कामाठीपुरा प्रकरण 2️⃣4️⃣

 


कामाठीपुरा प्रकरण 2️⃣4️⃣ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/8/2026 :

*हताश झाला चिनू... अरेरे हे आपल्या हातुन काय घडलं. अरूण, चंग्या, मोहन तिघेपण अवाक् झाले.*

*'भेन्चोद क्या किया तूने' पोटात घुसलेल्या* *सामानाकडे बघत फेफ्टी विव्हळला.*

*चिनूनं रुतलेला चाकू फेफ्टीच्या पोटातून बाहेर काढला... आया, मोहन चंग्या ह्यांनी फेप्टीला सावरलं.*

चंग्या रक्ताळलेला हात सांभाळत नाक्यावर धावला. टॅक्सी मिळेना.

त्याने जेवत असलेल्या हमीदला घरातून खेचलं. हमीदने लगोलग गाडी काढली. फेफ्टीला टाकलं मागच्या सीटवर आणि निघाले नायर हॉस्पिटलच्या दिशेने.

३०२ ची केस. फेफ्टीला भरती करताच तिघांनी तिथल्या कॉन्स्टेबलसमोर गुन्ह्याची कबुली दिली. तिघं म्हणजे चिनू, अरुण नि चंग्या.

काळ्या मोहनला त्यांनी मुद्दाम ह्यात नाही ओढलं.

तेराव्या गल्लीतल्या दीपा बारचा मालक सुधाकर अण्णा कळताच हजर झाला. औषधांच्या प्रीस्क्रीप्शनचा कागद स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याने खिशातून नोटांचं बंडल काढून आपल्या माणसाच्या हातात देत त्याला औषधं आणायला पिटाळलं.

हॉस्पिटलात हळूहळू गर्दी जमू लागलेली. ह्या तिघांना अजून अटक झालेली नव्हती. तिघांसकट सगळे जण ऑपरेशन थेटरच्या बाहेर उभे.

मामला आपसातला, मैत्रीतला होता. भायखळा, लवलेन, ताडवाडी, लालबाग, चुनाभट्टी सगळीकडून गाड्या येऊन इस्पितळाच्या आवारात लागल्या.

वाहून अरुणच्या आणि चंग्याच्या हातावर टाके पडले होते. त्यांचंही रक्त बरंच गेलेलं. त्यांना पण बेड दिलेला. पण ते दोघं तिथे थांबले नव्हते. चिनू, अरुण, चंग्या, मौन्या सगळ्यांसमोर बिनधास्त वावरत होते.

फेफ्टी बरा व्हावा म्हणून त्यांच्या समोरच्या बाकड्यावर पैसे जमा होऊ लागलेले. गळ्यातली चेन, हातातलं ब्रेसलेट, सोन्याचं कडं, अंगठ्या, ज्याच्याकडे जे आहे तो ते त्या रुमालात टाकत होता.

पोलीस केस झालेली. फेफ्टीला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवणे शक्य नव्हते.

आणि ती वेळ ही नव्हती. तातडीने उपचार होणे गरजेचे होते.

लाला आलेला. सावंत साहेबांना समजावत होता 'आपस का मामला है, छोड दो साब'

'खान साब इन तीनोने गुनाह कबूल कर लिया है. डायरी बन गई है. कस्टडी में लेना ही पडेगा. बाद की बात बाद में' सावंत साहेब लालाला म्हणाले. लालाने तिघांकडे पाहिलं. तिघेही जायला तयार होते.

चिनूने जमलेला ऐवज रुमालात टाकला. रुमालाला गाठ मारली आणि तो ऐवज सुधा शेट्टीच्या हातात सोपवला.

‘अन्ना फेफ्टी को बचा ले, तेरा गुलाम हो जाऊंगा' चिनू अण्णाच्या डोळ्यात बघत म्हणाला.

अण्णाने चिनूला घट्ट मिठी मारली.

तिघंही व्हॅनमध्ये बसले. डब्बा निघाला नागपाडा पोलीस स्टेशनला.

नागपाडा लॉकअप.

तिघांना आत ढकललं गेलं.

घाणेरडा, शिसारी आणणारा दर्प,

संडासात बसल्यासारखी उघडीबोडकी लोकं.

काही जण फक्त अंडरवेअरवर.

श्वास गुदमरतोय, प्रचंड उष्मा, अंगातून घामाच्या धारा लागल्या आहेत. आतला प्रत्येक जण ह्या तिघांकडे बुभुक्षित नजरेने बघतोय. तिघं हळूहळू आत सरकताहेत. प्रचंड थकलेत तिघे. चिनू ह्या तिघांच्यात वयाने लहान, पण अंगाने भरलेला असल्यामुळे ह्यांच्यात मोठा वाटणारा.

एका साफ-सुथऱ्या दिसणाऱ्या हॉल-वजा खोलीत हे तिघे बसले. बूड टेकवताहेत तोच चंग्याला लाथ बसली.

‘उठ इधरसे चुतये' एका लट्ठ दाढीवाल्याने बसलेल्या चंग्याला लाथेने उठवलं.

सहा-सात आडदांड दाढीवाले एका कोपऱ्यातून ह्या तिघांकडे हसून बघत होते.

'अबे उठ बोला ना भोसडीके, ताकता किसको है बे?' एक दाढीवाला ह्यांच्याकडे बघत म्हणाला.

‘गेम करके आयेले है भाय, वो भी खुद के दोस्त का' एक जण आत येत म्हणाला.

बापरे ह्यांना एवढ्यात सगळं कळलं पण. तिघेही अवाक् झाले.

'बेहेंचोद ... यहां कौन लाया रे इनको? उपर क्यो नही भेजा?' एक गोरटेला उंच धिप्पाड अंडरवेअर घातलेला दाढीवाला गरजला. 'ये... निकल ना बे च्युत्ये आंख फाडकर क्या देखता है?’

धडाधड तिघांनाही लाथा-बुक्क्यांची मेजवानी घडली. हे तिघेही भिडले त्यांना. पोटात अन्नाचा कण नसलेले, थकलेले तिघे सात-आठ जणांशी काय लढणार? आणि ती मोठी ग्यांग होती. जे जे हॉस्पिटलची. पाकमोडिया स्ट्रीट ची.

चिनू समजला. दोघांना घेऊन तो चुपचाप बाजूच्या कोंदट घाणेरड्या बराकीत जाऊन बसला.

इथे प्रचंड गर्दी. भिंतीवर ढेकणांच्या गुहा. प्रचंड जळमट. वर चाळीसचा बल्ब जळतोय. हागा - मुताचा घाणेरडा वास.

ह्या सगळ्या अवस्थेत तिघांना कधी झोप लागली कळलं सुद्धा नाही. झोप तर त्यांना आता कुठेही लागली असती. इतके ते शारीरिक आणि मानसिकरित्या थकलेले.

उजेड पडला चिनूच्या डोळ्यांवर.

उन्हाची तिरीप पडली तशी मिचमिचत त्याची नजर छताला खिळली. थोडा वेळ तो ब्लँक झाला. त्याला कळेचना आपण कुठे आहोत ते. हे पॅव्हेलीयनचं छत तर नाहीच नाही आणि अंग एवढं का ठणकतंय खाडकन् डोळे उघडले त्याने. झपकन उठून बसला तो.

उघडाबंब घामेजला चिनू स्वतःचा शर्ट शोधत शोधत अरुण आणि चंग्याचा शोध घेऊ लागला.

सापडले. आडवे तिडवे शांत झोपलेले दोघे जण एका कोनाड्यात. चिनूला कालचं सगळं आठवलं. एक हुंदका दाटून आला गळ्याशी. आई-बहिणींची आठवण झाली. 

फेफ्टी आठवला नि त्याच्या अंगावरून सर्रकन काटा उभा राहिला. काय झालं असेल फेफ्टीचं, गेला तर नसेल ना?

‘चंग्या ऊठ... आऱ्या ऊठ ना गांडू.' म्हणत त्याने दोघांना जागं करण्याचा प्रयत्न केला.

चंग्या कुशीवर वळला. त्यानं पुसटसं चिनूकडे पाहिलं नि खाडकन उठून बसला तो पण. दोघं एकमेकांकडे शून्य नजरेनं पहात बसले, इतक्यात अरुणला पण जाग आली. अरुणची ही तीच अवस्था.

अंधाऱ्या त्या खोलीतल्या अकरा फुट उंचावर असलेल्या भिंतीतल्या दीड बाय दीड फुटाच्या खिडकीतून फक्त धूसर मळभ ल्यालेल्या आकाशाचा चऊथभर तुकडा दिसत होता.

त्या खोलीतला प्रत्येक जण त्या तुकड्याकडे आधाशी नजरेनं पहात होता. प्रत्येकाला ह्या अंधार कोठडीतून स्वच्छ निरभ्र आकाशाकडे झेप घेण्याची इच्छा अनावर होत असावी.

वेळ काय झाली ह्याचा काहीच अंदाज लागत नव्हता.

पोलीस स्टेशनची दोन माळ्यांची लॉकअपची इमारत. लांबलचक फ्लोअर. प्रत्येक माळ्यावर तीन मोठाल्या हॉलवजा बराकी. प्रत्येक बराक कुलुपबंद. बराकीतच मोरीवजा तुंबलेला संडास तो पण ओपन. तिथंच हागायचं, मुतायचं नि तिथंच आंघोळ करायची. ओकारी यायला लावणारी दुर्गंधी.

बराकीसमोर व्हरांडा ये-जा करण्यासाठी. बाराकीमधून फक्त व्हरांड्यासमोरची भिंत दिसेल बाकी काहीच नाही. प्रत्येक माळ्यावरच्या गेटच्या बाहेर पोलिस पहाऱ्याला.

लॉकअपची इतकी भयाण अवस्था की विचारू नका.

काही राष्ट्रांत जसं प्रत्येक नागरिकाला सैन्यात जाणे क्रमप्राप्त असते तसे इकडे प्रत्येक नागरिकाला वयात आल्यापासून जर हे लॉकअप्स दाखवले ना तर कुणीही गुन्हा, अत्याचार करायला धजावणार नाही.

‘फेफ्टी खपला तर नसंल ना?' चंग्याच्या प्रश्नावर चिनू भानावर आला. 

'काय माहीत' अरुणने उत्तर दिले.

‘आयच्या गावात-कसं काय झालं यार समजलंच नाय रे.' चिनू मध्ये पडला. 

'सोड ना झालं ते झालं. भेन्चोद सामान तर त्यानेच काढलं ना? हे काय आमच्यावर वार तर केलेच ना त्याने, त्याला घातला नसता तर त्याने आपल्याला घातलं असतं. सोड.. बघू जे होईल ते. आपण त्याला समजावत होतो. तो तर आपल्याला टाकायला निघाला.' अरुण बेफिकिरीने म्हणाला.

इतक्यात बराकीचं दार करकरल्याचा आवाज आला. दोन कॉन्स्टेबल बराकीत शिरले. चंग्या, चिनू, अरुणचा त्यांच्या नावासकट पुकारा झाला. तिघं लायनीत उभे राहिले.

मोठ्या इंक पॅडवर त्यांच्या हाताचे प्रत्येक बोट दाबून धरून त्याचा ठसा कोऱ्या पेपरावर घेण्यात आला. तिघांच्याही हातांच्या बोटांचे ठसे घेतले गेले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या खुणांची नोंद घेण्यात आली. दहा वाजता कोर्टात जायचं आहे, तयार राहायला सांगून ते दोघं निघून गेले.

सकाळ झाली.

तिघांनी घाणेरड्या मोरीत कसंबसं आटपलं.

अरुणच्या दंडाला आणि चंग्याचा हाताला भयानक ठणका लागलेला. दोघेही विव्हळत होते.

दहाच्या सुमारास पोलीस पार्टी बराकीत घुसली. प्रत्येकाचं नाव घेत आरोपींना बेड्या घालण्यात आल्या.

चिनूच्या दोन्ही हातात बेड्या आणि चंग्या, अरुण एका बेडीत. सगळ्यांना व्हॅन मध्ये कोंबून पोलीस पार्टी माझगाव कोर्टाच्या दिशेनं निघाली.

ह्या सर्व प्रोसेसमध्ये पोलीस बाकीच्या आरोपींपेक्षा ह्या तिघांशी थोडे सौम्य वागत होते.

बेसिकली मर्डर केलेल्या गुन्हेगारांशी पोलीस दचकून वागतात असं चिनूने ऐकले होते.

ओह शीट्... ह्याचा अर्थ फेफ्टी संपला.

फेफ्टीचं जाणं ही ह्यांची मर्दुमुकी नसणारंच होती मुळी, उलट नेहमी मदतीला धावणाऱ्या, जीवाला जीव देणाऱ्या, जीव वाचविणाऱ्या दोस्ताचा जीव घेतल्याची बोचरी जाणीव चिनूला व्हायला लागली.

चिनूला आधीचं सारं काही आठवायला लागलं.

लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत गिरगाव चौपाटीच्या समुद्रात बुडत असताना कुठून कसा काय फेफ्टी आला आणि त्याने समुद्राच्या पोटात गेलेल्या चिनूला बाहेर काढलं

'आयघाल्या, तुला बोललो होतो ना जास्त आत जाऊ नको म्हणून... नशीब हागताना पाहिलं म्हणून नाय तर गेला असतास' म्हणत डोक्यावर टपली मारणारा फेफ्टी चिनूला आठवला.

गल्लीतल्या पावाच्या गाडीला लटकून झोका झोका खेळत असताना ती प्रचंड वजनाची पावाची गाडी जेव्हा लहानग्या चिनूच्या मानेवर कोसळली तेव्हा वरचा दम वरती नि खालचा दम खाली राह्यलेला चिन्याचा श्वास कोंडून डोळ्यासमोर अंधारी आलेली. तेव्हाही कुठूनसा धावत येऊन फेफ्टीने ती अवजड गाडी जोर लावून उचलली तेव्हा कुठं वाचला चिन्या.

कडदोडीच्या छपरावरून पतंग पकडताना निसटलेला चिन्या खाली वीस फूट गटारात कोसळत असताना त्याला अलगद वरचेवर पकडणारा फेफ्टी आठवला. 

आणि... आणि गणपतीच्या मिरवणुकीत राधेच्या गल्लीतली पोरं जेव्हा चिन्यावर धावून आली तेव्हा त्यांना जोर लावून मागे सारून चिन्याची ढाल होणारा फेफ्टीच होता. राधेची छेड काढणाऱ्या अल्ताफ काल्याला उचलून वखारीत आणणारा फेफ्टीच होता.

चिनूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. चिनू आज जिवंत होता तो फेफ्टीमुळेच. पण हाच लहानपणीचा यार विचित्र महत्वाकांक्षेमुळे वाचवलेल्या जीवाचा जीव घ्यायला निघालेला.

चिनू सुन्न झाला. 

गाडी कोर्टाबाहेर उभी राहिली. सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं. उन्हाचे चटके आणि बाहेरची ताजी हवा याने थोडं बरं वाटलं.

सगळ्यांना एका रांगेत ढकलत कोर्टाच्या आत नेण्यात आलं.

अनवाणी सगळे. कुणाच्याही पायात चपला नव्हत्या. चिनूचं पँटीत खोचलेलं शर्ट एका हवालदाराने बाहेर काढलं. कोर्टाच्या आतल्या पिंजऱ्यात कोंबलं सगळ्यांना. चिनूने सभोवती नजर फिरवली. लट्या, शान्त्या, नितीन काण्या, बाबू त्यांच्याकडे बघत होते. शान्त्यादा हवालदाराच्या हातात दहाची नोट चिकटवून पिंजऱ्याजवळ आला.

'ऑपरेशन सक्सेस झालंय, पण होश नाय अजून. पण डॉक्टर बोललाय बरा होईल तो. बघू नाय तर मोठ्या दवाखान्यात हलवू. तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका.' म्हणाला श्यान्त्यादा.

हा मोठा दिलासा होता पोरांसाठी. फेफ्टीला भले होश नसूदे, पण तो जिवंत असणे गरजेचं होतं.

श्यान्त्यादाने शंभराच्या नोटीची बारीक घडी करून जाळीतून चिनूकडे सरकवली ‘राहूदे च्यापान्याला कामाला येतील. तारीख देतील. परत रिमांड घेतील पोलीस. महिना-दीड महिना सुटका नाय. मनाची तयारी ठेवा. बाहेर भेटतोच.’ म्हणाला नि बाजूला झाला.

तेवढ्यात नागपाडा पोलीस ठाण्याचा पुकारा झाला. सर्व आरोपींना एक एक करत जजसमोर हजर करण्यात आले. एक-दोघांची जागच्या जागी सुटका झाली ते आनंदाने पळत सुटले. काहींना जामीन मिळाले. काहींना जेल कस्टडी.

ह्या तिघांना पंधरा दिवसाचे रिमांड मिळाले. म्हणजे चौकशीसाठी पंधरा दिवस पुन्हा पोलिसांच्या ताब्यात. सगळ्यांना पुन्हा लायनीने बाहेर काढले गेले. 

पोलीसांच्या गाडीच्या दिशेने चालताना चंग्या थबकला. 

त्याने समोर पाहिलं - शाजीया उभी होती.

शाजीया... हॉटेल साईदीप बारमधील मोस्ट फेवरेट डान्सर.

शाजीया सोबत आणखी एक मुलगा होता तो त्याच बारमधला गणेश वेटर. शाजीयाला बघून हे तिघे अवाक् झाले. ह्यांचा विश्वास बसेना कि खुद्द शाजीया इथे या कोर्टात येईल आणि ती पण चंग्याला भेटायला. काळ्या बुरख्यातून डोकावणारा शाजीयाचा गौर वर्णाचा चेहरा चंद्रासारखा प्रकाशमान भासत होता. तिच्या काजळ घातलेल्या टपोऱ्या डोळ्यात आसवांची नितळ झुंबरं तरारलेली. ती चंग्याकडे एकटक बघत होती.

✍️ सुधीर जाधव

💠 क्रमश पुढे..... प्रकरण २५

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या