भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा..!
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 11/7/2026 :
केवळ देवळात जाऊन पूजा करणे किंवा डोळे मिटून बसणे म्हणजे भक्ती नव्हे. मानव कल्याण, समाज सुधारणा आणि देशसेवा म्हणजेच खरी भक्ती होय. जेव्हा भक्ती कृतीत उतरते, तेव्हा तिचे रुपांतर सेवेत होते. मानव जातीची सेवा करणे, गरिबांना मदत करणे आणि समाजोपयोगी कामे करणे हीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेली भक्तीची व्याख्या आहे. संप्रदाय, जातीभेद विसरून सर्वानी एकत्र येऊन प्रार्थना करणे, भजन करणे ही भक्तीची योग्य पद्धत आहे. महाराजांच्या भजनातून व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश मिळतो.
भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा |
भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा |
ऐका हा भाव जिवाचा जिवाचा ||धृ||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, भक्तीशिवाय मानवी जीवनाचा खरा उद्धार अशक्य आहे. यासाठी मनात दृढ निर्धार आणि भक्तीची आवश्यकता असून अंत:करणातील भाव असणे आवश्यक आहे. संतांच्या विचारांवर चालून प्रभूचे स्मरण करणे आणि भक्तीव्दारे संसातातील अडचणीवर मात करणे हे या भजनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. भक्तीचा खरा आनंद मिळवण्यासाठी किंवा ईश्वरापर्यत पोहोचण्यासाठी मनामध्ये अढळ निश्चय असणे गरजेचे आहे. भक्ती म्हणजे केवळ पूजा-पाठ, नामस्मरण करणे नव्हे तर ती एक श्रद्धायुक्त प्रीती आहे. यात अंत:करणातील भावनांचा ओलावा असतो. संकटे आली किंवा मन विचलीत झाले तरीही, मी माझ्या ईश्वराची भक्ती करणारच असा पक्का निर्धार असावा. उदा:- पतंग (फकडी) जसी दिव्यावर आपली भक्ती (प्रेम) असल्याने प्राण जाण्याची भीती न बाळगता त्यावर झेप घेते. तशीच समर्पणाची तयारी भक्तीमध्ये हवी. खऱ्या भक्तीच्या मुळाशी त्याग असते. स्वार्थ सोडून निस्वार्थ भावाने ईश्वराला शरण जाणे म्हणजेच भक्ती. ज्याप्रमाणे गोपी श्रीकृष्णाच्या विरहाने कासावीस होतात आणि म्हणतात की, तूच माझा जीवाचा जीव आहेस. तुझ्या शिवाय मला या जगात कशातही गोडी वाटत नाही. तशीच आपली सुद्धा तीव्र ओढ असली पाहिजे.
हे ऐकाना संत पुरावे, अनुभवियांचे अनुभव घ्यावे |
शांती सुखाचे आगर बरवे, आपण तरुनी दुज्या तारावे |
तोडील फास यमाचा यमाचा, भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा ||1||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संतांचे विचार आणि त्यांचे दाखले ऐकावेत. ज्यांनी अध्यात्माचा किंवा भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे, त्या अनुभवी संतांच्या शिकवणीचा स्विकार करावा. संत हे शांती आणि सुखाचे उत्तम भांडार (आगर) असतात. त्यांच्या संगतीने आणि उपदेशाने आपण स्वतः या भवसागरातून तरुन जावे आणि उपदेशाने इतरांनाही या संसारातून पार होण्यास मदत करावी. अध्यात्माच्या मार्गांवर चालताना केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा संतांचे विचार आणि त्यांनी घेतलेले प्रत्यक्ष अनुभव जास्त मोलाचे असतात. संत हे स्वतः शांती आणि आनंदाने परिपूर्ण असतात. त्यांच्या सानिध्यात आल्याने मनाला खरी शांती लाभते. यमाच्या बंधनातून सुटका मिळवण्यासाठी दृढ निश्चयाने ईश्वर भक्ती करणे आवश्यक आहे. या भक्तीमुळे मृत्यूची भीती नष्ट होऊन उद्धार होतो.
तरण्यासी भवसागर सगळा, अवघड हा षड़रिपुचा मेळा |
पार कराया या कळिकाळा, नाही दुजा कुणी मार्ग निराळा |
निज संदेश शिवाचा शिवाचा, भक्तीविणा उद्धार नाही कुणाचा ||2||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हा जन्ममृत्यूचा संसारुपी सागर पार करणे अत्यंत कठीण आहे कारण मानवी मनात वास करणाऱ्या सहा शत्रूंचा (षड़रिपु) माणसाला सतत संसारात अडकवून ठेवतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे मानवी मनाला भ्रष्ट करणारे आणि मोक्षाच्या मार्गात अडथळा आणणारे हे सहा मुख्य विकार नावाड्या सारखे या भवसागरात माणसाला बुडवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. या संसारात अखंड सागर (भवसागर) पार करण्याची किंवा मृत्यूच्या (कळिकाळाच्या) तावडीतून सुटणारी ईश्वराच्या भक्ती व्यतिरिक्त आणि नामस्मरणा व्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग जगात उपलब्ध नाही. हाच संदेश ईश्वराने मानवाला दिलेला आहे.
तुकड्यादास म्हणे ऐकाना, नित्य प्रभूचे भजन कराना |
व्यसने सगळी सोडुनी द्याना, सरळपणाचे जीवन जगाना |
लोभ करा सर्वांचा सर्वांचा, भक्ती विणा उद्धार नाही कुणाचा ||3||
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लोकांना उद्देशून म्हणतात की, माझे सांगणे लक्ष देऊन ऐका. नेहमी परमेश्वराचे स्मरण आणि भजन करत राहा. जीवनातील सर्व प्रकारची व्यसने सोडून द्या आणि नेहमी सरळ, साधे व प्रामाणिक जीवन जगा. नियमित भजनामुळे, नामस्मरणाने मन शांत होते आणि जीवनाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. व्यसनामुळे माणसाचा व त्याच्या कुटुंबाचा नाश करतात म्हणून व्यसनमुक्त समाज निर्माण करावा. कोणत्याही प्रकारचा कपट किंवा खोटेपणा न बाळगता सरळ आणि नितीमत्तेने जगणे हीच खरी मानवाची ओळख आहे. सर्वांवर प्रेम करा. ईश्वराच्या भक्ती शिवाय कोणाचाही उद्धार किंवा कल्याण होऊ शकत नाही.
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त
श्री गरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- 9970404180


0 टिप्पण्या