कामाठीपुरा प्रकरण 1️⃣3️⃣
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 2/8/2026
*'क्या सोच रहा है बावा' म्हाताऱ्या पासकीनचा हात त्याच्या खांद्यावर विसावला तेव्हा त्याची समाधी भंगली.*
*'अरे कुछ नै मामा’ म्हणत तो छान हसला. त्याने हातातल्या कोल्ड ड्रिंकची बांटली मामाच्या व्हीस्कीने भरलेल्या ग्लासाला लावली अन चियर्स केलं.*
कामाठीपुऱ्यात सणांची सुगी होती. प्रत्येक सण उत्साहात साजरा होत असे. गोयंदा.... ज्याची चिन्या आतुरतेने वाट बघत असायचा तो सण, कारण या सणात मस्त शायनिंग मारायला मिळायची.
कामाठीपुरा तसा खूप मोठा. सगळ्याच गल्ल्या गोयन्द्यात भाग घ्यायच्याच असं नाही. हो पण हंड्या मात्र प्रत्येक गल्लीत असायच्या. एकेका गल्लीत चारचार हंड्या.
कामाठीपुऱ्याच्या प्रत्येक गल्लीत दोन-तीन दारूचे धंदे असायचे. त्यामुळे फायनान्सचा कधीच प्रॉब्लेम नसायचा. फक्त तीनच गल्ल्या हंडी फोडणाऱ्या होत्या. तिसरी, आठवी आणि पाचवी गल्ली.
पाचवी गल्लीतले रहिवासी आणि तरुण व्यायाम मित्र मंडळातील सभासद यांचा ग्रुप मोठा आणि त्यांचा मजबूत गोयंदा असायचा.
एम.टी., नागपाडा, जे. जे. हॉस्पिटल, भायखळा, ताडवाडी, लवलेन, आग्रीपाडा सगळीकडून पोरं यायची थराला. सगळे पहिलवान. पिळदार शरीरयष्टींचे रावडे अण्णा लोक आणि सिनियर मेम्बर्स खालच्या थरासाठी सज्ज.
पाचव्या गल्लीचा गोयंदा म्हणजे कामाठीपुऱ्याची शान.
ह्या गोयन्द्यात टॉपच्या थराला उभं राहण्याचं चिनूचं स्वप्नं होतं.
चिनू जीमला ज्वाईन झाला आणि त्याने गोयन्द्यात सामील होण्याचा मान पटकावला तेव्हा तो हाडकुळा होता. थराला वगैरे उभे नाही करायचे त्याला. सामानाची ने-आण करायचा तो आणि अरुण मात्र थराला उभा असायचा ते पण खालून तिसऱ्या.
हंडी फुटली की हातात लाकडी गदा घेऊन 'भाक्कू माकूम... भाक्कू माकूम... भडाकू माकूम ... भाक्कुमाकुम' च्या खालुबाज्याच्या तालावर आणि 'टो टो टो' च्या मोठ्याने दुमदुमणाऱ्या सनईच्या ललकारीवर पहिला नाचायला सुटायचा तो चिनूच.
चिनू अंगाने भरला. बॉडी बनली. आता त्याला गोयंदा कधी एकदाचा येतोय असं झालेलं.
गोयंद्याच्या एक महिन्याअगोदर हे सगळे पार्टनर व्यायामशाळेत दिवसा तीन तीन तास व्यायाम करायचे. जोर, बैठका, बेंच प्रेस, पुली, शोल्डर, आर्म्स, स्कॉट सगळं घ्यायचे.
बेंच प्रेस छाती भरदार होण्यासाठी. शोल्डर पुली, खांदे भरीव व्हावे म्हणून. डंबेल्स - आर्म्स, दंड पिळदार व्हायला आणि स्कॉट प्रेस खांद्यावर दोनशे किलोचे वेट घेऊन बैठका मारून मांड्यांना कट्स, शेप द्यायला.
हे सगळं कशासाठी तर गोयन्द्याला हाफ चड्डी आणि आखूड हाताचं टी घातल्यावर छाती, दंड आणि मांड्या जबरी दिसाव्यात, आपण छावा दिसायला पाहिजे, पोरी आणि भाभ्या फिदा व्हाव्यात एवढ्यासाठीच.
गोयंदा एक सुंदर इव्हेंट असायचा ह्या सगळ्यांसाठी.
एकमेकांच्या कमरेला धरून, मोठी साखळी तयार करून, 'गोयंदा आला रे आला तो कामाठीपुरेवाला... अरे एक दोन तीन चार पाचव्या गल्लीतली पोरे हुश्यार' च्या ठेक्यावर पिळदार दंडाचे स्नायू दाखवत हाताने चांदीची गदा गरागरा फिरवत, जोरात उजवा पाय पुढे टाकताना भरदार मांडीचा फुललेला प्रत्येक स्नायू बघून समोरचीचा कलीजा खल्लास झालाच पाहिजे अशी अदाकारी असायची पोरांची.
आठवड्याआधीच गोयन्द्याची तालीम व्हायची. थरावर कसे चढायचे, माणसांची शिडी आतून आणि बाहेरून कशी लावायची, थर कोसळताना कसं सावरत पडायचं, हंडीला लटकलेल्या भिडूला पुन्हा थर लावून कसं अलगद झेलायचं, ओणवा राहून किंवा बसून, खांद्यावर बसलेल्या हंडी फोडणाऱ्या गोविंदाला स्वतः उभं राहून अलगद उभं कसं करायचं, हंडी फुटल्यावर थरावरून सावकाश खाली कसं उतरायचं ह्या सगळ्याचं अनुभवी लोकांकडून प्रशिक्षण मिळत असे. ज्याम भारी असायचं सगळं.
आणि मग तो दिवस उजाडायचा.
कधी न पाहिलेले रावडी, काळ्या कातडीचे कामाठी अण्णा लोक, नागपाडा पोलीस लाईन आणि एमटीतली टीम, जेजेचा पक्या शिवतरकर, अरुण, जॉन्सन. लवलेन मधला दया, विज्या त्यांचे सवंगडी, आग्रीपाड्यातला हिरामण दादा आणि त्याची गँग हे सगळे कसे काय अचानक उगवायचे कुणास ठाऊक. सगळी प्रकाश पाटणेची कमाल होती.
गोरागोमटा, पिळदार शरीराचा प्रकाश पाटणे सगळ्यात उठून दिसायचा. चिन्याचा आयडॉल होता तो.
प्रत्येक थराच्या मनोज वऱ्हाडेचा उत्साह तर बघण्यासारखा असायचा. गोविंदाला बुस्ट करण्याची किमया त्याच्याकडे होती.
व्यायाम शाळेतल्या बजरंगाची पूजा होऊन गल्लीतल्या पंचमुखी हनुमानाची पूजा झाली रे झाली की खालुबाज्यातले सनईवाले दोन्ही सनया हत्तीच्या सोन्डेगत आभाळाच्या दिशेने उंचावून ट्यो ...ट्यो ... ट्यो ... असा काय सूर लावायचे कि गल्ली दुमदुमून जायची. त्यांच्या मागून खालु बाज्यावाले पण टिमकी आणि ढोल दणाणून सोडत.
भाक्कुमाकुम भडाकुमाकुम सुरू झालं की त्या दुमदुमणाऱ्या वाद्याच्या कैफात सगळी मुलं रांगेनं हातात चांदीच्या आणि लाकडाच्या भल्या मोठ्या गदा घेऊन एकमेकांच्या चड्ड्या मागून धरून उजवा पाय पुढे अस्सा टाकायचे की कमावलेल्या पिळदार, धष्टपुष्ट मांड्यांचे कट्स लखलखले पाहिजेच पाहिजे. आणि मग त्यांच्यावर घराघरातून पाण्याचा मारा सुरू व्हायचा.
‘गं तुझ्या घरात नाही पाणी घागर रिकामी रे गोपाला... गोयंदा आला रे आला तो पाचवे गल्लीवाला’ म्हणत पाचवी गल्लीचा गोयंदा कामाठीपुऱ्यातल्या सगळ्या गल्ल्या फिरत असे.
मागची सगळी खुन्नस, अकड किंवा झालेले राडे विसरून त्या त्या गल्लीतल्या भाईला मानाची सलामी दिली जायची.
दुसरी गल्लीत आल्यावर सेम टू सेम 'जख्मी' सिनेमातल्या सुनील दत्त सारख्या दिसणाऱ्या त्याच्या सारख्याच लांब मिश्या आणि लांब रेशमी केस असलेल्या रवी दादाला पोरं खुश करायची.
'अरे एक दोन तीन चार रवी दादाची पोरं हुश्यार...' ह्या सलामीवर खुश होऊन भाई मग मुलांवर खिसा रिकामा करायचा.
मग वळसा घेऊन गोयंदा दोन टाकी, चंग्याच्या बिल्डींगमध्ये शिरे.
पूर्ण मोहल्ला मुस्लिमांचा. फक्त दोन हिंदू कुटुंबे. तरीही ह्या बिल्डींगमध्ये दोन हजाराची हंडी बांधली जायची.
प्रत्येक गल्लीत, प्रत्येक वाडीत, प्रत्येक मोहल्ल्यात नाचण्याची मजा काही औरच असे. त्याला तसे कारण पण होते. प्रत्येकाची छावी कोणत्या ना कोणत्या गल्लीत, मोहल्ल्यात, चाळीत असेच असे. मग त्या गोयंघाला तिथं भाव खायला मिळायचा.
चिनू तर टॉपच्या थराचा. पक्या आणि चिनू दोघे चवथ्या थराला उभे राहायचे. त्यांच्यावर आणखीन एक व त्याच्यावर हंडी फोडणारा लहान मुलगा असायचा. पाच किंवा सहा थर लावले जायचे. पहिल्या प्रयत्नात हंडी फुटायचीच. पाचव्या गल्लीचा गोयंदा तिसऱ्या गल्लीत अवतरला. हंडी चिनूसाठी भलतीच खास होती.
तिसऱ्या गल्लीतली हंडी नेमकी राधाच्या घरासमोर बांधलेली.
चिनूचं झेंगट माहिती असल्यामुळे पाचव्या गल्लीच्या गोयंद्याला बऱ्यापैकी उधाण आलेलं.
‘अरे शोर मच गया शोर देखो आया माखन चोर' मोठ्या आवाजात हे गाणं लाउडस्पीकर वर वाजत होतं.
राधा आणि तिच्या घरातले सगळे जण बाल्कनीतून बघताहेत.
खिडकीच्या दरवाज्याआडून चिनूला बघत बसलेली राधा त्याची नजर पडताच लाजेने लाल झाली. मंद हसून बघतेय ती ह्याला अन् हा पण तिला. पाऊस आणि पाण्याच्या फवाऱ्यात ती दोघं एकमेकांना स्पष्ट बघण्याचा आटापिटा करत होती.
गाणं वाजायचं थांबलं.
थर लावण्यापूर्वी दहीहंडीभोवती जोषात मोठा राउंड मारून हंडीला खालुबाज्याच्या ठेक्यावर गोविंदांनी दणक्यात सलामी दिली. मास्तरांनी शिट्टी फुंकली. खालच्या थराचे तगडे शिलेदार क्षणात जमा झाले.
दणकट, उंचपुरे बारा जण एकमेकांच्या कमरेला विळखा घालून, एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून, रिंगण करून ताठ उभे राहिले. त्यांच्या मधोमध सहा जण उभे, शिडी आणि सपोर्टसाठी.
शिट्टीसरशी दुसरा थर लगबगीने चढला.
खालुबाजा आणि सनई जोशात निनादतेय. तिच्या भाक्कुमाकुमच्या ठेक्यावर खालच्या, आतल्या थराची शिडी घेऊन तिसरा थर दुसऱ्या थरावर अलगद विराजमान झाला.
चवथ्या थराला पक्या पहिला चढला. इकडून चिनूने चवथ्या थरावर चढण्यासाठी स्टार्ट घेतला. इतक्यात पक्याने वरून त्याच्या नावाने हाळी देत त्याला वर चढण्यापासून रोखले आणि दिलीप मानकरला वर यायला सांगितले.
चिनू थबकला. ‘अचानक काय झालं पक्याला...' तो विचार करू लागला. ‘साला आपली इज्जत काढणार काय हा?' ह्या विचारानं त्याची कानशिलं लाल झाली.
वरून पाण्याचा मारा चालू होता. दुसऱ्या बाजूने राजू नाचणकर माकडाच्या वेगाने शिडीचा आधार घेत पक्या आणि दिलीप मानकरच्या वर म्हणजे चवथ्या थरावर चढला देखील. आता पाच थर झालेले.
आता मात्र चिनूचं अवसान गळालं. क्षणात चिनूच्या डोळ्यात आसवं गर्दी करू लागली.
तेवढ्यात चवथ्या थरावरून पक्या जोरात किंचाळला 'चिनू ये वर... ही हंडी तुला फोडायचीय...ती पण पहिल्या फटक्यात... ये वर लवकर' पक्याचे शब्द चिनूचे काळीज चिरून गेले.
दाढी अशोकने त्याला दुसऱ्या थरावरून वर येण्यास खुणावले. चिनू भानावर आला. क्षणात तो हिरामण दादाकडे वळला. हिरामणने आपल्या मांडीला वाकवून त्याला वर चढायला पायरी करून दिली.
चिनू झपझप वर चढू लागला. पाण्याचा मारा आणि पाण्याने भरलेले फुगे त्याच्या नाका-तोंडावर आदळत होते. पाण्याच्या टँकरला जोडलेल्या पाईपातून पाण्याचा अजस्र लोट चिनूच्या अंगावर बरसत होता.
चारही थरांना स्थिर उभे राहण्यास भयानक त्रास होत होता.
चिनू चवथ्या थरावर पक्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याने पक्याकडे पाहिले, पक्या हसत होता. वरून कोसळणाच्या पाण्यातूनही त्याला पक्याच्या डोळ्यात वेगळीच चमक दिसली. त्याच्या इशाऱ्यासरशी चिनू पक्याच्या भरदार मांडीवर पाय ठेवून त्याच्या खांद्यावर चढला.
राजू नाचणकर, पक्या आणि दिलीपच्या खांद्यांवर पाय ठेवून आरामात बसला होता पुढे काय करायचे चिनूला माहीत होते. तो पक्या आणि दिलीप माणकर ह्या दोघांच्या खांद्यावर बसलेल्या राजूच्या खांद्यावर पाय सोडून बसला.
सहा थर आता अगदी घट्ट उभे होते.
पाण्याचा मारा चारही बाजूने सुरू झालेला.
खालुबाजा आणि सनईवाले देखील पिसाटलेले.
आता राजू नाचणकर त्याच्या खांद्यावर बसलेल्या चिनूला घेऊन हळूहळू उभा राहू लागला.
राजू हलत होता. तो घसरू नये म्हणून पक्याने आणि दिलीपने एका हाताने त्याचे पाय घट्ट पकडलेले. राजू आता पूर्ण उभा राहिला.
त्याच्या वर बसलेल्या चिनूने पाहिलं. हंडी अजून पाच-साडे पाच फूट वर होती. तिच्यापर्यंत पोचायला त्याला उभं रहावंच लागणार होतं.
त्याने हळूहळू उभं राहायला सुरुवात केली. वर पाहिलं इतक्यात दहा-बारा पाण्याने भरलेले फुगे त्याच्या डोळ्यावर आणि नाकावर आदळले. तो थोडासा हेलपाटला. पुन्हा खाली बसला.
राजू नाचणकरची मात्र कमाल व्यवस्थित तोल सांभाळत उभे राहून त्याने चिनूचे दोन्ही पाय घट्ट धरलेले.
खालून चवथ्या थरावरून पक्या मान उंचावून पहात होता. तो जोरात ओरडला 'चिन्या वर बघू नकोस... खाली बघत वर उभा रहा... मग हंडी पकड..' चिनूने होकारार्थी मान हलवली. लक्ष एकाग्र केलं. वाकलेला तो, डोकं आणि नजर खाली ठेवत पुन्हा हळूहळू उभा राहात पाणी आणि फुग्यांच्या माऱ्याला न जुमानता अर्धवट उभा राहिल्यावर चिनू झटक्यात पूर्ण उभा राहिला. आता मात्र वाजविणारे आणि जोरजोरात गलका करणारे पब्लिक शांत झालेले. आवाज येत होता तो फक्त पाणी आणि फुग्यांच्या माऱ्याचा.
तिसऱ्या गल्लीवाल्यांनी सगळे बळ एकटवून आता फक्त चिनूवर हल्लाबोल केला होता.
ताठ उभं राहात चिनूने किंचित वर पाहिलं. हंडी त्याच्या अर्ध्या हातावर होती.
पटकन हात उंचावून त्याने दोरखंड स्वतःकडे खेचला तशी हंडी अलगद च्या गळ्याशी आली. त्याने हंडीला जवळ घेतले इतक्यात त्याची नजर समोरच्या बाल्कनीत गेली. तोंडावर पडणाऱ्या फुग्यांच्या माऱ्यातूनही त्याने समोर पाहिलं, राधा दोन्ही हात कानाशी धरून डोळे विस्फारून, 'आ' वासून त्याच्याकडे बघत असलेली त्याला दिसली.
'जय जय क्रिश्ना... गोपाल क्रिश्ना' चा घोष गर्दीतून सुरू झालेला. पटकन भानावर येत त्याने हंडीतली काकडी, पाने बाहेर फेकली आणि हंडीतला नारळ बाहेर काढला.
हंडीला नमस्कार करून त्याने हातातल्या नारळाच्या पहिल्याच तडाख्यात हंडीचे दोन तुकडे केले. हंडीतलं हळदयुक्त दही चिनूच्या आणि खालच्या थराच्या अंगावर पसरलं.
टोऽऽ टोऽऽ टोऽऽऽ करत सनई निनादली. खालुबाजेवाले त्वेषात वाजवू लागले. पिवळ्या दह्याने माखलेल्या चिनूने पुन्हा राधेकडे पहिले. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता.
‘चिनू गांडू बस झालं उतर आता' खालून राजू नाचणकर त्याच्या पायाला हलवत ओरडला. झटक्यात चिनू गपगारपणे त्याच्या खांद्यावर विराजमान झाला. तो बसल्यावर राजू खाली बसला. आधी चिनूला उतरू दिलं. चिनू उतरल्यावर राजू खाली उतरला. मग पक्या नि दिलीप उतरले. बाकीचे जसे चढले तसेच उतरले. कसलीही पडझड नाही. गोंगाट नाही. उतरल्यावर सगळ्यांनी गलका केला. चिनूने वळून पक्याला मिठी मारली. पक्या हसला, म्हणजे साला हे आधीच ठरलेलं तर. पक्याने चिनूला टाळी देत मिठीत घेतलं.
✍️ सुधीर जाधव
💠 क्रमश. पुढे.... प्रकरण १४

0 टिप्पण्या