाराज हो?'
शाजीया ओढत असलेली सिगारेट अन् तिच्या पुढ्यात अर्धवट पडलेला दारूचा ग्लास आणि बाटली बघून चंग्या थोडासा हैराण झाला. कारण आतापर्यंत त्याने शाजीयाचं हे रूप पाहिलं नव्हतं. ती सिगारेट प्यायची, दारू प्यायची पण तिच्या घरी गेल्यावर. हे सगळं चंग्याला माहीत होतं; पण आज ती चंग्याच्या फ्रस्ट्रेशन मध्ये बारच्या खोलीतच बसलेली.
‘गलती आपसे नही, गलती हमसे हुई... हम मस्तमौला है.. किसी जंजीर मे नही अटकते... आपकी हमारी नही जमेगी' चंग्या बोलला अन शाजीया पेटली.
'बर्बाद करूंगी मै तुमको... कोई बार कोई जगह तुम्हे नहीं बुलायेगी बजाने के लिये. भुको मरोगे तुम...है क्या तुम्हारे पास जो इतना इतरा रहे हो?’ शाजीयाने चंग्याकडे बघत पुढ्यातला ग्लास ओठाला लावला अन् म्हणाली.
‘साला यही देखना चाहता हुं मैं के कैसे भुखे मरते है... मेरी मां, मेरा बाप, मेरी बहन, मेरी नानी, मेरे दोस्त सब बिना खाये - पिये मेरे आनेका इंतजार करते है, मैं रात रात अगर घर पर नहीं पहुंचता हुं तो मेरी मां भुखी सोती है.... इन्ही पर इतराता हु मैं... और यही है मेरे पास. इन्ही पे इतराता हुं मैं, इतराना किसे कहते है साहिबा जरा बताव तो सही. आप किस पर इतराती हो. जरूरत नहीं है मुझे तुम्हारे पैसों की, अहसानों की मेरे हाथ में हुन्नर है और सर पर गुरू का आशिर्वाद रोटी तो मैं कैसे भी कमा लूंगा चाहे आधी ही क्यों ना हो. लेकिन ये जिल्लत भरी जिंदगी नहीं जी पाऊंगा मैं.' चंग्या शांतपणे मान उंचावुन तिच्या डोळ्यात डोळे घालुन बोलत होता.
शाजीया वरुन शांत.. निःशब्द ... पण हवालदिल ... तिच्या आत ज्वालामुखी खदखदत होता.
‘चलो... हमारे साथ चलो हुजूर मालामाल हो जाओगे.’ शाजीया थंड रागीट आवाजात म्हणाली.
‘चंग्या ने गुलामी की जंजीर तोड दी है ... अब वो बजायेगा तो सिर्फ खुद्के लिये' शब्द टाकून वळला चंग्या. त्याने दार उघडून एक्झिट घेतली मागून येणाऱ्या ग्लास आणि बाटलीच्या तुटलेल्या आवाजाला न जुमानता.
ता धिन ता... ता धिन ता... धिन धिन धिन ता...
बाबा हाजी मलंगच्या मजारीवर चादर चढली. धूप, लोभान आणि गुलाबाच्या फुलांच्या सुवासात दर्गा दरवळला.
चंग्या, आऱ्या, मोहन, चिनू दर्ग्यावर दुपारीच पोहोचलेले.
उस्ताद हुसेन मिया खाँसाहेबांच्या कव्वाल पार्टीचा पहिली कव्वाली पेश करण्याचा मान होता आज.
पहिला मान असलेल्या पार्टीला किमान दोन कव्वाल्या पेश करण्याची मुभा असते. आणि ही संधी वर्षानंतर आलेली. हाजी मलंग बाबाच्या चरणी आपली कला सादर करण्याची सुवर्ण संधी खाँ साहेबांचे शिष्य सोडणार नव्हते. पेश करण्याच्या सुरुवातीच्या कव्वालीत ढोलकला चंग्याची वर्णी लागलेली. हा त्याचा सन्मान होता. नंतर तो कोरसला बसणार होता.
डोक्याला रुमाल बांधून, ढोलकच्या वाती चढवून चंग्याने पार्टीत कव्वालच्या बाजूला बैठक घेतली.
'या अली बाबा हाजी
या अली, मौला सरकार
करम इनायत हो बंदोपर...
शेर पेश करून.. कव्वाल जेव्हा
'मौला.. मेरे मौला.. हाजी मेरे मौला' वर आला तेव्हा चंग्याचा ढोलक तडाडला.
कव्वाली रंगात आलेली. बारमध्ये वाजवताना नेहमी डाव्या बाजूला मान वळवणारा चंग्या आज ढोलकवर मांड रोवून, छाती पुढे काढून मजारकडे बघत हाजी मलंग बाबाशी रूबरू होऊन वाजवत होता.
त्याच्या डोळ्यातनं अश्रू इतके वाहत होते की हा बुडेल त्यात.
कर्रर्र... कच कच... कच दरवाजाच्या आवाजाने चंग्या भानावर आला. त्याने पाहिलं चिनू आणि आऱ्या झोपलेत.
सकाळ झालेली...
लॉकअपच्या गंजलेल्या दरवाजाने आवाज केला. तिघांच्या नावाचा पुकारा झाला तसे हे लोक भानावर आले.
तिघांना बेड्या घातल्या गेल्या. त्यांची झडती झाली. प्रॉपर्टी काय होती का ह्याची रजिस्ट्रेशन बुकात शहनिशा झाली. 'काढा बाहेर' त्यातला एक हवालदार म्हणाला.
तिघे बाहेर आले शिडीपाशी अन् थांबले. बाहेरच्या चकचकीत सूर्यप्रकाशाने तिघांचे डोळे दिपले.
डावीकडे चिनूची नजर वळली. आई... आई त्याच्याकडे निर्विकार नजरेने बघत होती.
तिघांच्याही घरातली माणसं हजर होती. ह्या तिघांच्या माना खाली झुकल्या. तीन दिवस सूर्य न पाहिलेल्या ह्या लेकरांच्या डोळ्यातून अश्रू कोसळू लागले.
आईच्या वात्सल्याला, बहिणीच्या करुणेला, काका, मामा, बाबा ह्यांच्या तिटकारलेल्या नजरेला नजर देण्याची ह्यांची हिम्मत होईना.
काळ्या मोहन कोपऱ्यातून इशारा करुन सांगतोय की सगळं ठीक होईल पण हेच कळत नव्हतं की फेफ्टी मेलाय की जिवंत आहे. लगबगीनं तिघांना वरच्या मजल्यावर नेण्यात आलं.
वरच्या मजल्याच्या बराकीत ते पोहोचले तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या बेड्या सुटल्या.
जयू अण्णा त्यांच्या स्वागताला उभा होता.
सगळीकडे लख्ख स्वच्छता. रांगड्या मुलांनी गजबजलेली बराक.
बहुतेक जण अंडरवेअरवर, काही जण हाफ पँटीत.
आतल्या भिंतींना रंग दिलेला. पाण्याच्या बाटल्या रांगेत मांडलेल्या चादरींची व्यवस्थित घडी करून ठेवलेली.
कोपऱ्यात पत्त्यांचा डाव रंगलाय, कुणी रेडिओ ऐकतंय, कुणी कानात एअरफोन घुसवून हातात कॅसेट प्लेअर धरून नाचतोय. कोपऱ्यात कॅसेट एकावर एक व्यवस्थित रचून ठेवल्यात, एका कोपऱ्यात कुणी पेपर तर कुणी पुस्तक वाचण्यात दंग.
भिंतीवर साईबाबाची भलीमोठी तसवीर लटकलीय. तिला चंदनाचा आणि ताज्या फुलांचा हार चढवलाय. अगरबत्तीचा दरवळणारा सुगंध मन प्रसन्न करतोय. एक दोघे सिगारेटचे झुरके घेताहेत... सिगारेटचे हा! विडीचे नव्हे.
केवढी टापटीप, केवढी स्वच्छता. तिघेही बघत राहिले. किती जमीनआसमानाचा फरक होता तळमजला आणि पहिल्या मजल्यात!
आतले सगळे जण तिघांकडे बघत होते.
दोघं-चौघे उठून उभे राहिले. त्यांच्यात आक्रमकता नव्हती. एवढीच समज होती की ह्या बराकीत येणारा आपलाच भाईबंद असणार, पण कुठल्या तरी वेगळ्या ब्रांचचा.
‘आव आव भायलोग.' स्वागत झालं ह्याचं.
'सब ठीकठाक है ना. नीचे पडी बिडी नै ना.' म्हणत जयू अण्णाने बराकीत एन्ट्री केलेल्या तिघांचे स्वागत केले अन् ग्रुपकडे वळत म्हणाला. 'सुनो भाय लोग इन लोगोंकी पैचान कर देता हुं. ये कामाठीपुरा के बंदे है तीनसो दो में आयेले है. आपस में मॅटर हुवा था. बंधू के लडके हैं. बंधूने बोला है इनका खयाल रखने को.'
चिनूच्या सगळं लक्षात आलं. कुंभारवाड्यातल्या बंधूने ह्यांची वासलात वरच्या मजल्यावर लावलेली. आता हे तिघं मुंबईतल्या एका नावाजलेल्या ग्रुपमध्ये जमा झालेले.
‘जाव जाके नहा लो... ए पक्या टॉवेल और अंडरवेअर दे गांडू ह्यांना.' तिघांची खरकटी अवस्था बघून जयू अण्णाने हुकूम दिला.
तिघेही अवाक्. स्वच्छ संडास, स्वच्छ बाथरूम. सगळं स्वच्छ.
खालच्या नि वरच्या बराकीची रचना सेम, पण इथे कमालीची स्वच्छता. वरचा पूर्ण मजला ह्यांचाच.
शेवटच्या बराकीतला संडास, बाथरूम उपयोगात आणायचे त्यामुळे पहिल्या दोन बराकी अगदी स्वच्छ. नवीन टॉवेल, नवीन अंडरवेअर, साबण, श्याम्पू, दाढी करायचं सामान सगळ्या सुविधा आणि सेवेला 'डबल' हजर.
'डबल' म्हणजे आगापिछा नसलेले आरोपी. ज्यांना जामीन झालाय पण अनामत रक्कम भरली गेली नाही म्हणून त्यांना लॉकअप मध्येच ठेवलंय. बहुदा शेजारच्या देशाचे असायचे.
ह्यांना आपापल्या वाटणीतल्या भाज्या, चपात्या जास्त दिल्या जायच्या त्या बदल्यात हे डबल साफ-सफाई, लादी कटका, मालिश इत्यादी गोष्टी करायचे. वेळप्रसंगी विकृतीकरणाची खाज भागवली जायची ह्यांच्याकडून.
आंघोळ झाल्याबरोबर तिघांसाठी समोरच्या हॉटेलमधून इडली सांबाराचा नाश्ता आला.
हात धुतल्याबरोबर जयू अण्णाने ट्रिपल फायचं पाकीट नि माचीस तिघांसमोर सरकवलं.
'सिगरेट नै पिते अण्णा हम' चिनू म्हणाला.
‘अरे नै पिता तो पियेगा भाय' समोरून आवाज आला आणि सगळे हसू लागले.
'ये ले भाय एकसोबीस मावा, कच्चा पक्का कत्री सुपारी लवंग इलायची.' म्हणत अण्णाने पुडी भिरकावली तसा चंग्या पुडीवर सुसाट झेपावला. स्वर्गप्राप्तीच झालेली त्याला.
'आराम से भाय, लेकीन थूकना बाथरूम मे जाके क्या... इधर गंदगी करना गुनाह है.. आपुन लोग रातको हिलाते भी है तो बाथरूम जाके. बाबा नाराज होते है और कम्प्लेन जाती है मामा के पास और मामा अपुनकी फाड देता है.'
संदीप अण्णा हसला. 'दुर्गा भाय मिला था क्या?... अरे हा... वो तो आधारवाडी में है, और किधर किधर ताबा हुवा, कि पैले इदरीच? सुनो आज गुरुवार है, आज वेज खानेका क्या? शामको साई की आरती होगी फिर अंटे का दम. अंटा समझता है ना! ये बंटी अंटा क्या होता है समझाना इनको.' म्हणत पुन्हा हसला.
‘चलो आराम करो तुम लोग, बाजुकी बराक मे जाके. ये डबल सेवा कर भाय लोगोकी' सगळं सगळं एखाद्या पुजाऱ्यासारखा सांगणारा हसरा, खेळकर, काळ्याशार अंगाचा, शुभ्र दातांचा जयू अण्णा दूर झाला.
जवळ जवळ सतरा-अठरा जण होते.
या गोष्टींची गरज सिगारेट, चरस, गांज्या, दारू, किमती अत्तर, साब लागल्यास त्या त्वरित हाजीर. आतून एक चिट्ठी गेली की सामान पोचायचं.
डॉक्टरकडे चेकअपला जायच्या निमित्ताने 'खालच्या वाडीचा' सहवास घडे. फक्त आत हत्यार बाळगत नसत. त्याचं पालन कटाक्षाने होत असे. स्टील आणि जस्त सारख्या धातूंच्या थाळ्याही ठेवत नसत हे लोक-कारण त्यांचा हत्यार म्हणून पण उपयोग झालेला. जे काही खायचं - प्यायचं असेल ते प्लास्टिक किंवा थर्माकोल नाहीतर कागदाच्या प्लेटीत.
दारू पण येई ती फुग्यातून. बहुधा व्होडकाच असायची, पण इथे दारूपेक्षा अंट्याचे आशिक जास्त होते.
रॉनी आला.
चिकणा, नाजूक अंगाचा रॉनी. तिघांना खेटून बसला. झोपलेल्या चंग्याला त्याने हलवले 'उठना बावा क्या सो रेला है? इधर आया तो सोना हि सोना है. खाने का, हगने का, सोने का ... हाहाहाहा' रॉनी म्हणाला. चंग्या उठून बसला.
'किसका पाकीट मारा बे?' रॉनी चंग्याला विचारतोय.
'हम लोग पाकीटमार नही है' चंग्याचं उत्तर.
'वो पता है बावा, तुम लोग बंधुके बंदे हो पर पाकीट किसका मारा?' रॉनी हसला.
'च्युत्या समजा क्या, हम लोग तेरेको पाकीटमार लगते है क्या?' चिनू रॉनीवर घसरला.
पत्ते खेळणाऱ्या संदीप अण्णाचं लक्ष गेलं, 'अबे बिल्ली.. पाकीटमार नही रे वो.. अच्छे घर के लडके है. आपस का म्याटर है. तंग मत कर उनको. चले जायेंगे कल घर. मैमाननवाजी कर गांडू उनकी' अण्णा पुन्हा खेळण्यात गुंग झाला.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश. पुढे.... प्रकरण २८

0 टिप्पण्या