थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली - डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

 

थेट कंपन्यांकडून खरेदी, ग्राहकांना स्वस्त दरात दर्जेदार वस्तू; शिवशंकर बझारने सामाजिक बांधिलकी जपली - डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 02/07/2026 :

थेट उत्पादक कंपन्यांकडून मालाची खरेदी करून अत्यल्प नफ्यावर ग्राहकांना दर्जेदार वस्तू स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, हीच शिवशंकर बझारची ओळख आहे. व्यावसायिक नफ्यापेक्षा सामाजिक बांधिलकी जपत ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे प्रतिपादन चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील यांनी केले.

शिवशंकर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संस्था व शिवकिर्ती महिला औद्योगिक सहकारी संस्था यांच्या अनुक्रमे ३१ व्या व ११ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा शिवशंकर बझारच्या मुख्य कार्यालयात उत्साहात पार पडल्या. यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमास लेखापरीक्षक व करसल्लागार सीए नितीन कुदळे, दोन्ही संस्थांचे संचालक, सभासद तसेच मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक गोपाळराव माने-देशमुख यांनी वार्षिक अहवाल व विषयांचे वाचन केले.

राज्याचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उद्योगमहर्षी स्वर्गीय उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या ध्येय-धोरणानुसार शिवशंकर बझारची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. तसेच शिवरत्न उद्योग समूहाचे चेअरमन कीर्तीध्वजसिंह मोहिते पाटील व अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.

डॉ. मोहिते-पाटील म्हणाल्या की, देशातील विविध राज्यांतील उत्पादक कंपन्यांकडून थेट माल खरेदी केल्यामुळे मध्यस्थांचा खर्च वाचतो आणि त्याचा थेट लाभ ग्राहकांना कमी किमतीत मिळतो. सर्व व्यवहार शासनाच्या नियमांनुसार पारदर्शकपणे केले जात असून "ग्राहकांचा विश्वास हीच संस्थेची सर्वात मोठी ताकद" आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, संस्था केवळ वस्तूंची विक्री करत नाही, तर ग्राहकांसाठी मुदत ठेव, सभासद ठेव, बचत योजना आणि विविध बक्षीस योजनाही राबवत आहे. सध्या मुख्य शाखेसह माळशिरस तालुक्यात आठ शाखांद्वारे हजारो ग्राहकांना सेवा दिली जात असून, यावर्षीही सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे.

यावेळी सीए नितीन कुदळे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, ऑनलाईन बाजारपेठेतील वाढती स्पर्धा आणि युद्धामुळे बदलत्या आर्थिक परिस्थितीतही शिवशंकर बझारने ग्राहकांचा विश्वास कायम राखला आहे. संस्थेची विश्वासार्हता आणि पारदर्शक कार्यपद्धती हेच तिच्या यशाचे खरे सूत्र असून, संचालकांनी संस्थेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अधिक सक्रिय भूमिका बजावल्यास संस्था आणखी प्रगती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वार्षिक सर्वसाधारण सभेत नॉर्थ अमेरिकन ऑफिस मियामी बिच फ्लोरिडा यांचेकडून USA EXCELLENCE LEADERSHIP (HONOUR AWARD 2026) मिळाले बद्दल चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी  मोहिते पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात करण्यात आला. तसेच सचिन सगर यांना सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वार्षिक सभेच्या निमित्ताने एक दिवसीय लकी ड्रॉ काढून पाच विजेत्यांना त्यांनी खरेदी केलेल्या किमतीच्या रुपयाचा माल मोफत देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या