तुकड्यादास गुरु का प्यारा !

 

तुकड्यादास गुरु का प्यारा ! 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/7/2026 :

"श्रीगुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी" ज्या व्यक्तीच्या पाठीशी कृपाळू सद्गुरू उभे आहेत, त्याला इतर कोणत्याही गोष्टीची किंवा संसाराची चिंता करण्याची गरज नसते. गुरु हा शिष्याच्या अज्ञानाचा अहंकार दूर करून त्याला ज्ञानाच्या आणि मोक्षाच्या मार्गावर नेऊन सोडतो. गुरु आपल्यातील सुप्त गुणांना बाहेर काढतात. "गुरु परमात्मा परेषू" मानवी जीवनाला आकार देणारा खरा कुंभार जर कोण असेल तर तो माणसाला लाभलेला गुरु होय. आपल्या शिष्याने जगामध्ये नाव उज्वल करावे, हा ध्यास प्रत्येक गुरुचा असतो. परमहंस आडकोजी महाराजांनी तुकडोजी यांच्यावर कृपेचा वर्षाव केला आणि आशिर्वाद दिला की, तूही असेच भजने लिहित राहा. गुरुंनी दिलेल्या आशीर्वादाचा प्रभाव असा झाला की, लेखणीतून पवित्र नदीसारखी शद्ब रचना सहजतेने प्रवाही होत गेली. राष्ट्रसंताना ग्रामगीता लिखाणाची प्रेरणा पंढरपूरच्या भिमानदीचे काठावरच मिळाली. राष्ट्रसंताना ज्ञानाचा अलमस्त प्याला आडकोजी महाराजांनी पाजला.

अलमस्त पिलाया प्याला |

इस प्यालेने मन ढाला ||टेक||

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अलमस्त म्हणजे सांसारिक मोहापासून मुक्त आणि परमानंदात मग्न अशी अवस्था. येथे प्याला म्हणजे गुरुदेवांनी दिलेल्या ज्ञानामृत किंवा भक्तीचा घोट. हा घोट घेताच साधकाचे मन पूर्णपणे बदलून जाते. माझ्या गुरुदेवांनी दिव्य ज्ञान, भक्तीचा प्याला मला पाजला आहे. माझे मन ईश्वराशी एकरुप झाले. गुरुदेवांनी दिलेल्या प्याल्याचा घोट जो कुणी घेईल. त्या साधकाचे विचार, विकार आणि संपूर्ण जीवन बदलून तो ईश्वराच्या प्रेमात लीन होतो.

क्या कहना प्याले की बाते |

नशा चढी अलबेला |

नजर न आये दुनिया दौलत |

आप ही आप अकेला जी ||1||

   राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना गुरुदेवाच्या भक्ती आणि आत्मज्ञानाची सुंदर अनुभूती आली. गुरुदेवाच्या प्रेमाच्या आणि ज्ञानाच्या, ज्ञानामृताच्या प्याल्याचे काय वर्णन करावे. ही नशा काही वेगळीच आणि अद्भुत आहे. मोह नाहिसा होऊन गुरुदेवाचे प्रेमात पूर्णपणे तल्लीन होऊन जाते. या जगात माणसे धन, संपत्ती आणि भौतिक सुखाच्या मागे धावतात, परंतु जेव्हा साधकाला गुरुदेवाचा साक्षात्कार होतो तेव्हा त्याला बाह्य जगातील माया किंवा दौलत अत्यंत क्षुद्र आणि निरर्थक वाटू लागतात. "आप ही आप अकेला" म्हणजे या ओळीत अध्यात्माचे सर्वोच्च सत्य दडलेले आहे. सर्व सृष्टीत तो परमेश्वर स्वतःच भरलेला आहे. आत्मा हा एकमेव दुसरा कोणी नाही तर तो स्वतःच्याच स्वरुपात शांत आणि तृप्त होतो.

आप ही गावे आप ही रोवे |

आप ही है मतवाला |

आप ही अंदर आप ही बाहर |

जीधर उधर उजीयाला जी ||2||

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, हा गूढ आध्यात्मिक विचार आहे. हे सर्व एकाच परमेश्वराचे किंवा आत्म्याचे विविध खेळ आणि रूपे आहेत. परमेश्वर स्वतःच गातो, स्वतःच रडतो आणि स्वतःच मस्तीत (मतवाला) आहे. सुख आणि दुःख या दोन्ही भावना एकाच शक्तीच्या आहेत. गाणे, रडणे ही शक्ती त्याचीच आहे. एखादा नट, कलाकार निरनिराळ्या भूमिका करतो त्याचप्रमाणे परमात्मा या विश्वाच्या नाटकात अनेक रूपे घेऊन हे सर्व अनुभवत आहे. तोच परमात्मा आत आहे, तोच बाहेर आहे आणि सगळीकडे त्याचाच प्रकाश पसरलेला आहे. परमेश्वर हा फक्त मंदिरात नसून तो आपल्या अंत:करणात आहे आणि संपूर्ण विश्वात भरुन आहे.

उठ पडी गर्मी करता |

पर कारण वेद निहाला |

जो चलता था वही चला कुछ |

मेला बेला जी  ला जी ||3||

      राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेच्या मार्गांवर चालताना जेव्हा ज्ञान, भक्ती किंवा वैराग्य जागृत होते, तेव्हा साधकाला संसार तापदायक (गर्मी) वाटू लागतो. भौतिक सुखाची ओढ त्याला जाळू लागते आणि मोक्षाची आस निर्माण होते. या आध्यात्मिक तळमळीमुळे साधकाचे मन, वेदना व्याकुळ होतात. तो ईश्वराच्या भेटीसाठी आतुर होतो. साधकाला सत्य समजते की जगातील कोणतीही गोष्ट नश्वर आहे. जो मार्ग संतांनी आणि ईश्वराने चालवला आहे. त्याच निसर्ग नियमावर संपूर्ण ब्रम्हांड प्रवास करत आहे. मेला म्हणजे जत्रा. मानवी जीवन हे काही कळासाठी भरलेला एक मेळावा आहे. सर्व माणसे, नातेवाईक हे तात्पुरते एकत्र येतात आणि आपापली भुमिका संपवून निघून जातात.

बिन संगत संतन से कोई |

है ना बचाने वाला |

तुकड्यादास गुरु का प्यारा |

जहाँ से तहाँ अकेला जी ||4||

       राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संतांची संगत ही पारस मण्यासारखी असते जी लोखंडालाही सोने बनवते. पुरुषाला संतांच्या संगतीशिवाय या संसारातून  व दुःखातून माणसाला वाचविणारा कोणीही नाही म्हणून जे संतांच्या विचारांना, आचरणाला आणि भक्तीला शरण जातात तेच खऱ्या अर्थाने गुरुचे प्यारे (लाडके शिष्य) बनतात. जो भक्त स्वतःच्या अहंकाराचा त्याग करुन पूर्णपणे सद्गुरूच्या चरणी लीन होतो, तोच खऱ्या अर्थाने गुरुचा लाडका शिष्य किंवा प्यारा बनू शकतो. भक्तीच्या मार्गावर चालताना देवाने प्रत्येकाला या जगात पाठवताना स्वतंत्र (अकेला) केले आहे. प्रत्येकाला स्वतःचा आध्यात्मिक प्रवास स्वतःच पूर्ण करायचा आहे.


पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर

व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त 

श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ 

फोन 9921791677

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या