माझा अनुभव... SYBA ची परीक्षा देताना

 


माझा अनुभव... SYBA ची परीक्षा देताना

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/07/ 2026 :

SYBA ची परीक्षा देण्यासाठी गेले होते. मनात एकच विचार घोळत होता...

"या वयात आपण पुन्हा परीक्षा देतोय..."

तेवढ्यात माझ्या पुढे बसलेल्या साधारण माझ्याच वयाच्या एका गृहस्थांशी ओळख झाली. सहज विचारलं, "काय करता? आणि आता शिक्षण का घेत आहात?"

त्यांचं उत्तर ऐकून मन सुन्न झालं.

ते म्हणाले, "मी शेतकरी आहे. परिस्थिती चांगली आहे. पण माझा मुलगा इंग्रजी माध्यमात शिकतो. त्याच्या मित्रांचे वडील डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक, अधिकारी आहेत. त्याला 'माझे वडील शेतकरी आहेत' हे सांगताना कमीपणा वाटतो. म्हणून मी पुन्हा शिक्षण घेत आहे."

क्षणभर माझ्याकडे शब्दच नव्हते...

एकीकडे मुलाच्या भविष्यासाठी, त्याच्या मनातील कमीपणा दूर करण्यासाठी या वयातही शिक्षण घेणाऱ्या त्या वडिलांचा अभिमान वाटला.

पण दुसरीकडे एक प्रश्न मनाला सतत टोचत राहिला...

शेतकरी असणं ही कमीपणाची गोष्ट आहे का?

ज्या हातांनी आपल्या ताटात अन्न येतं, ज्या घामातून संपूर्ण देशाचं पोट भरतं, त्या शेतकऱ्याची ओळख सांगताना लाज का वाटावी?

डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी हे समाजासाठी जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच शेतकरीही महत्त्वाचा आहे. कारण तो नसेल, तर अन्नच नसेल.

मुलांनी आपल्या आई-वडिलांचा व्यवसाय कोणताही असो, त्याचा अभिमान बाळगावा. कारण कष्ट करणारा प्रत्येक माणूस मोठा असतो, आणि शेतकरी तर जगाचा पोशिंदा असतो.

खरी श्रीमंती पदवीत नसते; ती कष्टात, संस्कारात आणि आई-वडिलांविषयीच्या अभिमानात असते.



 ✍️©️ सौ. धनश्री म्हेत्रस :::

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या