कामाठीपुरा प्रकरण 2️⃣5️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण  2️⃣5️⃣

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

*अरुण, चिनू पण हैराण.*

*शाजीयाला चंग्याशी* *काहीतरी बोलायचं होतं पण तिला नाही जमलं.* *चंग्यालाही नाही जमलं तिच्याशी काही बोलायला. दोघांचे डोळे मात्र बरेच काही बोलून गेले.*

'चला चला' म्हणत पोलिसांनी त्या तिघांना गाडीकडे वळवलं. तिघे गाडीत बसले. तेवढ्यात गणेश वेटर गाडीकडे आला 'भाई ये लो शाजीया दीदीने दिया है.' त्याने घडी घातलेल्या नोटा चंग्याच्या हातात सरकवल्या. चंग्याने त्या पुन्हा त्याच्याकडे सरकत्या केल्या, नको म्हणाला.

गाडी नागपाडा पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाली. वळणावर शान्त्या, लट्या वगैरे हात हलवताना दिसले.

शाजीया चंग्याला दिसेनासा होईपर्यंत पहात होती.

सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या बराकीत सोडून, पुन्हा एकदा आरोपींना मोजून हवालदार निघून गेले.

जेवण आलं. बराकीच्या दरवाजाशी सगळे रांगेत उभे राहिले. जर्मनच्या बारीक थाळीत दोन पातळ चपात्या आणि डाळीचे पिवळे पाणी वाढण्यात आले.

चवढव नसलेलं अन्न भुकेपोटी पोटात ढकललं गेलं.

तिघांनी कोपरा पकडला. एकमेकांना एकमेकांच्या आधाराने तिघंही खेटून बसले. चंग्या मात्र स्वतःच्यात हरवलेला.

'शाजीया कशी काय आली यार? ती पण डायरेक्ट कोर्टात मानलं पाहिजे यार' चिन्या म्हणाला... शाजीया येणं हेच ह्यांच्या आतापर्यंत झालेल्या घडामोडींवर मलम होतं.

'ज्याम जीव आहे तिचा चंग्यावर बघना समजल्याबरोबर आली' अरुण 

‘काय बोलतो चंग्या... गांडू जुळल्याचं सांगितलं नाहीस' चिनूनं चंग्याला कोपऱ्याने दुसवत डिवचलं.

'काय जुळलं बिळलं नाय आणि काय जीव बिव नाय ... चंग्याने मौन सोडलं.

'भेन्चोद...' दीर्घ श्वास घेत चंग्याने सुरुवात केली.

‘तिनं इथं यायचंच कशाला... खाली शोगिरी.... वरून पैसे देत होती... तुला सांगू ह्या असल्या गोष्टी माणसाला गांडू बनवतात... अरे झाली आमची गांडमस्ती, भोगू ना आम्ही जे वाट्याला येईल ते. आणि जोपर्यंत माणसाचे हात शाबूत आहेत ना तोपर्यंत तो उपाशी मरत नसतो. आपल्या तर हातात कला आहे यार और चंग्याने गुलामी की जंजीर कब की तोड दी है.' चंग्या काही तरी असंबंधित बोलत होता. इतकं होऊन पण ह्या फकिरांच्यात कमावणारा चंग्या हे बोलत होता. सारंकाही भोगायची त्याची तयारी होती निव्वळ मैत्रीसाठी.

तिघांच्यात मोठा पॉज...

ज्या मुलीसाठी भले भले वेडे होत, तिचा दीदार मिळावा म्हणून तिच्यावर लोकं हजारो रुपये कुर्बान करत, ती साक्षात भेटीला आल्यावर तिनं दिलेल्या लक्ष्मीला ठुकरावणाऱ्या चंग्याला कुदवण्याची ह्या दोघांची भयाण इच्छा झालेली. पण हा साला वेगळ्या मातीचा बनलेला.

‘पैसेको इसपे मारता हु मै... मै उसको नचाता हु, वो मुझे नहीं' असला खवळलेला चंग्या ह्या दोघांनी पहिल्यांदा अनुभवलेला आणि अर्थात तसाच होता तो. काम संपलं की निघायचा. बाहेर उभ्या असलेल्या आपल्या लुक्क्या सवंगड्यांना भेटून देशीचा बार गाठायचा अन् सकाळपर्यंत रमायचा.

चंग्या कुठेतरी हरवलेला...  

हॉटेल साईदीप बार.

लाइव्ह ऑर्केस्ट्रा आणि छमछम ही ह्या बारची खासियत.

संध्याकाळी सातनंतर बार तुडुंब भरे तो फक्त शाजीयाचा डान्स बघण्यासाठी. बार डान्सर वर्तुळातली ती स्टार परफॉर्मर होती. शाजीया एका रात्रीत एका बारमध्ये लागोपाठ चार ते पाच गाण्यांवर डान्स करत असे.

असे ती दोन ते तीन मोठमोठाल्या बारमध्ये रोज रात्री परफॉर्म करी. बाहेर तिची टॅक्सी तिच्या बॉडीगार्डसकट वाट बघत असायची.

इकडचा कार्यक्रम आटपला की लगेच असेल त्या वस्त्रावर बुरखा पांघरून आपल्या मेकअप आणि हेअर ड्रेसिंग करणाऱ्या बाईबरोबर ती बारच्या मागच्या दरवाजाने सटकून टॅक्सीत बसत असे.

तिच्या गाडीमागून बॉडीगार्ड लोकांची गाडी निघे.

शाजीयाचे कितीतरी धन्नासेठ आशिक होते. पैश्याच्या राशी तिच्या पायापुढे लोळण घेत. ती आपल्या बारमध्ये नाचावी यासाठी बारमालक तिला वाटेल ती किंमत द्यायला तयार असत.

शाजीया स्वतःच्या मर्जीची मालक होती.

चंग्या नुकताच हॉटेल साईदीप बारमध्ये ढोलकपटू म्हणून जॉईन झालेला. ‘अण्णा, आपके यहां कोई ढंग का ढोलक बजाने वाला नही है. नाचनेमे मजा नही आता’ तिच्या मनाप्रमाणे ढोलक न वाजवणाऱ्या ढोलकपटूवर रागावून तीने शशी अण्णाशी तक्रार केली.

शशी अण्णा हादरला. शाजीयाचा डान्स बघायला त्याच्या बारमध्ये पब्लिक यायची. बदल्यात तिप्पट- चौपट दराने दारू विकायचा तो. त्या ठराविक वेळेत त्याचा भयानक धंदा व्हायचा. हिने जर टांग मारली तर धंद्याची काशी होईल. त्याने लगोलग बार मॅनेजरला दुसरा चांगला ढोलक वाजवणारा शोधून आणायचा हुकूम सोडला आणि चंग्याची त्या बारमध्ये एन्ट्री झाली.

साईदीप बार एंड रेस्टॉरंट.

मुंबई सबर्बनमधला नामचीन महागडा बार. इथे काही ठराविक दिवस सोडल्यास ऐगैऱ्याला एन्ट्री नसायची. बुधवार, शुक्रवार, शनिवार नि रविवार असल्या प्रीमियम दिवसांची संध्याकाळ इथे शाजीयाच्या नावावर होती. रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या ठराविक दिवसात मालदार मंडळींसाठी हा बार बुक असायचा.

पैशाच्या राशी शाजीयाच्या पायावर लोळत. नाचताना गि-हाईकांनी उडवलेले पैसे उचलायची शाजीयाची फितरत नव्हती.

तिच्यावर नूरे नजर केलेल्या नोटांकडे ती ढुंकून पण पहायची नाही. तिची ठरलेली बिदागी त्या फेकलेल्या नोटांच्या कैक पटीने जास्त होती. आणि ती तिला अॅडव्हान्स पोचती झालेली असायची. थोडक्यात शाजीया व्यवहारात जाम पोचलेली होती किंवा असं म्हणूया की ती आपल्या कामाचा मोबदला चोख आणि रोख घ्यायची.

कलेला मात्र मनापासून जपायची शाजीया.

डान्सला उतरताना आपल्या गुरूला प्रणाम करायला न विसरणारी शाजीया यम बारमध्ये झिंगलेल्या तिच्या लवलवणाऱ्या उरोज आणि नितम्बाकडे खाऊ की गिळू नजरेने बघणाऱ्या गि-हाईकाला झुकून कुर्निसात करायला विसरायची नाही. 

‘जवानी को जी ले, पर झुर्रीयों की भी परवाह कर गालिब' शाजीयाचं वाक्य होतं हे.

शाजीयाने बरीच दुनियादारी सोसलेली. श्यानीसुरती होऊन तिनं स्वतःचा आशियाना बनवलेला आणि ती यशस्वी पण झालेली.

बार तुडुंब भरलाय. बियर, सोड्याच्या बाटल्या खचाखच उघडल्या जाताहेत. सोनेरी व्हिस्कीच्या पेगमध्ये स्पार्कल, काचेसारखा शुद्ध ट्रान्सपरंट बर्फ विसळला जातोय. नेहमीचे व्हीआयपी बसलेत. त्यांना सर्व्ह करणाऱ्या ललना मादकतेला आणखी खुमारी आणताहेत. पेगापेगाने झिंगलेला संपूर्ण माहौल शाजीयाची वाट बघतोय.

इतक्यात... मेंदी रंगल्या पावलांनी, आखूड साडी अन गोऱ्या गुबगुबीत उरोजांची दरी दाखवणारा घट्ट ब्लाउज घालून घुंघट ओढलेली शाजीया थिरकत्या पावलांनी प्लॅटफॉर्म वर अवतरते. संगीत आणि वाद्यांचा नाद निनादतो. देवकीताईचा सुरेल आवाज गुंजतो.

‘आया आया अटरिया से कोई चोर आया आया... वो भाभी आना दीपक जलाना, देखू बलम है या कोई और देवकीताई नेहमीप्रमाणे सुरात रंगतात. सनई वाला सुनीलदादा सुराची तान घेतो. ढोलकही तालात वाजतंय, ढोलक नेहमीपेक्षा जास्तच रंगलेलं बघून नाचताना मधूनच शाजीया ढोलकवाल्यावर नजर टाकते.

चंग्या गाण्याच्या तालावर ढोलक वाजवण्यात गुंग झालेला. त्याची बोटं ढोलकवर रुंजी घालत होती. एका पायावर दुसरा पाय ठेवून ढोलकचं आसन त्याने घट्ट केलेलं. माईक अॅडजस्ट करून चंग्या खाली मान घालून पूर्णपणे ‘आया आया अटरिया' मध्ये गुडूप झालेला. त्याच्या चेहऱ्यावर झुलणाऱ्या रेशमी केसांमुळे शाजीयाला त्याचा चेहरा दिसत नव्हता पण चंग्याचा ढोलकचा प्रत्येक ठेका तिच्या जीवाचा ठाव घेत होता.

'धोखा खाया है, जी घबराया है, कोई आया है' ह्या ओळींवर खरंच शाजीयाच्या हृदयाचा ठोका चुकलेला.

चंग्याच्या ढोलकच्या तालावर बेभान होऊन शाजीया नाचत होती. पैशाच्या राशी तिच्या पायांवर कोसळत होत्या.

गाणं संपलं. ‘वन्स मोर’ चा आवाज घुमला. पडलेल्या रुपयांच्या राशींकडे कधीही ढुंकून न बघणाऱ्या शाजीयाने झुकून त्या सगळ्या नोटा उचलल्या आणि मुह दिखाई म्हणून चंग्यावर नौछ्यावर केल्या. चंग्या नोटात नहाला.

ढोलकच्या वाती छल्ल्याने घट्ट करण्यात मग्न असलेला चंग्या ह्या अनपेक्षित घटनेने बावरला. त्याने मान वर करून पाहिले.

बूढे और जवान दिलोंकी धडकन, खुबसुरती की मल्लिका शाजीया आपल्या शुभ्र दंतपंक्ती दाखवत ब्रॉड हास्याने खाली पडलेल्या नोटांचा ढीग उचलून उचलून चंग्यावर अभिषेक करत होती. आता कुठे चंग्याची नी तिची नजरभेट झालेली.

चंग्या... रेशमी केसांचा, गोऱ्या रंगाचा, नाजूक अंगाचा, टपोऱ्या स्वच्छ डोळ्यांचा चंग्या... नरेंद्र निवृत्ती निळे.

त्याला त्याच्या अंगावर पडणाऱ्या नोटांशी काही घेणंदेणं नव्हतं. ते पैसे पण त्याला मिळणार नव्हते. बार मालकाबरोबर जो रेट ठरलेला तोच त्याला मिळणार होता.

चंग्याला सगळी च्युतयागिरी माहीत होती. त्याला टेन्शन हे होतं की रात्री बारानंतर बारच्या बाहेर भेटणाऱ्या मित्रांच्या दारूची आणि भुना घोस्तची कशी सोय लावायची?

टाळ्या-शिट्ट्यांचा धुमाकूळ चालू होता. 'वन्स मोर' ची फर्माईश झाली. शाजीया एकटक चंग्याकडे बघत उभी राहिली.

चंग्याने म्युजीशियनच्या 'फोर, थ्री, टू, गो'च्या गिणतीसरशी ढोलकवर थाप मारली.

'आया आया अटरिया पे कोई चोर ला पुन्हा सुरवात झाली. आता देवकीताई गात नव्हती. आता फक्त चंग्याचं ढोलक आणि शाजीयाच्या पैंजणांचा सामना रंगलेला.

चंग्याने आता गाण्याचा ठेका सोडून वेगळाच रिदम धरलेला. बेभान होऊन चंग्या ढोलकच्या तालावर शाजीयाला नाचवत होता.

प्रणयसुखाला आसुसलेली मादी जशी मनासारख्या मिळणाऱ्या परमोच्च क्षणाला उचंबळून साथ देते, तशी काहीशी अवस्था झालेली शाजीयाची.

चंग्या वाजवत होता, शाजीया अंतर्बाह्य थिरकत होती. नोटांची बरसात होत होती. गल्ल्यावरून नोटांचे हार शाजीयावर ओवाळले जात होतेच, पण आता हारांचा पाऊस चंग्याच्या ढोलकपाशी पडू लागलेला.

त्रिताल, केरवा, झपताल, दादरा इत्यादी तालांची खैरात चंग्या मैफिलीला नजर करत होता.

ढोलक आणि शाजीयाच्या पैंजणांचा सामना रंगात आला होता. इतके दिवस फिल्मी गाण्यावर नाचणारी शाजीया आज चंग्या घुमवत असलेल्या क्लासिकल तालावर बेभान होऊन तरंगत होती.

असला नृत्याविष्कार बारमधल्या पब्लिकला नवा होता. सगळ्यांच्या हातातले मद्याचे प्याले स्थिर झालेले. ह्या नृत्याला शिट्ट्या-बिट्ट्या येत नव्हत्या. येत होत्या 'आह.. वाह'च्या ललकाऱ्या.

पैंजण आणि ढोलक झुमत होते तमाम दुनियेला विसरून...

वाजवता वाजवता चंग्याच्या ढोलकच्या चढलेल्या वातीवर शाजीयाचे मेंदी रचलेले हात आपटले गेले. ढोलकच्या चढलेल्या वाती घसरल्या, ताल तुटला अन् चंग्या भानावर आला. बांगड्यांच्या आणि आरसे लावलेल्या वस्त्राच्या खणखणाटात शाजीया चंग्याच्या पायाशी पडली.

सगळा स्टाफ धावला शाजीयाला सावरायला. मेकअप वाली बाई धावली. सगळ्यांना शाजीयाने हाताने थांबवलं.

चंग्याच्या पुढ्यात बसून शाजीया विचारतेय चंग्याला 'मालिक, जान लोगे क्या?'

बार तुडुंब भरलाय. लोक दारू प्यायलेत. ह्या दोघांचा संवाद कान देऊन ऐकताहेत... ऐकताना एकच हुर्यो चाललाय 'शाजीया शाजीया'

शाजीया उठली... तिने माईक हातात घेतला... म्हणाली ‘मुआफी चाहती हूं. मेरे अजीजो .. पर जो फनकार मैने यहां, इस जगह पाया वो माशल्ला काबिले पुरा तारीफ है... तालिया तो उनको मिलनी चाहिए... उनके हुनर पर मै सदके हुहूं...' चंग्याकडे हात दाखवत ती म्हणाली आणि पटकन सगळं सावरत लोकांना कुर्निसात करुन शाजीया निघाली बुरखा पांघरून पुढच्या डान्सला.

पुढे चंग्या नि शाजीया जोडी धुमाकूळ घालू लागली. शाजीया बार मालकाला विनंती करून चंग्याला दुसऱ्या बारमध्ये वाजवायला घेऊन जाऊ लागली. चंग्याला शाजिया त्याला बारमधून मिळणाऱ्या बिदागीपेक्षा जास्त पैसे देऊ लागलेली. प्रत्येक बारमधून चंग्याला कायमस्वरूपी ढोलक वाजवण्याची ऑफर येत होती. चंग्या आता ह्या गोष्टीला कंटाळलेला.

शाजीयाचं संपलं रे संपलं की त्याला तिच्या मागून आपला ढोलक पॅक करून घाईने निघावं लागे. सुरुवातीला शाजीया त्याला तिच्या टॅक्सीत बसू देत होती. पण नंतर मात्र ती त्याला मागच्या तिच्या बॉडीगार्ड लोकांच्या टॅक्सीत बसायला सांगू लागली.

सुरुवातीला बॉडीगार्ड लोकांनी त्याला आपल्यासोबत बसू दिलं पण त्यांना सुद्धा जागा पुरायची नाही म्हणून ते चंग्याला तिथेच सोडून गाडी पुढच्या बारकडे घेऊन जात, विलंब न लावता त्यांना शाजिया मॅडमच्या मागे संरक्षण देण्यासाठी त्वरित निघायचे असे, म्हणून ते पण जास्त वेळ थांबत नसत. साले सगळेच्या सगळे खोचड, हरामी होते. ते चंग्याकडे निव्वळ 'ढोलक बजानेवाला' असल्या कुत्सित नजरेने बघत असत. मग चंग्या एकटाच ढोलकची बॅग खांद्याला लावून अस्वस्थपणे दुसरी टॅक्सी पकडून तो बार गाठी, जिथे शाजीयाचा परफॉर्मन्स होणार असे.

एक-दोनदा उशिरा आल्यावर शाजीया त्याच्यावर ओरडली देखील. आता त्याला शाजीयाचं खरं व्यावसायिक रूप दिसू लागलेलं.

व्यवसायापेक्षा कलेला प्राधान्य देणारा चंग्या इतके दिवस नकळत स्वत:चे स्वातंत्र्य सुद्धा गमावून बसलेला. आता त्याला त्याच्या यार-दोस्तांची आठवण येऊ लागलेली.

इतके दिवस ते बिचारे त्याच्या बारसमोर त्याची वाट बघत उभे राहायचे. पण चंग्या मात्र शाजीयाच्या मागे मागे धावत असलेला दिसायचा. खिशातले पैसे तो चिनुच्या हातात टपकवी. 'प्या तुम्ही लोक... मी आलो तर येईल' म्हणत तो शाजीयांच्या टॅक्सी मागे धाव घेई. शाजीयाचा डान्स नसलेल्या दिवशी मात्र तो मित्रांना तुफान पार्टी द्यायचा.

पहाटे पाच वाजता शाजीयाचे बारमधले शेवटचे नृत्य झाल्यावर थकून ती लगबगीने टॅक्सीत जाऊन बसे. सुरुवातीला ती चंग्याला त्याची बिदागी स्वतःच्या हाताने अगदी मानाने, आदराने द्यायची. आता मात्र त्याला बिदागी मेकअपवाल्या बाईकडून किंवा एखाद्या बॉडीगार्डकडून मिळू लागलेली.

चंग्याला आता स्वतःची ओळख पटायला लागलेली आणि शाजीयाचीही. तो काही तिच्या प्रेमात पडला नव्हता तिच्या मागे मागे फिरायला आणि साला असला भिकारपणा असला अपमान त्याला नकोसा झालेला.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश. पुढे.... प्रकरण २६🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या