मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 05/07/ 2026 :
कसे आहात? छान! मस्त! निवांत!असे वरवरचे संभाषण हे नित्याचे आहे. एकदम छान किंवा मस्त कोणाचेच नसते. कितीही वैताग असला तरी छान म्हणून साजरे केले जाते. निवांत तर कोणीच नसतो. तरीही निवांतपणे निवांत सांगितले जाते.
हे वरवरचे संभाषण झाले. मनातील बोलायला, सांगायला जरा निवांत बैठक लागते. आपली जीवाभावाची माणसे लागतात. ती घरातली किंवा नात्यातलीच असावीत असे काही नसते.
आपले विचार, आपली मते विशेषतः आपल्या मनातील भावना समजून घेणारी, आपल्या आनंदात सहभागी होणारी, दुःखाची वेदना कमी करणारी व समस्या सोप्या करणारी माणसे मात्र गरजेची असतात.
यासाठी त्या व्यक्तीने त्याच्याकडील वेळ द्यावा लागतो. पुढील व्यक्तीच्या भावनांची तीव्रता कमी करून, चार अनुभवाच्या गोष्टी सांगून, थोडा दृष्टीकोन बदलायला सांगून त्यांचे समुपदेशन करणे आवश्यक असते.
आजचा संकल्प
कोणाचेही खरेच छान किंवा मस्त चालावे यासाठी आपण आपल्यातील थोडा वेळ देऊ व वेळेवर समुपदेशन करून योग्य वेळी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या