मनाच्या कोपऱ्यातील आपली माणसं.!
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 03/07/2026 :
आपल्या जन्मासोबतच आई, वडील, भाऊ, बहीण यांसारखी रक्ताची नाती आपल्याला निसर्गाकडून मिळतात. ही नाती आपण निवडत नाही. पण आयुष्य जगताना, या रक्ताच्या नात्यांच्या पलीकडे जाऊन एक वेगळंच जग आपल्याला गवसतं. तिथे कोणतंही रक्ताचं बंधन नसतं, तरीही तिथली ओढ रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसते. म्हणूनच म्हटलं जातं, काही नाती रक्ताची नसतात; पण ती भावनांची असतात.
माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रवासात मला अशा अनेक व्यक्ती भेटल्या, ज्यांच्याशी माझं कोणतंही कौटुंबिक कनेक्शन नव्हतं. पण तरीही, त्यांच्याशी जोडलेलं नातं इतकं घट्ट झालं की ते शब्दांत सांगणं कठीण आहे. या नात्यांमध्ये कोणतीही अट नसते, कोणताही स्वार्थ नसतो. इथे असते ती फक्त एकमेकांबद्दलची आदरयुक्त काळजी आणि समजून घेण्याची अथांग वृत्ती.
"काही माणसं जवळ नसतात पण ती मनाजवळ असतात."
आजच्या धावपळीच्या युगात जबाबदाऱ्यांमुळे अनेकदा ही माणसं मैलोन्मैल दूर राहतात. महिनोन्महिने भेट होत नाही, कधीकधी बोलणंही राहून जातं. पण जेव्हा कधी बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट होते, तेव्हा संवाद तिथूनच सुरू होतो जिथे तो मागच्या वेळी थांबला होता. ही माणसं भौगोलिकदृष्ट्या कितीही दूर असली, तरी मनाच्या एका कोपऱ्यात त्यांचं स्थान नेहमी अबाधित असतं. संकटाच्या वेळी पाठीवर पडणारी त्यांची एक अदृश्य थापही आपल्याला लढण्याचं बळ देऊन जाते.
ही माणसं आपल्या यशात प्रामाणिकपणे आनंद व्यक्त करतात आणि आपल्या अपयशात जगाविरुद्ध जाऊन आपल्या पाठीशी उभी राहतात. आणि अशीच माणसं आयुष्यभर आपली असतात. कारण ही नाती विश्वासाच्या आणि प्रेमाच्या पायावर उभी असतात.
माझ्या अनुभवातून मला एकच शिकायला मिळालंय की, नाती ही रक्ताने नाही तर हृदयाने निभवावी लागतात. रक्ताची नाती जपायलाच हवीत, पण आयुष्याच्या प्रवासात भेटलेली ही भावनांची नाती सुद्धा तितकीच जपून ठेवायला हवीत; कारण हीच माणसं आपल्या आयुष्याला खऱ्या अर्थाने सुंदर आणि समृद्ध बनवतात.
ShradDhanesh's_Dairies
संकलन : प्रविण सरवदे, कराड
,====================
🌹✍️

0 टिप्पण्या