रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे येथे भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळा संपन्न

 


रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे येथे भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळा संपन्न 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

आज, दि. २५ जुलै (शनिवार) रोजी रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, मांडवे येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संतांचे विचार रुजावेत, त्यांच्या जीवनातील आदर्शांचे अनुकरण करण्याची प्रेरणा मिळावी तसेच संस्कार, श्रद्धा आणि सामाजिक मूल्यांची जपणूक व्हावी या उदात्त हेतूने या बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात विद्यार्थी वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत जनाबाई तसेच भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हातात केशरी पताका, मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ-मृदुंगाच्या मंगलमय निनादात ही दिंडी रत्नत्रय पतसंस्था येथून रत्नत्रय इंग्लिश मीडियम स्कूल पर्यंत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. शाळेत आगमन झाल्यानंतर भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.

या बालदिंडीत आकर्षक घोडा, लेझीम पथक, सामाजिक प्रबोधन करणारे घोषवाक्यांचे फलक तसेच मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग नोंदविल्याने सोहळ्याची शोभा अधिकच खुलून आली. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी या भक्तिमय दिंडीत सहभागी होण्याचे भाग्य सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना लाभले.

दिंडी शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी केशरी पताका हातात घेऊन घोड्यासोबत गोल फेरी मारली. मुलींनी पारंपरिक लेझीम सादर करत फुगड्यांचा आनंद लुटला. विशेष म्हणजे शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगड्या खेळून या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि आनंदाला चार चाँद लावले.

या कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, मार्गदर्शक  विरकुमार अनंतलाल दोशी, सचिव  प्रमोद अनंतलाल दोशी, अजित गांधी, वैभव शहा, अभिजित दोशी,  देविदास ढोपे, बबन गोफणे, रामदास कर्णे, अजय गांधी, रामदास गोफणे, सुरेश धाईंजे, कृष्णकांत फुले, चंद्रकांत तोरणे, ज्ञानेश राऊत, दिपक राऊत, मुख्याध्यापिका सविता देसाई 

यांच्यासह बहुसंख्येने पालक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

ही बालदिंडी केवळ एक मिरवणूक नव्हती, तर महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संस्कृतीचा आणि संस्कारमूल्यांचा जिवंत अनुभव देणारा प्रेरणादायी सोहळा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या