देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात का जावे?

 


देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात का जावे?

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/07/ 2026 :

ज्या घटनेमागे कोणते 'कारण' आहे, हे शोधायचे नसते, ते 'समजुन' घ्यायचे असते. त्याला बहुधा  'राजकारण' म्हणत असावेत . महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही आठवड्यांत अशाच घटनांची रंगतदार मालिका सुरु आहे . एखाद्या राजकीय वेब सिरीजला  मागे टाकेल,  अशा या या विविध 'घटना चक्रा'मधून  जे संकेत मिळत आहेत, ते  आगामी सत्तासमीकरणांच्या बदलांचे संकेत मानले जात आहेत. सध्या देशात कुठे निवडणुका नसल्याने, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, महाराष्ट्रात दिसताहेत.  परवा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली. आणि त्याचा फोटो प्रसार माध्यमांना मिळेल, अशी व्यवस्था केली. 

त्याआधी जयंत पाटील आणि तावडे यांच्यात झालेल्या चर्चांची 'चर्चा' करण्यात,  विविध मराठी वृत्त वाहिन्यांनी अनेक तास खर्च केले... त्यातून,  ज्या कोणत्या संभाव्य शक्यता व्यक्त करण्यात आल्या... त्या पुढील चोवीस तासात विरून,  विसरून गेल्या... तो भाग वेगळा. 

अगदी त्याचवेळी उद्धव ठाकरे गटातील संभाव्य फूट, "ऑपरेशन टायगर"च्या पुढच्या बातम्या  आणि मुख्यमंत्र्यांच्या राजकीय *भविष्याबाबत बिनधास्त  अंदाज बांधणारे, "पृथ्वी-आदित्य टॅरो शो*" यामुळे महाराष्ट्रातील राजकारण, पुन्हा एकदा मोठ्या बदलाच्या टप्प्यावर उभे आहे  की काय असा प्रश्न पडतो ...

त्यात भर पडलीय पाऊस पाण्यामुळे.  महिनाभर रुसून बसलेला मॉन्सून असा काही बरसून गेला, की सत्ताधारी मंडळींची भलतीच कोंडी झाली. मुंबई- पुणे मार्गावर असलेल्या 'कनेक्टिंग लिंक'चे निमित्त झाले, सोशल मीडिया सरकारवर रुष्ट झाला आणि मुख्यमंत्री चिडले. त्यात पाऊस आल्याचा आनंदही वाहून गेला. 

असो, 

या सगळ्या गदारोळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली,  ती म्हणजे,  महाराष्ट्राने आपला सगळा राग काढण्यासाठी, खरे, खोटे,  काल्पनिक सर्व दोषारोप करण्यासाठी, शरद पवार यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांना बसवले आहे. 

आजवर कोणत्याही राजकीय घडामोडीमध्ये "पवारांचा हात" असल्याचे बोलले जात असे... आता,  तो "हात फडणवीस यांच्या हाती" आलाय... याची प्रचिती यंदाच्या पावसाने दिलीय...

*गेली पन्नास वर्षे,  शरद पवार, महाराष्ट्राचे राजकारण 'गाजवत' आहेत... त्यांचे जोडकाम आणि तोडकाम कायमच वादग्रस्त ठरले... त्यामुळे,  आजवर कॉंग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या,  बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांच्या "टार्गेट" वर एकच नाव असे,  शरद पवार*. 

 ज्यांनी वयाच्या अडतीसाव्या वर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील कॉँग्रेसचे सरकार पाडले होते. ज्यांनी एकदा नव्हे दोनदा कॉंग्रेस फोडली, सोडली. 

आपल्याला आता पंतप्रधानपद मिळणे कठीण आहे,  असे दिसताच, सोनिया गांधींच्या भारतीय असल्यावर शंका घेत,  त्यांच्या पंतप्रधान होण्याचा मार्ग कठीण केला... त्यामुळे,  महाराष्ट्रीय लोकांनी कायमच पवारांच्या या महत्त्वाकांक्षी राजकारणाचे,  त्यांच्या गुन्हेगारी विश्वाशी असलेल्या तथाकथित संबंधांचे,  'भूखंडाचे श्रीखंड', म्हणुन गाजलेल्या भ्रष्टाचाराचे,  क्रिकेट प्रेमाचे जमेल तसे वाभाडे काढले. मराठी लोक कायमच त्यांच्याविरुद्ध  बोलत राहिले. त्यातूनच भलभलत्या दंतकथा जन्माला आल्या... एका पिढीतून दुसर्‍या पिढीत चालत राहिल्या... कारण,  पवार साहेबांनी राजकारणात, स्वतः कायम घटनांच्या केंद्र बिंदू जवळ राहण्याचा प्रयत्न केला. 

बारामतीच्या काटेवाडीतील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या हरहुन्नरी मुलाचा,  तो केंद्रस्थानी राहण्याचा अट्टाहास आजही कायम आहे.  हे एकनाथ शिंदे- पवार भेटीने आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या जहरी टीकेने आपल्याला पाहायला मिळाला...

तर हा असा, "केंद्रभागी" राहण्याचा  वारसा 

पुढे नेण्यासाठी 'समर्थ' असलेल्या नेत्याने केंद्रात जावे,  अशी आशापूर्ण इच्छा, म्हणजेच  'विशफुल थिंकिंग', उगाच उघड होत नसणार...

असो, 

तर या सगळ्या रणधुमाळीकडे 

 *जरा बारकाईने पाहिले की कळते, हा सगळा राजकीय 'जांगडबुत्ता' खरे तर सुरु झाला सुप्रिया सुळे यांच्या घरच्या लग्नापासून... आयुष्यभर ज्या  विचारसरणीला विरोध केला , त्याच संघ स्वयंसेवकाच्या घरात पवारांची नात, अगदी सून म्हणून जाणे... या सोयरीकीच्या जवळीकीला महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीच्या, दुसऱ्या टप्प्यातील आरंभबिंदू मानता येईल* . 

या बदलाचा पहिला टप्पा , स्व अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होऊन सुरु केला होता . अजित दादांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याने , फडणवीस सरकार स्थिर पायांवर उभे राहिले होते . परिणामी एकनाथ शिंदे यांना आपले सामर्थ्य सतत वाढवत ठेवण्याशिवाय प्रत्यंतर उरले नव्हते. त्यातूनच,  उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी पक्षांतर केले आणि महाराष्ट्र देशी रणधुमाळी माजली. अफवा, गैरसमजांच्या धुळीचे लोट असे उठले की,  आपला कोण आणि परका कोण कोणास कळेना... 

हा  इतिहास अगदी ताजा आहे. 

पण , आता हा राजकीय उलथापालथीचा दुसरा टप्पा, कोणाकोणाला टप्प्यात घेईल, हे पाहणे मोठे रंजक ठरणार आहे . 

आपले सहा खासदार,  मागील दार उघडून निघून गेले,  यामुळे अस्वस्थ झालेल्या उद्धव ठाकरे यांनी,  राजकीय निर्णयाची तलवार उपसण्याऐवजी आरती हाती घ्यावी.  त्यांच्या या धर्मभोळ्या स्वभावाने रागावून पवार साहेबांनी चक्क एकनाथ शिंदे यांच्या भेटीस जावे...

हा सगळा रंजक राजकीय कादंबरीतील भाग वाटावा,  असा धमाल उडवून देणारा...

पवार- शिंदे भेटीने, उद्धव ठाकरे यांचे रागावणे मी एकवेळ समजू शकतो... पण त्या भेटीच्या बातमीने, *संपादक संजय राऊत यांचाही 'रुसका राजपुत्र' व्हावा... आणि लाडक्या पवार काकांनी,  त्यांची समजूत काढू नये... हा अन्याय आहे,  अध्यक्ष महाराज... अन्याय... आहे !*

आपण सारे जाणतोच, की राजकारणातील प्रत्येक हालचाल, कृती ही निव्वळ वर्तमानासाठी नसते. समोरच्याला अंदाज लागू न देता , ती भविष्यातील सत्तेच्या पटावरील मोहरे मांडण्याची प्रक्रिया असते. अर्थात , जी चाल खेळायची आहे , ती स्पष्ट होऊ नये , म्हणून 'चलाख' खेळाडू, वेगळाच 'देखावा' निर्माण करत असतो...  त्यामुळे आजचा खरा प्रश्न हा नाही की, विनोद तावडे आणि जयंत पाटील, एकनाथ खडसे काय बोलले. खरा प्रश्न असा आहे की, भाजप आणि शरद पवार यांच्यातील संवादाचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत का? 

आणि या आयुष्यभर , परस्पर विरोधाची परंपरा जपणाऱ्या, दोन वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांचे एकत्रीकरण होईल का आणि झाले तर...

कोणत्या मुद्द्यावर होईल ?

तसे पाहिले तर,  २०१९ मध्ये "पहाटेच्या शपथविधी"पासून महाराष्ट्राने अशक्य वाटणाऱ्या अनेक राजकीय घटना, प्रत्यक्षात आलेल्या पाहिल्या आहेत... शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काँग्रेस दुबळी झाली, महाविकास आघाडी सत्तेबाहेर गेली आणि महायुतीने अभूतपूर्व बहुमत मिळवले.

अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर,  पवारांनी एकाच वेळी,  कॉंग्रेस,  भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणे,  याची "कल्पना" खुद्द शरद पवार यांनी सुद्धा  केली नसेल...

 *त्यामुळे "हे होणार नाही" असे महाराष्ट्राच्या राजकारणात आता काहीही राहिलेले नाही*.

जर आपण इतिहासाची पाने चाळून पाहिली तर लक्षात येते की, पवार यांचे राजकारण नेहमीच सत्तेच्या केंद्राजवळ राहण्याचे राहिले आहे. त्यामुळे पक्षात,  कार्यकर्त्यांपेक्षा वतनदार नेत्यांची प्रभावळ मोठी राहिली. आज त्यांच्या राष्ट्रवादी  पक्षाकडे जनाधार असला, तरी सत्ता नाही. अनेक जिल्ह्यांतील स्थानिक नेतृत्व सत्तेविना संभ्रमात आहे. पक्षाचे अनेक नेते भविष्यातील राजकीय सुरक्षिततेचा विचार करत आहेत... नेतृत्वावर दबाव आणत आहेत. 

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यासोबत राहून, आज पवारांना थोडीफार राजकीय "स्पेस" मिळते; पण सत्तेची हमी नाही. उलट, महायुतीकडे केंद्र आणि राज्यातील सत्ता असल्यामुळे बहुतांश नेत्यांना,

*सत्याच्या 'गांधी मार्गा'ऐवजी, सत्तेच्या 'मोदी मार्गावर'* जाण्याचे आकर्षण आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील किंवा खडसे यांच्याशी भाजप नेत्यांच्या भेटी घडत असतील, तर त्याचा अर्थ केवळ वैयक्तिक संबंध असा लावणे भोळेपणाचे ठरेल.

*भाजपने गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात एक गोष्ट सातत्याने केली आहे. विरोधकांना पराभूत करण्यासोबत त्यांच्यातील प्रभावी नेत्यांना आपल्या सत्तेच्या छत्राखाली आणले आहे. यात केंद्रीय यंत्रणा वापरून जेव्हढे भाजपात आले,  त्याच्या दसपटीने स्वयंस्फूर्तीने, स्वतःच्या पायाने चालत गेलेले आहेत... याचे पुरावे पाहिजे असतील तर,  पाश्चिम महाराष्ट्रातील गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर झालेले  बदल पहा... भाजप सर्वसमावेशक राजकारण करून, कॉंग्रेसची जागा घेताना दिसतेय*. 

एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार; भाजपने त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला नाही, तर सोबत घेतले. त्यामुळे शरद पवारगटातील काही नेत्यांनी भाजप बरोबर संवाद सुरू असेल, तर तोही त्याच रणनीतीचा भाग असू शकतो.

आपण जर नीट विचार केला,  तर लक्षात येते की,भाजपसमोर आज सर्वात मोठे आव्हान विरोधकांचा पराभव करण्याचे नाही; तर विरोधक एकत्र येऊ नयेत हे आहे. शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीत राहिला, तर तो विरोधकांना बळ देऊ शकतो. पण तो स्वतंत्र झाला किंवा एनडीएच्या जवळ गेला तर विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदूच ढासळू शकतो. भाजप त्यासाठीच प्रयत्नशील आहे. यात अजिबात शंका नाही. 

*पवारांना जवळ करण्याचा, हा सर्व 'खेळ' सुरू असताना,  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत झालेल्या "ऑपरेशन टायगर" मुळे जुने शिवसैनिक 'कोमात' गेले आहेत. लोकसभा निवडणुकीत तुलनेने चांगली कामगिरी करूनही ठाकरे गट संघटनात्मकदृष्ट्या अस्थिर असणे*,  हे उद्धव- आदित्य यांच्या नेतृत्वाचे अपयश आहे.

पण, ठाकरे असल्यामुळे, ते तसं मानणे शक्य नाही. 

उद्धव सेनेत आजही अनेक माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि काही आमदार  अस्वस्थ असल्याचे बोलले जाते. कोणतीही निवडणूक जवळ आली की अशा अस्वस्थतेला अधिक धार चढते...

एकुणच काय तर, या सगळ्या पार्श्वभूमीवर, समजा उद्या 

शरद पवार गट महाविकास आघाडीपासून दूर गेला आणि त्याचवेळी ठाकरे गटातील आमदारांमध्ये आणखी मोठी फूट पडली, तर महाराष्ट्रात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून, काँग्रेस हा  एकमेव पक्ष उरेल. 

अशा स्थितीत, विधानसभेत केलेले आदित्य ठाकरेंचे भाकीत आणि पृथ्वीराज चव्हाणांचे विश्लेषण नेमके काय सांगते,  हा एक मोठा प्रश्न आहे. 

"हे देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्रातील शेवटचे अधिवेशन असेल," असे आदित्य ठाकरे यांचे विधान, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी "फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते", असा अंदाज व्यक्त करण्यामागे कोणते कारण असावे... असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. 

*या दोन प्रमुख विरोधी पक्षांची भूमिका असणार्‍या, दोन्ही विधानांचा राजकीय अर्थ वेगळा असला, तरी त्यांचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे, देवेंद्र फडणवीस. त्यांचे महाराष्ट्रात असणे,  ज्यांच्या राजकीय प्रगतीला पोषक नाही,  असे सगळेच,  त्यांच्या 'दिल्लीत जाण्याकडे" डोळे लावून बसले आहेत... का?*

कारण, देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्र भाजपचे निर्विवाद नेतृत्व आहेत. राज्यातील निवडणुका जिंकण्याची क्षमता, संघटनांवर पकड आणि दिल्लीतील नेतृत्वाचा विश्वास या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत.

मात्र भाजपच्या राष्ट्रीय राजकारणातही २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवीन नेतृत्वाची मांडणी सुरू होणे साहजिकच आहे. अशा परिस्थितीत फडणवीस यांना केंद्रीय मंत्रिमंडळात किंवा राष्ट्रीय संघटनेत मोठी भूमिका दिली जाऊ शकते, अशी चर्चा पूर्णपणे अवास्तव म्हणता येणार नाही.

*परंतु त्याचवेळी एक प्रश्न निर्माण होतो, मुख्यमंत्री फडणवीस जर दिल्लीला गेले तर, महाराष्ट्रातील भाजपचे एकहाती नेतृत्व कोण करणार?*

हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. त्यामुळे  या फडणवीस यांच्या दिल्लीवारीच्या चर्चा, सध्या तरी राजकीय तर्कवितर्कांच्या पातळीवरच आहेत. त्यात महाविकास आघाडीचे नेते आपले "तर्ककुतर्क" टाकून बातम्या 'बनवतात' तो भाग वेगळा. 

असो, 

तर ही अशी, राज्यातील महाविकास आघाडी, आज समविचारांच्या नव्हे तर, 'फडणवीस विरोध' या एकमात्र अजेंड्यावर  एकत्र आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची राजकीय उद्दिष्टे वेगवेगळी, स्वतः पुरती आहेत.

शिवाय पवार, ठाकरे गटाचे ध्येय तर कुटुंब केंद्रित आहे. त्यामुळे त्यांची अस्वस्थ धावपळ उडाली आहे. 

 हे सर्वश्रुत आहे. 

काँग्रेसला राज्यात पुन्हा मुख्य विरोधी पक्ष व्हायचे आहे.

उद्धव ठाकरे यांना सेनेचे मूळ राजकीय स्थान, परत मिळवायचे आहे. शिवाय आदित्य यांचे नेतृत्व 'उभे' करायचे आहे. 

शरद पवारांना आपल्या पक्षाचे राजकीय अस्तित्व आणि प्रभाव, पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवायचा आहे.

या तिन्ही उद्दिष्टांमध्ये स्वार्थाचा स्वाभाविक संघर्ष आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची एकजूट ही केवळ भाजपविरोधावर नाही तर,  फडणवीस विरोधावर टिकलेली आहे... हे त्यांचे नेते सुद्धा मान्य करतील. तर ही अशी मर्यादित म्हणजे 'लिमिटेड' विरोधाची धार, थोडी जरी कमी झाली किंवा सत्तेचे पर्याय उपलब्ध झाले, तर या 'आघाडीची बिघाडी' होईल...

आणि हे सारे लौकरच होणार आहे, असे दिसते. म्हणुनच, 

पुढील सहा महिने, महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणार, असे स्पष्ट दिसतंय.

कारण, राजकारणाच्या पृष्ठभागाखाली मोठ्या हालचाली सुरू आहेत. "खोके ऐवजी बुके" असे फुलां - फुलांची  देवाण घेवाण करणारी,  खडसे-तावडे भेट असो, जयंत पाटील-तावडे चर्चांची "चर्चा" असो, एकनाथ शिंदे- पवार भेट, ऑपरेशन टायगरच्या बातम्या असोत किंवा फडणवीस यांच्या भवितव्याविषयीचे 'भविष्य', या सर्व घटनांचे धागे एका मोठ्या राजकीय चित्राकडे लक्ष वेधतात... 

ते चित्र म्हणजे, महाराष्ट्रात विरोधकांची मोर्चेबांधणी आणि महायुतीची सत्तेचा बालेकिल्ला सुरक्षित करण्याचा प्रयत्न अगदी कळसाला पोहोचला आहे. 

मी १९९१ पासून पत्रकारिता करत आलोय.  अगदी सुरुवातीपासूनच मी पहात,  ऐकत आलो आहे की, शरद पवार हे महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी राजकीय 'खेळाडू' आहेत. ते कोणत्या क्षणी कोणता 'डाव' टाकतील याचा अंदाज त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनाही  येत नाही. त्यामुळेच,  पवार गट भाजप सोबत एनडीएत जाणार की, कॉंग्रेसमध्ये विलीन होणार , याचे उत्तर आज कुणाकडे नाही...

पण, यासोबतच एक गोष्ट नव्याने सिद्ध होत आहे,  ती म्हणजे, पवारांच्या तोडीसतोड ठरलेले, मुख्यमंत्री फडणवीस कधी कोणती खेळी खेळतील आणि थेट 'चेक मेट' देऊन, डाव आपल्याला हवा तसा फिरवतील, याचा भल्याभल्यांना अंदाज लागत नाही... हे आता वारंवार सिद्ध होत आहे...

त्यामुळे चिडून, रागाने, उद्धव सैनिकांनी, कॉंग्रेसच्या अविचारवंतांनी, उद्वेगाने सोशल मीडियावर 'आग लावणे' सोपे आहे... वाईट शब्दात टीका करणे,  हा चुकीचा पायंडा आहे. 

अर्थात, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा, पुढील वाटचालीचा विचार करून, आपला वाणी आणि कृतीचा संयम दाखवणे आवश्यक आहे... 

पुढील कारकीर्दीत, तोच संयम स्वयंम विजयाचं रूप घेऊन त्यांच्या सोबत चालेल...

त्यावेळेस 'देवेंद्र पर्व' सुरू होऊन, भल्याभल्यांचे 'गर्व'हरण होईल !

असे कर्तबगार नेतृत्व राष्ट्रीय पातळीवर गेले तर, हक्काने रागावणाऱ्या, टीका करणार्‍या तमाम मराठी लोकांना आनंदच होईल  !

महेश म्हात्रे

संपादक 

महाराष्ट्र रिसर्च सेंटर

=====================


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या