कामाठीपुरा प्रकरण 2️⃣6️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 10/8/2026 :
*एके दिवशी. सुंदर सायंकाळी...*
*शाजीयाचा पहिल्या बारमधला डान्स संपला. तिने बुरखा चढवला. ती* *धावल्याबरोबर लगबगीने सारे नेहमीप्रमाणे तिच्या मागून धावते झाले. फक्त एक माणूस होता त्या जागीच ठाम बसून राहिला. चंग्या... होय चंग्या, जागचा हलला नाही तो. तो छल्ले तपासत ढोलकच्या वाती चढवत, त्याच्या चामड्यावर बोटाने मारत, ढोलक नीट चढलं की नाही ते चेक करत होता.*
सगळे जण त्याच्याकडे 'आ' वासून बघू लागले. तो गेल्यावर ढोलक वाजवण्याचे काम करणारा, कोंगो वादक विजय दादा आश्चर्यचकित झाला. चंग्याने त्याला डोळा मारून 'मी इथेच राहणार, आता कुठेच जाणार नाही' असे हाताने खुणावले. विजयदादा खुश झाला, त्याबरोबर सिन्थेसायझरवर बसलेला श्याम भाई पण आनंदला.
गिटार वाजवणाऱ्या बद्रेशने दिलेल्या काऊन्टवर नव्या गाण्याने पुन्हा स्टार्ट घेतला.
आता मात्र चंग्याची बोटं ढोलकवर तुफान बरसत होती. अगदी पहिल्यापेक्षा कितीतरी सरस. चंग्या त्याच्या आजादीचा जश्न साजरा करत होता.
गल्ल्यावरचा फोन खणाणला. शशी अण्णाने तो उचलला. तिकडून चंग्याची चौकशी झाली. शाजीयाने त्याला त्वरित बांद्रयाला बोलावण्याचा हुकुमवजा निरोप चंग्याला देण्यात आला.
शशी अण्णाने तो निरोप वेटरमार्फत चंग्याच्या कानाशी पोहोचवला.
'अभी फोन आया तो बोलना चंग्याने गुलामी की जंजीर तोड दी है अब वो बजायेगा तो सिर्फ खुदके लिये' चंग्याने फुल फिल्मी डायलॉग पेश केला.
गाणं चालू असताना पुन्हा फोन आला. आता मात्र फोनवर शाजीया होती.
'वो है इधरी पर फोन पे नै आता जी एक मिनिट' शशी अण्णाने वेटरला चंग्या मघाशी काय बोलला ते विचारले. 'हा वो बोलता हम गुलामी की जंजीर तोडा.. अब कुदके वास्ते बजायेंगा' त्याने तुटक्या हिंदीत शाजीयाला सांगितलं.
तिथून फोन ठेवण्याचा आवाज आला.
बार बंद झाला.
पॅकअप करताना शशी अण्णा चंग्याच्या जवळ आला. 'क्या चंग्या किंव नै गया उसके सात बजानेको' त्याने चंग्याला विचारलं.
‘नै जानेका अन्ना अपुनको... आपुन बोला ना चंग्याने गुलामी की जंजीर तोड दी है... अब वो बजायेगा तो सिर्फ खुदके लिये' चंग्या अण्णाच्या समोर हसत म्हणाला.
'अरे तेरी... अगर तेरी वजासे उसने बार में आना मना किया तो?' अण्णाने शंका व्यक्त केली.
'तो तुम देख लो अन्ना... बोलो तो मैं कलसे आपके बार की नौकरी छोड दुं’ हसत त्याने अण्णाला प्रश्न केला आणि बॅग खांद्याला लाऊन निघू लागला. तेवढ्यात अण्णाने त्याला थांबविले. म्हणाला 'तू किदर नै जायगा. वो हि आयेगी इधर... देक लेना तू.. अन्नाका जबान है.'
दोघेही हसले.
टॅक्सीचे बिल चुकते करून चंग्या गल्लीच्या दिशेने धावत निघाला. त्याने वखार गाठली. बघतो तर वखारीत कुणी नाही. तो चाळीत शिरला. बाकड्यावर झोपलेल्या अरुणला त्याने उठवलं. अरुण दचकला.
'काय रे किती वाजले.. तू गेला नाय वाजवायला?' अरुणने विचारले.
'नाय गेलो यार.... सगळं सांगतो चिनू कुठाय...' त्याने बाकड्यावर मांडी ठोकून बॅगेतला खंबा, पाण्याची बाटली आणि सल्लीबोटीची पुडी काढली. ‘थांब चिनूला बोलावतो’ म्हणत तो पुन्हा उठला आणि चिनूच्या घराच्या दिशेने गेला. झोपलेल्या चिन्याला त्याने उठवून हाताने खेचत अरुणच्या बाकड्यावर आणलं. ही सगळी खुसपूस ऐकून काळ्या मोहन पण उठला.
आता हे चौघं जमा झाले. चंग्याने बाटलीतले अर्धे पाणी ओतून दारूच्या बाटलीतला माल पाण्याच्या बाटलीत मिसळवला आणि मस्त घोट घेतला. ओठांवरून हात फिरवत थोडा पॉज घेत आज घडलेला किस्सा त्याने आपल्या खास दोस्तांना सांगितला. दोस्त लोक खुश झाले. आता त्यांचा चंग्या त्यांना रोज भेटणार होता.
'अरे पण पुढे काय होणार? परवा शाजीयाचा वार आहे ना यार तुझ्या बारवर.' तेव्हा चिन्याने शंका मांडली.
'परवाचं परवा बघू यार... तू कशाला टेन्शन घेतोस? और सून, चंग्याने गुलामी की जंजीर तोड दी है... अब वो बजायेगा तो सिर्फ खुद्के लिये’ त्याचा तो डायलॉग चिन्यावर फेकून बाटली ओठांना लावत चंग्या बेफिकिरीने म्हणाला.
एकमेकांना टाळी देत सगळे दिलखुलास हसले.
'बरं ऐका... हाजी मलंगचा उरूस आहे दोन दिवसांनी आपल्याला तिकडे जायचंय माहित आहे ना?' चंग्याने मित्रांना आठवण करून दिली.
दरवर्षी होणारा हाजी मलंगचा उरूस चंग्या कधीच चुकवीत नसे. त्याच्या गुरूची म्हणजे त्याला ढोलक शिकवणाऱ्या उस्ताद हुसेन मिया खाँसाहेबांची आपल्या प्रत्येक शिष्याला तशी ताकीद होती की तरबेज झाल्यावर प्रत्येकाने एकदा तरी उरुसाच्या दिवशी बाबा हाजी मलंगच्या दर्ग्यावर जाऊन आपली अदाकारी बाबाला नजर करायची.
खाँसाहेबांचे शिष्य तिथे जाऊन त्यांच्या कव्वाल पार्टीत सामील होऊन आपले योगदान द्यायचे. अगदी कोरसला बसून, हार्मोनियम वाजवून नाहीतर ढोलकची साथ करून प्रत्येक जण कव्वालीत आपली उपस्थिती नोंदवायचा. हाजीमलंग बाबा विषयी त्या प्रत्येक कलाकारांच्या मनात श्रद्धा होतीच पण ही एक प्रकारे आता हयात नसलेल्या खाँसाहेबांना त्यांची श्रद्धांजली ही होती.
उरुसाच्या दिवशी दर्ग्यावर अनेक कव्वाल उपस्थित असत. प्रत्येक कव्वाल पार्टीला दोन कव्वाल्या गायची परवानगी होती. बाबाच्या मजारीवर चादर पडली की प्रत्येक कव्वाल समोर बसून आपली कव्वाली पेश करायचा. मजार समोर कव्वाली सादर करणं हे प्रत्येक कव्वालाचं स्वप्न होतं. नव्हे ते आपलं भाग्यच समजत.
चंग्या ह्या बाबतीत लकी होता. त्याच्या कव्वाल पार्टीचा मान दरवर्षी असायचा. आणि खाँसाहेबांच्या मताप्रमाणे तरबेज झालेल्या चंग्याने खाँसाहेब जिवंत असताना त्यांच्या समक्ष दर्ग्यावर ढोलकवर बसून कव्वालीला सोबत केलेली. तेव्हा त्याच्या वाजवण्याने खुश झालेल्या खाँसाहेबांच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू बघून तो हेलावलेला. नंतर खाँसाहेबांनी त्याला आशीर्वाद देत त्याला आपल्या कलेशी प्रामाणिक राहण्याची सक्त ताकीदही दिलेली.
खाँसाहेबांचं नाव कधी तो घेत नसे, पण चुकून नाव घेतले तर तो पटकन आपल्या उजव्या कानाची पाळी चिमटीत धरे. जाणकार समजून जायचे पण ह्या पोरांना वाटायचं की त्याच्या कानाला खाज सुटलेय.
तर हाजी मलंगला जायचं शंभर टक्के ठरलं. भले दुनिया इधर की उधर हो.
चंग्याने कधी कामाची फिकीर केली नव्हती. त्याच्या गुरूने शिकवलेल्या कलेत तो बाकबगार होता. तालाची एकही मात्रा इकडची तिकडे होत नसे. क्वालिटी होती त्याच्या वाजवण्यात. कामं त्याच्याकडे धावून येत.
तर ... तिसऱ्या दिवशी बारमधला माहोल रंगलेला. सुरुवातीला चार गाणी झाली. नेहमीची डान्सर डान्स करून गेली. इतक्यात शाजीया मॅडम आल्याची वर्दी ऑर्केस्ट्रा कंपनीला मिळाली.
कुठलं गाणं घ्यायचं ते शाजीया आधीच निरोप धाडायची, त्याप्रमाणे सगळे तयार होते. मागच्या वातानुकूलीत खोलीत बसून कोल्ड्रिंक संपवून फ्रेश होऊन ती गाण्याला सुरुवात करण्याची ऑर्डर देई अन् म्युझिक सुरू झालं की शाजीया अप्रतिम अशा नाटकी ढंगात लाजवाब एन्ट्री घेई.
ह्यावेळी दणक्यात म्युझिक सुरू झालं.
गाणं होतं 'छोटीसी उमरमे ये लग गया रोग, कहते है लोग मैं मर जाऊंगी' बैराग सिनेमातलं हे गाजलेलं अप्रतिम गाणं सुरु होताच शाजीयाने ढोपरापर्यंतच्या घागरा-चोळीवर दणक्यात एन्ट्री घेतली.
चंग्याचं तर सांगायला नको. तो त्याच्या कलेशी प्रामाणिक होता. नाचणारी किंवा गाणारी कोणीही असो, तो त्याचं काम जीव ओतून चोख करायचा.
'बैराग' चित्रपटातलं हे गाणं चंग्याच्या प्रचंड आवडीचं. कारण ह्या संपूर्ण गाण्यात ढोलकला पूर्ण स्कोप होता. त्यामुळे गाणं सुरू होताच तो ढोलक नीट सेट करून नेहमीप्रमाणे वाजवताना खाली घातलेली मान डाव्या बाजूला वळवून गाण्याशी एकरूप झाला. त्याचे त्रिताल, केरवा दणक्यात घुमू लागले. ढोलकच्या दोन्ही बाजूना माईक असल्यामुळे त्याच्या प्रत्येक ठेक्याची लज्जत जाणवत होती.
चंग्याच्या वागण्याने अपमानीत झालेली शाजीया नाचताना त्याच्याकडे ढुंकून पाहीना, पण तालासूराचं थोडंसं ज्ञान असलेली शाजीया त्याने घेतलेल्या काही जागांवर बेइन्तहा खुश होऊन त्याच्यावर चोरटा कटाक्ष टाकायची. डोळ्यांवर रेशमी केसांच्या लटा पांघरलेला, स्वरांच्या तालांच्या आराधनेत गुम झालेला, ध्यानमग्न चंग्या तिला एखाद्या विरक्त, बैरागी साधूसारखा भासला.
गाणं जोशात चाललंय. पैशांची उधळण होतेय. शाजीयावर नोटा तर बरसत आहेतच, पण अधनंमधनं नोटांनी गुंफलेली माळ चंग्याच्याही गळ्यात पडत होती.
'कब तलक रोकेगा मेरा
रस्ता लाज का पेहरा
याद ये रखना, तू सजना ये
मेरा वादा ठहरा...'
हे कडवं सुरु झालं आणि शाजीयाचा संयम तुटला. आता ती चंग्यासमोर नाचू लागलेली.
'बाबुल की गलीया छोडके
आऊन्गी चुनरिया ओढके...
लैके उमंग, सैया तेरे संग
तेरे घर जाऊंगी..
वो वो मै मर जाऊंगी '
ह्या ओळींवर तर तिने चंग्याच्या डाव्या बाजुला वळलेल्या हनुवटीला रागाने स्वत:कडे खेचून त्याच्या नजरेत नजर रोवून स्वतःची दखल घ्यायला भाग पाडलं.
वाजवण्यात गुंग असलेला चंग्या गडबडला. आता त्याला समोर दिसत होती रंगपोत ल्यालेली शाजीया.
शाजीयाला अगदी डोळ्यासमोर बघून तो बावरला. त्याने झटक्यात स्वतःला सावरलं अन वाजवणं सुरू ठेवलं.
'धिन ताक धिन धिन धिन ताक' ढोलकच्या शेवटच्या तिहाईच्या तालावर गाणं संपलं...
'वन्स मोर' च्या आरोळ्या उठल्या.. वेटर पडलेले रुपये गोळा करायला धावले.
'वन्स मोर नहीं होगा मालिक...' शाजीयाने माईक हातात घेतला. सरकार हर एक गानेका, हर एक पेशकश का अपना अलग रुतबा होता है, अलग टेस्ट होती है. दोबारा देखनेसे, सुननेसे उसका स्वाद खो बैठते है हम.. समझीये हुजूर' म्हणताच हुर्यो झाला अन् ..
'मार दिया जाय या छोड दिया जाय' हे 'मेरा गाव मेरा देश' चं भन्नाट गाणं सुरु झालं नेहमीप्रमाणे ह्या गाण्याने पण धमाल मचवली. ...
शाजीया हातात चाकू घेऊन, डोक्यावरची ओढणी दातात चावून, आपले कजरारे नैन रोखून ग्राहकांच्या टेबलापाशी जाऊन असला काही आविर्भाव करे की कलिजा खल्लास झालाच पाहिजे.
प्रत्येक ग्राहक स्वत:ला धर्मेंद्र आणि विनोद खन्ना समजू लागलेला.
नोटांच्या पावसाला पुन्हा सुरुवात झालेली. चंग्यासकट सगळे म्युझिशियन ह्या गाण्यात रममाण झालेले. प्रत्येक जण आपला बेस्ट परफॉर्मन्स देत होता. टीम वर्क होतं हे, एखादा जरी चुकला तर प्रेझेन्टेशनला गालबोट लागलं असतं. आणि शाजीयाला ह्या टीमवर भरवसा होता.
ढोलक हा शाजीयाचा वीक पॉइंट. ढोलकचा ठेका असलेली गाणी तिला प्रचंड आवडायची. त्यावर ती मनमुराद नाचायची देखील चंग्याच्या ढोलकच्या प्रेमात आकंठ बुडालेली शाजीया अन्य बारमध्ये जिथे ढोलकपटू कमी पडतोय तिथे त्याला सोबत घेऊन जाऊ तर लागलेली पण स्वतःच्या सौंदर्य आणि कलेचा माज असलेल्या शाजीयाने चंग्यासारख्या सेन्सिटिव्ह कलाकाराला ओळखलं नव्हतं, त्याची कदर केली नव्हती तिने.
तर 'मार दिया जाय या छोड़ दिया जाय' रंगात आलेल.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश.. पुढे... प्रकरण २७
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

0 टिप्पण्या