आषाढी एकादशी : माणुसकीची वारी



 आषाढी एकादशी : माणुसकीची वारी 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

आषाढातील पहिला पाऊस पडला की मातीचा दरवळ मनाला स्पर्श करून जातो. शेतकरी आकाशाकडे आशेने पाहू लागतो आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मन मात्र एका वेगळ्याच ओढीने भरून येते. गावोगावी टाळ मृदंगाचे स्वर ऐकू येऊ लागतात‌. अभंगांची लय कानावर पडते आणि नकळत ओठांवर उमटते "ज्ञानोबा-तुकाराम!" हा केवळ गजर नसतो.ती  केवळ हाक नसते. तर ती अनेक शतकांपासून अखंड वाहणाऱ्या भक्तीच्या प्रवाहाची चाहूल असते.

आषाढी एकादशी हा महाराष्ट्रासाठी फक्त धार्मिक उत्सव नाही. तो आपल्या सांस्कृतिक स्मृतीचा, लोकपरंपरेचा आणि संतविचारांचा जिवंत उत्सव आहे. पंढरपूरच्या दिशेने निघालेली वारी पाहिली की जाणवते.ही लाखो पावलांची गर्दी नसून ती लाखो हृदयांची एकच धडधड आहे. प्रत्येक पाऊल विठ्ठलकडे जात असले तरी त्याचा खरा प्रवास स्वतःच्या अंतःकरणाकडेच असतो.

वारीचे वैशिष्ट्य तिच्या भव्यतेत नाही तर तिच्या साधेपणात आहे. पायात चप्पल नसली तरी चेहऱ्यावर समाधान असते. खांद्यावर सामान कमी  असते पण मनात विश्वास भरलेला असतो. वाटेत भेटणारा प्रत्येक माणूस आपलाच वाटतो. कुणी पाण्याचा घोट देतो  कुणी भाकरीचा तुकडा वाटतो. तर कुणी थकलेल्या वारकऱ्याला आधार देतो. इथे देणारा आणि घेणारा यांच्यातील भिंत विरघळून जाते. कदाचित म्हणूनच वारी ही केवळ देवाकडे जाणारी वाट नसून माणसाकडे जाणारी वाट ठरते.

आपल्या संतांनी भक्तीचा अर्थ कर्माशी जोडला. ज्ञानेश्वरांनी विश्वबंधुत्वाची दृष्टी दिली नामदेवांनी देवाला आपले मानले. एकनाथांनी समतेचा दीप जपला आणि तुकारामांनी भक्तीला माणुसकीची दिशा दिली. त्यांच्या अभंगांमध्ये विठ्ठल आहेच .पण त्याहून मोठा आहे तो माणसाविषयीचा विश्वास. देव दगडात शोधण्यापेक्षा दुःखी माणसाच्या डोळ्यांत शोधावा हेच त्यांनी शिकवले.

आज आपण तंत्रज्ञानाच्या शिखरावर पोहोचलो आहोत. पण संवेदनांच्या बाबतीत अनेकदा रिकामे होत चाललो आहोत. संवाद वाढला  पण मनांची जवळीक कमी झाली. साधने वाढली पण समाधान हरवले. अशा वेळी आषाढी एकादशी आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला शिकवते. आपल्या जीवनात किती भक्ती आहे? यापेक्षा किती माणुसकी आहे? हा प्रश्न ती अलगद विचारते.

विठ्ठलाचे रूपही याच कारणाने विलक्षण वाटते. विटेवर उभा असलेला कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट पाहणारा हा देव घाई करत नाही. तो कोणालाही नाकारत नाही. उशिरा आलेल्यालाही तो तितक्याच प्रेमाने स्वीकारतो. ही प्रतिमा श्रद्धेपलीकडे जाऊन संयम विश्वास आणि स्वीकार यांचा जीवनधडा देऊन जाते.

आषाढी एकादशीचा खरा अर्थ उपवासात नाही. तर मनातील कटुता सोडण्यात आहे. तो मंदिरात रांगेत नाही तर एखाद्या गरजूच्या पाठीवर मायेचा हात ठेवण्यात आहे. तो अभंग म्हणण्यात नाही तर अभंगातील मूल्ये जगण्यात आहे. संतांनी दिलेली ही शिकवण आजही तेवढीच ताजी आहे. आणि आवश्यक ही आहे.

प्रत्येक वर्षी वारी पंढरपूरला पोहोचते. दर्शन होते. सोहळा संपतो. पण खरी वारी तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपण विठ्ठलाला मंदिरात न ठेवता आपल्या वागण्यात विचारांत आणि व्यवहारात स्थान देतो. कारण पंढरीचा रस्ता एका दिवसाचा असतो.पण माणुसकीचा रस्ता आयुष्यभर चालायचा असतो.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण एवढाच संकल्प करूया .मनातला अहंकार कमी करू संवेदना वाढवू, दुःखात असणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि संतांनी दाखवलेली समतेची वाट विसरणार नाही. कारण विठ्ठलाला सर्वांत प्रिय असेल तर तो भक्ताचा आवाज नव्हे तर भक्ताच्या मनातील निर्मळपणा आहे.

आणि म्हणूनच आषाढी एकादशी हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नाही तो महाराष्ट्राच्या आत्म्याला दरवर्षी नव्याने जागवणारा संस्कार आहे.

ती माणुसकीची वारी आहे.

॥ विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ॥

©® अंजली कानिंदे/मुनेश्वर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या