जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण

 


जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 

 सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 20/7/2026 :

पताकांचे भार मिळाले अंबर।

गर्जती जयकार विठोबाचे।।

टाळ-मृदंग घोळ वाजती कानी।

आनंदे रिंगणी नाचती जन।।

या अभंगात वर्णिलेलीप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गोल रिंगणाने याची प्रचिती दिली.

 सराटी येथील  पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्कामानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा नीरा नदीवरील पूल ओलांडून सोमवार दिनांक 20 जुलै2026 रोजी सकाळी सोलापूर जिल्ह्यात आगमन होताच  जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पालखी अकलूजकडे मार्गस्थ झाली. अकलूज येथील गांधी चौकात पालखीचे अकलूजकरांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतानंतर पालखी सोहळा विजय चौक, शिवसृष्टी, विठ्ठल मंदिर, डॉ आंबेडकर चौक मार्गे सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या गोल रिंगणासाठी सदाशिवराव माने विद्यालयाच्या  प्रांगणात आला. प्रथम नगारखान्याचे रिंगणस्थळी आगमन झाले. त्यापाठोपाठ अश्व आणि रथापुढील २७ दिंड्या प्रांगणात दाखल झाल्या. पालखीचे पूजन संग्रामसिंह मोहिते-पाटील, ऋतुजादेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील व सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या पावन पादुकांचे आणि संस्थानच्या बाभूळकरांच्या अश्वाचे पाद्यपूजन संग्रामसिंह मोहिते-पाटील परिवाराच्या हस्ते झाले, तर स्वाराच्या अश्वाचे पूजन धवलसिंह मोहिते-पाटील आणि उर्वशीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडले. 

 रिंगण सोहळ्याची सुरुवातीस पताकाधारी, त्यापाठोपाठ डोक्यावर तुळशी वृंदावन व हंडे घेतलेल्या महिला, विणेकरी आणि टाळकरी-पखवाजधारी यांनी शिस्तबद्ध रीतीने रिंगणात धाव घेतली. यानंतर सोहळ्यातील दोन्ही अश्वांनी धाव घेत तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या आणि उपस्थित लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. अत्यंत शिस्तबद्ध, देखण्या आणि नयनरम्य वातावरणात गोल रिंगण सोहळा संपन्न झाला.

या सोहळ्यास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, नंदिनीदेवी मोहिते-पाटील, काँग्रेस नेते नाना पटोले, मदनसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, नगराध्यक्षा रेश्मा आडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, तहसीलदार सुरेश शेजुळ या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतच लाडके अभिनेते भाऊ कदम आणि अभिनेत्री संजना काळे आणि लाखो वैष्णवजन उपस्थित होते.

पालखी सोहळा आज ( दि. 20)अकलूज मुक्कामीच असून दिवसभर अकलूज व परिसरातील भाविकांनी सदाशिवराव माने विद्यालय येथे दर्शनासाठी गर्दी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी (मंगळवार दि.२१) रोजी पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी माळीनगरकडे मार्गस्थ झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या